वैभव भाकरे

नवी कोरी गाडी घेण्याआधी बरेच लोक ‘हातसाफ’ करून घेण्यासाठी सेकंड हॅन्ड कार विकत घेण्याचा पर्याय निवडतात. कार विकत घेतल्यावर आपल्याला ती कशा प्रकारे सांभाळायची? तिला काय मेंटेनन्स लागतो? पेट्रोल किंवा डिझेलवर किती खर्च होणार? असे असंख्य प्रश्न असतात. आपल्या गरजेनुसार कुठल्या श्रेणीतील गाडी योग्य ठरेल याचा अंदाज घेण्यासाठी सेकंड हॅन्ड कारचा पर्याय अगदी चांगला आहे.

बहुतांश लोक पहिली कार घेताना सेकंड हॅन्ड कार विकत घेणे पसंत करतात. भारतात सेकंड हॅन्ड कारचा बाजार भरपूर मोठा आहे. सध्या सेकंड हॅन्ड कारचे युज्ड कार असे नामकरण झाले आहे. कारची श्रेणी, इंजिनचा प्रकार (पेट्रोल किंवा डिझेल) यानुसार सेकंड हॅन्ड कारच्या बाजाराचे वर्गीकरण करण्यात येते. सेकंड हॅन्ड कार बाजाराच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर एन्ट्री सेगमेंट कारप्रमाणेच लक्झरी श्रेणीतील सेकंड हॅन्ड कारच्या बाजाराचा झपाटय़ाने विस्तार होतोय. २०१७मध्ये लक्झरी श्रेणीमधील गाडय़ांची विक्री ही नव्या लक्झरी कारच्या तुलनेने दुपटीने वाढली असल्याचा अहवाल एप्रिल महिन्यात आला होता. सेकंड हॅन्ड कार या पूर्णत: नवीन ग्राहक वर्गाला आकर्षित करतात. तुम्ही सेकंड हॅन्ड कार एखाद्या डिलरकडून विकत घ्या अथवा तुमच्या परिचयातील कुणा व्यक्तीकडून, काही गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायला हवी.

सेकंड हॅन्ड कार असो वा नवीन पहिली गाडी विकत घेणे प्रत्येकासाठी खूप महत्त्वाची बाब आहे. सर्वप्रथम कुठली गाडी विकत घ्यावी हे पक्के करावे लागते. त्यानंतर सर्वाधिक महत्त्वाचा टप्पा म्हणजे गाडीची कागदपत्रे पूर्ण आहेत का याची तपासणी करणे.

सध्या अनेक संकेतस्थळे सेकंड हँड कार विकत असून संकेतस्थळाच्या माध्यमातून सेकंड हॅन्ड कार विकत घेण्याकडे लोकांचा कल वाढत चालला आहे. अशा संकेतस्थळावरून कार विकत घेताना जास्त दक्षता घ्यायची गरज असते. अशा प्रकारे गाडी घेण्याचा अनुभव नसेल, तर आपल्या परिचित व्यक्तींशी व्यवहार करणे अधिक सोयीस्कर ठरते.

गाडी पाहायला जाताना आपल्या विश्वासातला मेकॅनिक किंवा गाडय़ांबाबत माहिती असणाऱ्या मित्राला घेऊन जाणे फायद्याचे ठरते. यामुळे गाडी कुठल्या अवस्थेत आहे, आणि त्यात काय समस्या आहेत हे कळते. कुठल्याही भागात बिघाड असल्यास तुम्ही त्या गाडीच्या विRेत्याकडून दुरुस्ती करून घेऊ  शकतात. गाडीच्या एकंदर स्थितीचा अंदाज आल्यावर तिची किंमत ठरवणे सोपे जाते.

गाडीच्या विम्याची कागदपत्रे तपासून पाहा. यामुळे गाडीला अपघात झाला आहे का? किंवा पूर्वी कोणत्या कारणांसाठी विम्यासाठी दावा केला आहे याची माहिती कळते. इंजिन क्रमांक, चॅसी क्रमांक आणि गाडीचा नोंदणी क्रमांक एकच आहे का नाही हे तपासून पाहा.

ऑइल, एअर, ट्रान्समिशन, इंधन हे सर्व फिल्टर तपासून पाहा. शक्य असल्यास ते बदलून टाका. हे सर्व फिल्टर नियमित स्वच्छ करणे आवश्यक आहे. यावरून गाडीची काळजी कशा प्रकारे घेण्यात आली आहे याचा तुम्हाला अंदाज येईल. सर्व टायर तपासून घ्या. त्याचबरोबर सर्व टायर एकाच प्रमाणात झिजले आहेत का याची खात्री करून घ्या. यामुळे गाडीला नवीन टायर लावला असल्यास तुम्हाला लगेच कळेल.

गाडीच्या बोनेटखाली गंज चढला आहे का? किंवा डेन्ट आहे का हे बघा. अशा प्रकारची कुठलीही गोष्ट आढळणे म्हणजे कारची चांगल्या प्रकारे काळजी न घेतल्या गेल्याचे संकेत आहेत. गाडीचा मूळ रंग बदलला तर नाही ना याची खात्री करा.

गाडीचा अंदाज येण्यासाठी किमान दहा किमी अंतरापर्यंत गाडी चालवा. यावेळी गाडीचे ब्रेक्स तपासून पाहा. गाडी वेगात असल्यावर वायब्रेशन जाणवत नाही ना याची खात्री करून घ्या. गाडीचे इंजिन प्रवासात किती आवाज करते याचा अंदाज गाडी चालवताना येतो.

घरी नेण्याआधी गाडी आतून आणि बाहेरून स्वच्छ करून घ्या. शक्य असल्यास स्टीम क्लीन करून घेण्याचा पर्याय वापरा.

जरा मेहनत घेऊन शोध घेतलात, तर तुम्हाला चांगल्या प्रकारे हाताळलेली गाडी मिळू शकते.

एकदा तुमच्या पसंतीची गाडी मिळाल्यावर पुढचा टप्पा आहे तो कागदपत्रे पूर्ण आहेत का नाही हे तपासण्याचा. गाडीची आरसी नोंदणी हस्तांतरित झाल्यावर गाडीचा विमा तुमच्या नावावर करून घ्या. शक्य असल्यास गाडीचा नवीन विमा काढून घेणे उत्तम. आधीच्या मालकाने गाडी व्याजावर घेतली असल्यास गाडीवर हफ्ते शिल्लक आहेत का याची पूर्ण माहिती मिळवा.

गाडीत सीएनजी लावला असेल तर तो मान्यताप्राप्त उत्पादकाचा आहे का याची चौकशी करा. त्याचप्रमाणे प्रादेशिक परिवहन विभागाची परवानगी घेतली आहे का याबाबत विचारणा करा. गाडीचे पीयूसी प्रमाणपत्र घ्या. गाडीच्या सर्विसिंगची कागदपत्रे तपासून बघा. यामुळे गाडी नियमित सर्विसिंग केली आहे का, त्याचबरोबर याआधी गाडीत काय बिघाड झाला आहे याची माहिती तुम्हाला मिळेल.

गाडी पसंत आहे आणि कागदपत्र पूर्ण असल्यावर गाडीच्या किमतीबाबत तडजोड करा. जर कार डीलरकडून विकत घेत असाल तर काही सवलत उपलब्ध आहे का याची माहिती घ्या. गाडी चांगल्या स्थितीत असेल तर वाजवी किमतीहून कमी दरात गाडी मिळवण्याचा अट्टहास करू नका. गाडीवर अवाजवी सवलत असल्यास किंवा गाडीची किंमत तुम्हाला जास्तच कमी वाटत असेल तर सतर्क व्हा. पुन्हा एकदा शांतपणे गाडीची कागदपत्रे तपासून पाहा. मनात शंका असल्यास सौदा रद्द करून टाका. तुम्ही पूर्णपणे समाधानी असल्यानंतरच सौदा पक्का करा.

हे लक्षात ठेवा

* गाडी एखाद्या डीलरकडून घेत असाल तर तो अधिकृत आहे का ते पाहा.

* गाडी स्वत: चालवून पाहा.

* गाडी किती अंतर चालली आहे ते बघा.

* गाडीची नोंदणी कोणत्या वर्षांची आहे याकडे लक्ष द्या. यावरून गाडीची योग्य किंमत ठरते.

* गाडीची हेडलाइट, टेललाइट, इंडिकेटर, वातानुकूलन यंत्रणा सुरळीत काम करते आहे का हे तपासा.

vaibhavbhakare1689@gmail.com