25 January 2021

News Flash

बाइकवरून दूर जाताना..

आपण प्रवासासाठी कोणती बाइक निवडत आहोत यावर आपल्या प्रवासाचा सर्व अनुभव अवलंबून आहे.

(संग्रहित छायाचित्र)

वैभव भाकरे

कुठला तरी नवा भाग पाहायला मिळणे, नवीन ठिकाणी राहणे तिथल्या लोकांशी, संस्कृतीशी ओळख करून घेण्याचा रोमांच नेहमीच उत्साही पर्यटकाला हवाहवासा वाटतो. प्रवासाशी एकरूप होण्याची जी मजा बाइकवर येते ती काही औरच. मागे पडत जाणारे डोंगर, रस्ते, वस्त्या, शहरे पाहिले की प्रवासातच मन जास्त रमते. पाश्चिमात्य देशांप्रमाणे बाइकवरून दूर प्रवास करण्याचा ट्रेंड आपल्याकडे देखील वाढतोय. बरेचसे बाइक ग्रुप अशा प्रकारच्या सहलींचे आयोजन करतात. अशा वेळेस होणारा प्रवास बाइकच्या क्षमतेची परीक्षा पाहतो. त्यामुळे अशा बाइक टूरवर असताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

आपण प्रवासासाठी कोणती बाइक निवडत आहोत यावर आपल्या प्रवासाचा सर्व अनुभव अवलंबून आहे. रॉयल इनफिल्ड, केटीएम, होंडा सी बी आर, हिमालयन यांसारख्या दणकट बाइक लांबच्या प्रवासासाठी बहुतांश चालकांमध्ये लोकप्रिय आहे. लांबच्या प्रवासाला जाताना सुरक्षा अधिक महत्त्वाची म्हणूनच रायडिंग जॅकेट, शूज, आणि हेल्मेट त्याचप्रमाणे गुडघ्यांसाठी गार्ड, कोपरांसाठी गार्ड सोबत ठेवा. जर हे तुम्ही प्रथमच अंगावर चढवत असाल तर तुम्हाला ते जड किंवा थोडे गैरसोयीचे वाटण्याची शक्यता आहे. पण लगेचच हे सर्व अंगावर चढवून बाइक चालवण्याची सवय होऊन जाते. तुम्ही उंच ठिकाणी बाइक चालवणार असाल तर रायडिंग गियर तुमचे थंडीपासून रक्षण करते.

प्रवासाची तयारी बाइकपासूनच सुरू करा. तुमच्या प्रवासाच्या ठिकाणानुसार तुमच्या बाइकच्या गरजा बदलणार हे लक्षात ठेवून बाइक तपासून घ्या. इंजिन ऑइल, ब्रेक तपासणे, ऑइल किंवा इंधनची गळती होतेय का नाही ते पाहणे या गोष्टींकडे लक्ष देणे महत्त्वाचे. त्याचप्रमाणे गाडी चालवताना कुठल्या ठरावीक भागातून आवाज येत असेल तर तात्काळ बाइक दुरुस्तीला घेऊन जा. गाडीच्या आतील भागात किंवा खालच्या भागात गंज पकडला नाही ना हे तपासून बघा.

जर तुम्ही आठवडय़ाभराच्या प्रवासासाठी जाणार असाल तर बाइकची सव्‍‌र्हिसिंग करून घेणे उत्तम. या वेळेस गाडीतील बिघाड असलेला भाग बदलून घ्या. गाडीत काही बिघाड असल्यास गाडी इतक्या लांबच्या प्रवासाला नेण्याची जोखीम पत्करू नका. त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार बाइकचे इंजिन ऑइल बदला.

प्रवासाला सुरुवात करण्याआधी बाइकची टाकी ‘फुल’ करा. यामुळे वाटेत थांबून पेट्रोल भरण्यासाठी जाणारा तुमचा वेळ वाचेल. तुमचा प्रवास चार ते पाच दिवसांचा किंवा त्याहून अधिक असेल तरी हाच क्रम पाळा. काही वेळेस तुम्हाला तुमचा मार्ग बदलावा लागू शकतो अशा वेळी आपल्या मार्गावर पेट्रोल पंप आहे का नाही याची खात्री नसते. त्यामुळे आधीच दक्षता बाळगणे योग्य.

कुठल्याही प्रवासाला जाण्याआधी सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाडीच्या टायरची तपासणी करणे. आपल्याला प्रवासात साथ देण्यासाठी बाइकचे टायर सक्षम आहेत का ते पाहा. गरज असल्यास टायर बदलणे योग्य. लांबच्या प्रवासात टायरवर सर्वाधिक ताण पडतो त्यामुळे टायरमध्ये हवेचा दाब आवश्यकतेनुसार आहे का ते पाहा. डांबरी रस्त्यांवरून प्रवास करणार असाल तर रेडियल टायर निवडा, जर रस्ता खडतड असेल तर डय़ुअल स्पोर्ट्स टायर बाइकला लावून घ्या.

प्रत्येक बाइकच्या गरजा वेगवेगळ्या असतात. म्हणून स्थानिक गॅरेजवाल्याकडे जाऊन कोणत्या गोष्टी प्रवासात जवळ ठेवणे आवश्यक आहे ते विचारून घ्या. जादा टय़ूब, स्पार्क प्लग, ब्रेक केबल, इंजिन ऑइल आदी सोबत घेणे गरजेचे आहे.

लांबच्या प्रवासात बाइक चालवताना एक ठरावीक वेग राखून ठेवा. जास्त वेगात बाइक चालवत राहिल्याने इंजिनवर ताण येतो. मित्रांसोबत  जाणार असाल तर सर्वासोबत ताळमेळ ठेवून मार्गक्रमण करायचे असते. अशा प्रकारे सहलींवर जाणारे अनेक बाइक क्लब आहेत. जेथे तुम्ही तुमचे नाव नोंदवू शकता. केवळ बाइक टूर्सच नाही तर नव्या बाइकबद्दल माहिती किंवा बाइकची काळजी कशी घ्यावी, त्यासोबत वापरायच्या अ‍ॅक्सेसरीज याबाबत तुम्हाला माहिती या बाइकक्लब्जकडून मिळेल.

गाडीला आराम द्या

तुमच्याप्रमाणे तुमच्या बाइकलाही आरामाची गरज आहे. तुमच्या प्रवासाच्या मार्गाप्रमाणे कुठे आणि किती वेळा थांबायचे हे ठरवा. काही तासांनंतर किंवा ठरावीक अंतरांनंतर थोडा वेळ विश्रांती घ्या. मात्र सारखे थांबल्याने प्रवासाची लय बिघडू शकते.

सकाळी प्रवास सुरू करण्याआधी हलकी न्याहारी घ्या. पोटभर खाल्ल्यावर ते पचवण्यासाठी शरीराला जास्त मेहनत करावी लागते. त्याचप्रमाणे बाइक चालवताना तुम्हाला झोप येण्याची शक्यता आहे.

सहा-सात दिवसांच्या प्रवासाला जाताना अगदी आवश्यक असेच सामान घ्या. जास्त सामान घेतल्यास त्याचा अतिरिक्त भार तुमच्या बाइकवर येईल आणि तुमचा प्रवासातील बराचसा वेळ सामान सांभाळण्यातच जाऊ  शकतो.

हे लक्षात ठेवा

* बाइकवर लांबच्या प्रवासाला जाणारे गट दोन प्रकारचे असतात. एक जे प्रवासातील मार्गाचा, पेट्रोल पंपचा, हॉटेलचा आधीच विचार करून सहल ठरवतात. तर दुसरे मनाप्रमाणे मार्ग बदलतात. कुठलीही अडचण आली तरी आज स्मार्टफोनमुळे आपल्याला कोणतीही माहिती चटकन मिळवता येते. मात्र प्रवासाचे मार्ग ठरवताना कमीत कमी अडचणी येतील असा मार्ग निवडा.

*  सकाळी लवकर प्रवासाला सुरुवात करा. रात्रीचा प्रवास करणे शक्यतो टाळा. तुम्ही ज्या मार्गानी जाणार आहेत ते तुमच्यासाठी नवीन असल्यामुळे अशा अपरिचित रस्त्यांवर रात्री प्रवास करणे धोक्याचे ठरू शकते.

*  लांबच्या प्रवासात डिहायड्रेशनचा त्रास होण्याची शक्यता असते त्यामुळे भरपूर पाणी प्या. गरज वाटल्यास त्यात ग्लुकोजची पावडर टाका. दोन लिटर पाणी साठवू शकेल एवढी पाण्याची बाटली सोबत ठेवा. दिवसभरच्या प्रवासासाठी हे पाणी पुरेसे होईल. तहान लागली नसेल तरी पाणी प्या.

vaibhavbhakare1689@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2018 3:44 am

Web Title: article about going away from the bike
Next Stories
1 सॅलड सदाबहार : राजगिरा सॅलड
2 इतिहासाच्या पाऊलखुणा
3 दोन दिवस भटकंतीचे : वाई
Just Now!
X