स्वयंपाकघरात गॅस शेगडीचा सतत वापर होत असतो. त्यामुळे शेगडीवर तेलतिखटाचे डाग, अन्नपदार्थाचे कण पडून ती अस्वच्छ होते. याचा परिणाम शेगडीच्या कार्यक्षमतेवर होतो. त्यामुळे शेगडीची स्वच्छता आवश्यक आहे.

* गॅस शेगडीची साफसफाई करण्यापूर्वी सिलिंडरमधून होणारा गॅसपुरवठा बंद करा. रेग्युलेटर आणि शेगडीचे बटन बंद करा. त्यानंतरच साफसफाई करण्यास घ्या.

* गॅस शेगडीचा वापर झाल्यानंतर साफसफाई करू नका. शेगडी गरम असल्याने साफसफाई करायला गेल्यास दुर्घटना होण्याची शक्यता असते. शेगडी पूर्णपणे थंड होऊ द्या. त्यानंतरच तिची साफसफाई करा.

* शेगडी थंड झाल्यानंतर बर्नरवरील जाळी आणि कॅप्स बाजूला काढा आणि बेसीनमध्ये वाहत्या पाण्याखाली धुवा.

* बर्नरवरील जाळी आणि कॅप्स गरम पाण्यात काही वेळ भिजवून ठेवा. भांडी घासण्याच्या साबणाचा फेस करून त्यातही ठेवले तरी चालेल. त्यामुळे जाळी आणि कॅप्सवरील कचरा दूर होईल.

* शेगडीवरील स्टीलचे आवरण साफ करण्यासाठी ब्रश किंवा पेपर टॉवेलचा वापर करा. साबणाचे पाणी किंवा बाजारात मिळणारे ‘स्टोव्हटॉप क्लीनअर’चा वापर त्यासाठी करू शकता. ब्रश किंवा पेपर टॉवेलने आवरणावरील अन्नाचे, तेलाचे डाग काढून टाका. ब्रशने कडक झालेले डाग काढून टाका.

* बर्नरभोवतालची जागा साफ करण्यासाठी टूथब्रशचा वापर करा. या जागेत हात जात नाही, त्यामुळे अनेक जण त्याची साफसफाई करत नाहीत. टूथब्रशचा वापर करून ही जागा साफ करता येते.

* शेगडीच्या खालील बाजूही साफ करणे गरजेचे आहे.

*  शेगडी पूर्णपणे सुकल्यानंतरच तिचा वापर करा.