डॉ.अमोल देशमुख

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम मानसिक आरोग्यावरही होत असतो. ताणतणाव, चिंता, भीती यांसह विविध मानसिक विकारांमुळे शारीरिक आरोग्यही बिघडते. मानसिक विकारांवर मात कशी करावी हे सांगणारे सदर..

ताणतणाव..टेन्शन हे दैनंदिन जीवनात अगदी नियमितपणे उच्चारले जाणारे शब्द आहेत. ताण म्हणजे शरीरावर आणि मनावर अपेक्षांचे ओझे हे खरे, असे असले तरी  दैनंदिन जीवन जगण्यासाठी, आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी ताण गरजेचा आहे. या ताणाचे योग्य नियोजन केले की त्याचा त्रास होत नाही.

आपली मानसिक प्रतिकारक्षमता

अकार्यक्षम होते तेव्हा निर्माण होतो तो ताण. ताण दोन प्रकारचा असतो- योग्य ताण आणि अतिताण. अति ताणाचेही दोन प्रकार आहेत. एक म्हणजे अतिजास्त किंवा अतिकमी ताण. जो ताण तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्यासाठी मदत करतो तो योग्य ताण.

जो ताण तुम्हाला तुमच्या ध्येयापासून परावृत्त करतो आणि मनात नकारात्मक विचारांचे  आणि भावनांचे काहूर माजवतो तो असतो अतिताण. प्रत्येकाची उद्दिष्टे वेगवेगळी असू शकतात. अगदी परीक्षा देण्यापासून ते एव्हरेस्टवर चढण्यापर्यंत. अतिताणाची अवस्था टिकून राहिल्याने आपल्या शरीरात सूक्ष्म स्वरूपात रासायनिक बदल होतात. शरीरात स्रवणारी कॉर्टिसोल, सेरेटोनिन इत्यादी रसायने प्रामुख्याने शॉक ऑब्जव्‍‌र्हर म्हणून काम करतात. ही रसायने ताणाचे तीव्र परिणाम शरीरावर जाणवू देत नाहीत. जेव्हा सतत ताण वाढत जातो, तेव्हा या रसायनांच्या पातळीमध्ये कमतरता भासत जाते आणि कालांतराने अतिताणाचे शरीरावर परिणाम दिसायला लागतात.

ताणाची पातळी

शरीरावर चार पातळीमध्ये अतिताणाचे परिणाम हळूहळू दिसायला लागतात. जसे की वैचारिक, भावनिक, वर्तणुकीची आणि शारीरिक पातळी. अतिताण टिकून राहतो, तेव्हा तो आपल्या वैचारिक पातळीवर परिणाम करतो. म्हणजेच आपल्याला निर्णय घेताना अडचणी येतात, एकाग्रतेचा अभाव जाणवतो, समस्या सोडवण्याचे कौशल्य कमी होते. लक्ष विचलित होते किंवा आपण परिणामांची खूप काळजी करायला लागतो.

ताण भावनिक पातळीवर परिणाम करायला लागतो, तेव्हा आपण विनाकारण काळजी करायला लागतो. हळवेपणा आपल्याला जाणवतो, अविश्वास वाढतो, उदासीनता जाणवते किंवा विनाकारण राग येतो. अतिताण हळूहळू शरीरावरही परिणाम करायला लागतो. जसे की अपचन, सततची डोकेदुखी, सतत दुखणे किंवा मधुमेह-रक्तदाब यांसारख्या समस्या वाढायला लागतात. त्याचा वागणुकीवर परिणाम होताना दिसतो. आपण टाळाटाळ करायला लागतो, कधीकधी आक्रमक होतो किंवा एकलकोंडे होतो.

फार पूर्वीच्या काळात तणावाची मनुष्य जीवनात जीवशास्त्रीय कारणे  होती, पण जसजसा समाज प्रगत होत गेला आणि आधुनिकीकरणाकडे वळाला, तेव्हा यासोबतच मानसशास्त्रीय आणि सामाजिक कारणे तणाव आणि त्या निगडित समस्या उत्पन्न करण्यासाठी महत्त्वाची ठरत

आहेत. सध्याची तणावाची कारणे थोडक्यात बघितली तर वेळेची मर्यादा, आयुष्यातील बदल जसे की घटस्पोट, गर्भधारणा, आजारपण, टीका-टिप्पणी, नात्यांमधील असुरक्षितता, भांडण, अपेक्षांचे ओझे, तुटत चाललेला संवाद, व्यसन इत्यादी.

योग्य व्यवस्थापन गरजेचे ताणाचे शरीरावरही परिणाम होतात. बऱ्याचदा वैद्यकीय चाचण्या केल्यानंतरही शारीरिक त्रासाचे निदान होत नाही. अशावेळी सततचा तणावसुद्धा शारीरिक लक्षणांना जबाबदार असू शकतो. यासाठी तणावाचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.