18 April 2019

News Flash

पडद्यामागच्या मेहनतीचा  अंक

मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाची अंतिम फेरी सध्या सुरू आहे.

(संग्रहित छायाचित्र)

रात्रंदिवस जागरण करून तालीम पक्की झालेली. पात्रांचा सर्वाचा अभ्यासही पक्काच. ही सारी मेहनत घेतल्यानंतर प्रत्येक जण सज्ज राहतो तो मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीसाठी. कुणी रंगभूषाकार, कुणी अभिनेता तर कुणी कलाकारांना सहकार्य करणारे पडद्यामागचे कलाकार. सहकार्य आणि मेहनतीची मजा सारे विद्यार्थी अनुभवत असतात. अर्थात महोत्सवाआधी पडद्यामागच्या मेहनतीचा अंक रंगात आलेला असतो. याविषयी सांगताहेत नमिता धुरी.

मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाची अंतिम फेरी सध्या सुरू आहे. हा महोत्सव म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शास्त्रीय संगीत, नृत्य, एकपात्री अभिनय, वक्तृत्व स्पर्धा, एकांकिका इत्यादी स्पर्धाची रेलचेल असते. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या राज्यातील महाविद्यालयांचे गुणवान विद्यार्थी या स्पर्धाच्या निमित्ताने एकत्र येतात आणि विविध कलाविष्कार घडवत असतात. त्यातही एकांकिका स्पर्धामध्ये भाग घेणाऱ्या कलाकारांवर संपूर्ण मराठी सिनेसृष्टीचे लक्ष असते. कारण यातूनच घडत असतात भावी कलाकार. आजतागायत मराठी चित्रपटसृष्टीला मिळालेल्या कलाकारांमध्ये जास्तीत जास्त कलाकार हे आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धामधूनच आलेले आहेत.

तालमीची लगबग

साधारण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱ्या या स्पर्धाच्या तालमी जून-जुलैपासूनच सुरू होतात. सर्वात प्रथम महाविद्यालयातच ऑडिशन्स होतात. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संहिता ऐकवली जाते. संहितेचे वाचन सुरू होते. वाचन करता करता प्रत्येक कलाकार भूमिकेत शिरायला सुरुवात करतो. एकदा का कलाकाराला भूमिका समजली की मग दिग्दर्शकाचे काम सुरू होते. एकांकिका बसवताना विचारपूर्वक काम करावे लागते. नेमून दिलेल्या वेळेत एकांकिका बसली पाहिजे.

बॅकस्टेज म्हणजे एकांकिकेचा ‘प्राण’

पडद्यामागे सर्वात मोठी जबाबदारी असते ती दोन दृश्यांमधल्या ब्लॅकाऊटमध्ये सेट बदलण्याची. जराही गडबड न करता, नेपथ्य किंवा मालमत्तेचं जराही नुकसान होऊ  न देता अतिशय शांतपणे तो बदलला जातो. विंगेत आलेल्या कलाकाराला मेकअप, वेशभूषा बदलण्यासाठी मदत करण्याची जबाबदारीही पडद्यामागचे कलाकार सहज पार पाडतात. बॅकस्टेज एवढंच नसतं तर संगीत, प्रकाशयोजना हेही बॅकस्टेजच असतं. योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य प्रकाश आणि संगीत दिलं गेलं नाही तर प्रयोग फसतो. त्यामुळे बॅकस्टेज हा एकांकिकांचा कणा असतो. हे विद्यार्थी कधी प्रकाशात येत नाहीत. त्यांच्यासाठी सर्वोत्कृष्ट बॅकस्टेजचा पुरस्कारही दिला जात नाही, पण तरीही त्यांचा उत्साह हा नायकाइतकाच महत्त्वाचा असतो.

युवा महोत्सवात थिएटरचे आठ इव्हेंट्स असतात. त्यामुळे तालमींचं वेळापत्रक बरंच व्यस्त असतं. शिवाय बऱ्याचदा एकच कलाकार अनेक इव्हेंट्समध्ये काम करीत असतो. काहीवेळा हे कलाकार संगीत आणि नृत्य अशा स्पर्धामध्येही सहभागी असतात. त्यामुळे हे सगळे खूपच आव्हानात्मक असते. पण तरीही या महोत्सवात एक वेगळीच मजा असते.

– भावेश सुरते, दिग्दर्शक, डहाणूकर महाविद्यालय

युवा महोत्सव सुरू होण्यापूर्वी आम्ही महाविद्यालयात मंदार महोत्सव आयोजित करतो. यात आम्ही सर्व कलाकारांना एकत्र आणतो. बॅकस्टेजच्या विविध कामांसाठी मुलांमध्ये उत्सुकता असते. हळूहळू टीम उभी राहते आणि आम्ही युवा महोत्सवात सहभागी होतो. यंदा आमच्या महविद्यालयाच्या एकांकिकेला सुवर्णपदक मिळाले आहे.

– आनंद आंबेकर, सांस्कृतिक विभागप्रमुख, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय

युवा महोत्सवाची तयारी करताना अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले जाते.  त्यांना एखादा विषय देऊन लिहिण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देतो, जेणेकरून त्यांनाही शिकता येईल. तालमी सुरू असताना आमचे वरिष्ठ आम्हाला अभ्यासातही मदत करतात. त्यामुळे अभ्यासाचाही ताण नसतो. ज्यांना अभिनय येतो त्यांच्याकडे बघून आम्हीही शिकत असतो.

– जयेश कर्डक, कलाकार, रुपारेल महाविद्यालय

मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवासाठी पाठिंबा देण्यात आमचे महाविद्यालय मागे नाही. नियमांप्रमाणे जास्तीत जास्त १३ जण टीममध्ये असू शकतात. त्यामुळे आम्ही २० जणांचा सेट १३ जणांमध्ये लावण्याचा सराव करतो.

– तन्मय चव्हाण, कलाकार, महर्षी दयानंद महाविद्यालय

First Published on September 5, 2018 4:48 am

Web Title: article about hard work behind the scenes