विजय दिवाण

मणिपूर हे भारताच्या ईशान्य सीमेवरचे एक छोटे राज्य आहे. या सीमेवर मणिपूरच्या उत्तरेस नागालॅण्ड, दक्षिणेस मिझोराम आणि पश्चिमेस आसाम ही राज्ये आहेत. इम्फाळ हे मणिपूरचे राजधानीचे शहर असून, या राज्यात ‘मैतेयी’ वंशाचे लोक बहुसंख्येने राहतात. त्यांच्याशिवाय पांगन जमातीचे मुस्लीम लोक, काही नागा जमाती आणि पहाडी आदिवासींच्या कूकी जमातीही या राज्यात आढळतात. इम्फाळ हे शहर आता बऱ्यापैकी विकसित झाले आहे. या शहरात तिथल्या मैतेयी राजवंशाचा ‘कांगला’ हा राजवाडा आहे. तसेच सुमारे ५०० वर्षे जुना ‘इमा कैथेल’ हा केवळ महिलांनी चालवलेला एक मोठा बाजार आहे आहे.

इम्फाळला जाणारे अनेक पर्यटक हा केवळ महिलांनी चालवलेला आशियातील सर्वात मोठा बाजार पाहण्यासाठी जातात. तिथल्या सर्व दुकानांच्या मालकिणी महिलाच आहेत आणि दुकानांत कामगारही महिलाच आहेत. या गजबजलेल्या बाजारात दैनंदिन गरजेची धान्ये-कडधान्ये, भाज्या, फळे आणि इतर किराणा माल असे सर्व काही मिळते. तसेच तिकडच्या लोकांचे खाद्य असलेल्या शंखांच्या गोगलगायी, शिंपल्यांतले मृदुकायी जीव, टपोऱ्या अळ्या, जिवंत मासे यांसारखे प्रथिनयुक्त भक्ष्य-जीवही मिळतात. शिवाय तिथे मिळते अलीकडे दुर्मीळ होत चाललेले सुप्रसिद्ध ‘मणिपुरी मीठ’!

इम्फाळ शहराच्या आसपास काही छोटय़ा गावांमध्ये भूगर्भात खाऱ्या पाण्याचे अनेक गरम झरे आहेत. या गरम झऱ्यांतून निघणाऱ्या वाफा जमिनीतील भेगांतून वर येताना दिसतात. मणिपूरमध्ये पूर्वीपासूनच असे खाऱ्या पाण्याचे झरे जिथे कुठे आढळतील तिथे जमिनीत सहा फूट रुंद आणि तीस-चाळीस फूट खोल विहिरी खोदल्या जात. त्यामुळे भूगर्भातील त्या झऱ्यांचे खारे पाणी त्या विहिरींत साठत असे. नंतर हे खारे पाणी उपसून, ते भरपूर उकळून त्याचे पूर्ण बाष्पीभवन घडवून आणले जाई. त्या पाण्याची वाफ होऊन ती उडून गेली की खाली पांढरे शुभ्र मीठ शिल्लक राही. मग या मिठाच्या चकत्या करून त्या गावोगांवी विकल्या जात. इम्फाळच्या पर्वतीय खोऱ्यात गेली तीन शतके हा उद्योग अनेक गावांमधून केला जात असे. पण काळाच्या ओघात आता तिथे हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढय़ाच गावांत मीठ तयार करण्याची ही कला शिल्लक राहिली आहे.

चंद्रखोन्ग, नॉन्गब्रॅम, ‘निन्गेल’ ही इम्फाळ खोऱ्यातली काही गावे आहेत जिथे अजूनही असे मीठ तयार केले जाते आणि ते इमा कैथेल या महिलांनी चालवलेल्या बाजारात विक्रीसाठी पाठवले जाते. या बाजारात हे स्थानिक मीठ आठ इंच व्यासाच्या आणि पाऊण इंच जाडीच्या तबकडय़ांच्या रूपात विक्रीसाठी ठेवले जाते. एका तबकडीची किंमत दहा रुपये असते. काही दुकानांमधून या मिठाच्या छोटय़ा तबकडीसोबत मूठभर धान्यही दिले जाते. अलीकडे मोठमोठय़ा कंपन्यांनी भक्कम जाहिराती करून बाजारात आणलेली समुद्री मिठाची आयोडाइज्ड् पूड ही जास्त लोकप्रिय झाल्यामुळे मणिपूरमधील मध्यमवर्गीय समाजाने तिथल्या जमिनीतले हे पारंपरिक मीठ वापरणे बंद केले आहे, असे या इमा कैथेल बाजारातील विक्रेत्या सांगतात. या मिठाच्या उत्पादनातून मिळणाऱ्या मजुरीपेक्षा लोकरी शाली विणण्याच्या कामात जास्त कमाई होते, म्हणूनही अनेक मणिपुरी महिला आता मीठ तयार करण्याचा व्यवसाय सोडून आता शाली विणण्याचा व्यवसाय करू लागल्या आहेत. या स्थानिक मिठाचे उत्पादन कमी होण्याचे हेही एक कारण आहे.

अलीकडच्या काळात अनेक मणिपुरी मीठ उत्पादकांनी या पारंपरिक व्यवसायाला सरकारी आधार मिळावा अशी मागणी केलेली आहे. परंतु अद्याप तरी शासनाकडून तशी काही हालचाल झालेली दिसत नाही. या मिठाचे उत्पादन पाहणे, त्याची प्रक्रिया जाणून घेणे आणि इमा कैथेलमध्ये जाऊन ते खरेदी करणे हा मणिपूरला जाणाऱ्या पर्यटकांसाठी नेहमीपेक्षा वेगळा अनुभव ठरतो.