‘जनाजनांची कार’ असे बिरूद लेवून १९७२ साली पाच दरवाजांची प्रवासी कार (व्हॅगन) म्हणून सर्वप्रथम दाखल झालेल्या मोटारीने लोकांच्या मन आणि हृदयात चार दशके असेच घर केले आहे.  होंडा कार्स इंडिया लिमिटेडने बहुप्रतीक्षित दहावी आवृत्ती भारतीय बाजारपेठेत दाखल केली आहे.  स्कोडा ऑक्टेव्हिया, टोयोटा कोरोला आणि ह्य़ुदाई इलांत्रा यांनी व्यापलेल्या सेदान वर्गवारीत सिव्हिक ही मौल्यवान भर ठरणार आहे.

जुनं ते सोनं अशी एक प्रचलित म्हण आहे. काही खास आवडत्या चीज-वस्तूंबाबत ती मुद्दामच वापरात येते. आयुष्यातील पहिले वाहन मग ते चारचाकी असो वा दुचाकी, त्याबद्दलच्या बहुतांशांची लोकभावनाही साधारण अशीच असते. जपानच काय जगभरच्या कारप्रेमींमध्ये ‘सिव्हिक’ या चारचाकी नाममुद्रेबाबत अशी भावना पाहायला मिळते. सिव्हिक अर्थात ‘जनाजनांची कार’ असे बिरूद लेवून १९७२ साली पाच दरवाजांची प्रवासी कार (व्हॅगन) म्हणून सर्वप्रथम दाखल झालेल्या मोटारीने लोकांच्या मन आणि हृदयात चार दशके असेच घर केले आहे. भारतातही २०१२ पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सिव्हिकचा बाज यापूर्वी अनुभवलेल्यांना हुरहुर असलेला तिचा दहावा विस्तारित अवतार बाजारात दाखल झाला आहे.

होंडा कार्स इंडिया लिमिटेडने बहुप्रतीक्षित दहावी आवृत्ती भारतीय बाजारपेठेत दाखल केली आहे. ही गाडी ग्राहकांना ड्रायव्हिंगचा पूर्णपणे नवीन अनुभव देणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. सिव्हिक हे होंडाचे जगभरातील सर्वाधिक खप असलेले मॉडेल आहे. स्कोडा ऑक्टेव्हिया, टोयोटा कोरोला आणि ह्य़ुदाई इलांत्रा यांनी व्यापलेल्या सेदान वर्गवारीत सिव्हिक ही मौल्यवान भर ठरणार आहे.

रुंद व एअरोडायनॅमिक पवित्रा, स्पष्ट रेषा व आक्रमक नवीन डिझाईनसह सिव्हिक एका दणकट व आक्रमक शैलीसह अवतरली आहे. सिव्हिकच्या बाह्यरचनेमध्ये क्रोम फ्रण्ट ग्रिल, सिग्नेचर एलईडी हेडलाइट्स, एलईडी डेटाइन रनिंग लाइट्स आणि सी आकारातील टेल लॅम्प्स आहेत.

नवीन सिव्हिक भारतात पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिन प्रकारात उपलब्ध होत आहे. १.८ लिटर आय-व्हीटेक पेट्रोल मोटारीतून प्रति लिटर १६.५ किलोमीटर अशी इंधन कार्यक्षमता, तर १.६ लिटर आय-डीटेक टर्बो डिझेलद्वारे सरासरी २६.८ किलोमीटर प्रति लिटर इंधन कार्यक्षमता मिळविता येईल, असा कंपनीचा दावा आहे. उल्लेखनीय म्हणजे सिव्हिकची पॉवरट्रेन डिझेल आवृत्ती केवळ भारतीय बाजारात येऊ  घातली आहे. पेट्रोल वाहन हे ऑटोट्रान्समिशन (सीव्हीटी) प्रकारात तर डिझेल वाहन हे सहा वेगांच्या मॅन्युअल ट्रान्समिशन श्रेणीत उपलब्ध असेल.

उत्तम कामगिरीसोबत ड्रायव्हरला प्रतिक्रियाशीलतेचा अनुभव मिळावा यासाठी मॅकफेरसॉन स्ट्रट फ्रण्ट सस्पेन्शन विकसित करण्यात आले आहे. सिव्हिकचे नवीन रीअर सस्पेन्शन मोठय़ा स्थैर्यासह चपळ हाताळणीचा अनुभव देते. हा अनुभव सामान्य ड्रायव्हिंगदरम्यान तसेच आपत्कालीन परिस्थितीतही समान राहतो. गाडी पुढे २० मिमीने तर मागे १५ मिमीने वाढवण्यात आली आहे.

सिव्हिकच्या या नवीन अवतारात एकंदर आठ प्रकारची वैशिष्टय़े ही सेदान वर्गवारीत भारतीय ग्राहकांना अनुभवता येणार आहेत. सिव्हिकचे एकंदर बाह्यरूप आणि रचना मेटॅलिक रंगामुळे देखणी व चित्ताकर्षक बनली आहेच, तिचे एकंदर आकारमान (४६५६ मिमी लांबी आणि १७९९ मिमी रुंदी) पाहता अंतर्गत रचनेतही ऐसपैस आणि आरामदायी जागेची खातरजमा केली गेली आहे. २,७०० मिमी व्हीलबेस आणि पुढे आणि मागच्या बाजूला डिस्क्ससह १७ इंची अलॉय व्हील्समुळे गाडीला आपोआपच रुबाबदार रूपडे मिळाले आहे. मुख्यत: शहरातील रहदारीत सुरक्षित, सुस्थिर वाहन चालनाच्या अनुभूतीसह, रस्त्यांवर लक्षवेधी थाट मिरवायचा तर सिव्हिकची साथ हवीच! गाडीचे वजनही तुलनेने किमानतम, चालकासह सर्व प्रवाशांच्या सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त, डीआरएलसह एलईडी हेडलॅम्प्स त्याचप्रमाणे एलईडी टेललाइटचा झळाळता गुच्छ आणि इलेक्ट्रिक सनरूफ ही तिची आणखी काही वैशिष्टय़े आहेत. सिव्हिकच्या नव्या आवृत्तीतही इंटिरियर आकर्षक ठेवण्याकडे भर देण्यात आला आहे. गाडीत सात इंचाचा टच स्क्रीन पॅनल देण्यात आला आहे. ज्यात अँड्रॉइड ऑटो व अ‍ॅपल कारप्ले सुविधा देण्यात आली आहे. डय़ुअल झोन स्वयंचलित हवामान नियंत्रण, पॉवर ड्रायव्हर सीट, ऑटो ब्रेक होल्डसह इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, स्मार्ट स्टॉप बटनसह स्मार्ट एण्ट्री सिस्टम, रिमोट इंजिन स्टार्टर (पेट्रोल प्रकारात), ऑटो रेन सेन्सिंग फ्रण्ट वायपर्स त्याचप्रकारे गाडीत हिल कलाइम्ब असिस्ट, एबीएस, साइड मिरर कॅमेरा, स्मार्ट की सुविधा आदी सुविधा डब्यात आल्या आहेत.

श्रेणी आणि रंग

* नवी होंडा सिव्हिक पाच प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

*  पेट्रोल १.८ लिटर आय-व्हीटीईसी : व्ही-सीव्हीटी, व्हीएक्स-सीव्हीटी आणि झेडएक्स-सीव्हीटी

*  डिझेल १.६ लिटर आय-डीटीईसी टबरे : व्हीएक्स एमटी आणि झेडएक्स  एमटी

प्रगत सुरक्षितता

गाडी धडकण्याच्या विविध परिस्थितींचा विचार करून या परिस्थितींमध्ये उत्तम कामगिरी करता यावी यादृष्टीने सिव्हिक घडवण्यात आली असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. यामध्ये समोरच्या वाहनाशी बरोबरीने बसणारी धडक (ऑफसेट), वर्तुळाकार भागाला बसणारी धडक, बाजूने तसेच मागून होणारा आघात यांचा विचार करण्यात आला आहे. होंडाच्या अ‍ॅक्टिव्ह सेफ्टी, पॅसिव्ह सेफ्टी तसेच ड्रायव्हरला मदत करणारे फीचर्स आहेत.