आशुतोष बापट

शनिवार

शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरीला जावे. किल्ला आणि त्याच्या पोटात असलेल्या लेणी पाहाव्यात. जुन्नर परिसरात जवळजवळ १६५ लेणी आहेत. पुढे जवळच असलेल्या तुळजा लेणीला जावे. ही लेणी सर्वात प्राचीन समजली जाते. नंतर नारायणगाव रस्त्यावर यावे आणि तिथून भूतनाथ आणि अंबिका लेणी पाहाव्यात. अप्रतिम कोरीव काम. सहजसोपा रस्ता आहे. या लेण्यांचे आवार आणि मुखदर्शन (फसाड) मुद्दाम पाहण्याजोगे. संध्याकाळी लेण्याद्रीला जावे. हे पण एक लेणेच आहे. गजाननाचे दर्शन घेऊन त्या डोंगराला लागून असलेल्या सुलेमान लेणीत जावे.

रविवार

नाणेघाटकडे निघावे. पूर गावी कुकडेश्वराचे १२ व्या शतकातील शिल्पसमृद्ध शिवालय पाहावे. नाणेघाटातील सातवाहन राणी नागनिकाने कोरलेले लेणे, भिंतीवरील शिलालेख पाहावा. डोंगराच्या माथ्याला नानाचा अंगठा म्हणतात. तिथून कोकणचे दृश्य अप्रतिम दिसते. जवळच्या भोरांडे गावी जाऊन डोंगराला पडलेले नैसर्गिक दार पाहावे. ट्रेकिंगची हौस असणाऱ्यांना हडसर, चावंड, जीवधन, दुर्ग, धाकोबा, निमगिरी, सिंदोळा, हटकेश्वर ही ठिकाणे खुणावतात. इंगळून मार्गे दुर्गच्या डोंगरावर आता गाडी रस्ता आहे. तिथून दुर्गला जावे. वाटेत धातूचा नाद येणारे मोठे खडक आहेत. पारुंडे ब्रह्मनाथ, वडज खंडोबा, रेणुका ही देवस्थाने आहेत. परिसर खास वेळ काढून पाहावा.

ashutosh.treks@gmail.com