वैभव भाकरे     

नवी कार विकत घ्यायची असो वा जुनी, तिची टेस्ट ड्राइव्ह घेणे हे गाडीची क्षमता समजून घेण्याचा मुख्य मार्ग आहे. म्हणूनच सर्व मोटारतज्ज्ञ गाडी विकत घेण्याआधी गाडीची टेस्ट ड्राइव्ह घेण्याचा सल्ला देतात. मात्र ही टेस्ट ड्राइव्ह घेताना नेमक्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे याबाबत अनेक जण अनभिज्ञ असतात. परंतु आधीच योग्य तयारी असल्यास तुमच्यासाठी योग्य गाडी तुम्हाला निवडता येते.

नवी गाडी घेताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो. त्यामुळे कोणती गाडी घ्यायची हे अनेकांनी शोरूममध्ये जाण्याआधीच ठरवलेले असते. गाडीची किंमत, अ‍ॅव्हरेज या प्रकारच्या आपल्या प्राथमिक निकषांनुसार गाडी योग्य ठरत असली की टेस्ट ड्राइव्ह ही निव्वळ औपचारिकता म्हणून राहते. त्यामुळे सहसा टेस्ट ड्राइव्हकडे आवश्यकतेनुसार लक्ष दिले जात नाही आणि टेस्ट ड्राइव्हचा उद्देश डावलला जातो. सध्या बाजारात गाडय़ांचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. एकाच कारच्या तीन ते चार मॉडेलचा पर्याय ग्राहकांना दिला जातो. काही वेळा गाडीमधील सुविधांमध्ये बदल असतात, तर काही वेळेस इंजिनमध्येदेखील थोडय़ा फार प्रमाणात बदल आढळून येतो. म्हणून गाडी आपल्याला साजेशी आहे की नाही, हे पाहण्यासाठी स्टिअरिंगवर हात अजमावणे कधीही योग्य.

गाडी घेताना सर्वच लोक गाडीची प्राथमिक माहिती गोळा करतात. गाडीची किंमत, तिचे इंजिन, अ‍ॅव्हरेज, लुक्स या सर्वच गोष्टी विचारात घेतल्या जातात. कोणती गाडी घ्यायची ही यादी मोठी असल्यास गोंधळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे दोन ते तीन गाडय़ांच निश्चित करा. एकाच दिवशी या सर्व गाडय़ांची टेस्ट ड्राइव्ह घेतल्यास लगेचच या गाडय़ांची तुलना तुम्हाला करता येते. गाडीच्या टेस्ट ड्राइव्हला जाण्याआधी वेळ ठरवूनच जा. त्यामुळे कोणत्याही अनपेक्षित कारणामुळे तुमचा खोळंबा होणार नाही. काही वेळेस आपल्याला हव्या असलेल्या मॉडेलचा व्हेरियंट उपलब्ध नसतो. त्यामुळे आधी वेळ घेऊन आपल्याला अपेक्षित मॉडेलची टेस्ट ड्राइव्ह बुक करणे फायद्याचे ठरते. जी गाडी खरेदी करण्याचा मानस आहे त्याच मॉडेलच्या  व्हेरियंटची टेस्ट ड्राइव्ह घ्या. उदाहरणार्थ, मॅन्युएल ट्रान्समिशनची गाडी घेताना ऑटोमॅटिकची टेस्ट ड्राइव्ह घेऊ  नका. या गाडय़ा चालवण्यामध्ये भरपूर फरक असतो. यामुळे तुम्हाला अपेक्षित अनुभव मिळणार नाही.

गाडी घेण्याआधी गाडीचे ‘रिव्हय़ू’ पाहिले जातात. विविध संकेतस्थळांवर गाडय़ांची तुलना केली जाते. कंपनीने केलेल्या दाव्यांचा बारकाईने अभ्यास करण्यात येतो. म्हणून बऱ्याच वेळा गाडी चालवताना आपल्याला काय वाटते याहून अधिक गाडीच्या रिव्हय़ूशी आपण आपल्या अनुभवाची तुलना करतो. त्यामुळे उगाच एखाद्या गाडीबद्दल मनात पूर्वग्रह ठेवू नका. टेस्ट ड्राइव्ह ही गाडी टेस्ट करण्यासाठीच असते. कदाचित इतरांनी नाक मुरडलेली गाडी तुम्हाला आवडून जाईल.

गाडीची टेस्ट ड्राइव्ह घेताना शोरूमचा कर्मचारी तुम्हाला त्याने ठरवलेल्या मार्गावरून नेण्याचा प्रयत्न करीत असल्यास ते जाणीवपूर्वक टाळा. गाडीची पूर्ण क्षमता तपासण्यासाठी वेगळ्या मार्गावर गाडी नेण्याबाबत कर्मचाऱ्याला समजावून सांगा. ज्या प्रकारच्या रस्त्यांवरून तुम्ही रोज प्रवास करता त्या प्रकारच्या रस्त्यांवर टेस्ट ड्राइव्ह घ्या. जर तुम्हाला कामानिमित्त महामार्गावरून प्रवास करावा लागत असेल तर टेस्ट ड्राइव्हसाठी गाडी महामार्गावर न्या. यावरून तुम्हाला गाडीची वेग घेण्याची क्षमता कळून येईल. त्याचप्रमाणे रोजच्या ट्राफिकमध्ये गाडी कशा प्रकारे काम करील याचा अंदाज येईल.

वेग वाढवल्यावर इंजिनचा आवाज किती येतोय? टायरचा आवाज किती येतोय. गाडीचे केबिन शांत आहे की नाही याकडे लक्ष द्या. गाडी खड्डे असलेल्या रस्त्यांवर कशा प्रकारे चालतेय हे पाहा. खराब रस्त्यांवर चालवण्यासाठी गाडीचे सस्पेंशन सक्षम आहे का याची खात्री करून घ्या.

सध्या गाडय़ांमध्ये ब्लूटूथ, टच स्क्रीन अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. या सर्व गोष्टी कशा प्रकारे काम करीत आहे ते पाहून घ्या. गाडीच्या ब्लूटूथला फोनशी जोडल्यावर आवाज स्पष्ट ऐकू येतोय की नाही याची खात्री करा. गाडीतील टच स्क्रीन यंत्रणा एकदा वापरून पाहा. टच स्क्रीनची यंत्रणा वापरण्यास सुरुवात केली तर अगदी सहज हाताळता येते. तरीही त्याचा युजर इंटरफेस रोजच्या वापरासाठी जास्त किचकट तर नाही ना, ते पाहा. त्यावर आवश्यक पर्याय लगेच उपलब्ध होत आहेत का याची खात्री करून घ्या.

गाडीला बॅकअप कॅमेरा असल्यास त्यातून स्पष्ट दिसतेय का ते पाहा. गाडीला योग्यरीत्या मागे घेण्यासाठी त्यावर काही निर्देशांचा पर्याय आहे का ते पाहा.

हे लक्षात ठेवा

* जेव्हा तुमच्याकडे जास्त वेळ असेल तेव्हा गाडी टेस्ट ड्राइव्हसाठी घेऊन जा.

*  टेस्ट ड्राइव्हदरम्यान किंवा आधी गाडीबाबत कोणतेही प्रश्न असल्यास ते विचारण्यास संकोच बाळगू नका.

*  गाडीत पाय ठेवण्यास किती जागा आहे का? लोकांना बसण्यासाठी गाडीत पुरेशी जागा आहे की नाही हे पाहा.

* त्याचप्रमाणे गाडीच्या आकाराचा अंदाज घेऊन आपल्या पार्किंगच्या जागेत गाडी व्यवस्थितरीत्या उभी राहू शकेल ना, ते पडताळून पाहा.

*  गाडी केवळ मोकळ्या रस्त्यांवर न चालवता मुख्य रस्त्यांवर नेऊन ट्रॅफिक असलेल्या भागातही चालवून बघा.

*  टेस्ट ड्राइव्हच्या वेळेस ड्रायव्हरच्या सीटसह मागील सीटवरदेखील बसून पाहा. यामुळे तुम्हाला मागे बसणाऱ्यांना लांबच्या प्रवासात काही अडचण येईल का हे पाहता येईल.

*  वातानुकूलन यंत्रणा सुरू केल्यावर गाडीच्या वेगावर काही परिणाम होतोय का ते पाहा.

*  टेस्ट ड्राइव्हला जाताना एकटे जाऊ  नका. ज्या व्यक्तीला गाडय़ांबद्दल चांगली माहिती आहे, त्यांना सोबत घ्या.

vaibhavbhakare1689@gmail.com