ऋषिकेश मुळे

दिवसेंदिवस तंत्रज्ञानात प्रगती होत आहे. ‘जुने ते सोने’ ही चाकोरीबद्ध चौकट मोडून तंत्रज्ञान ‘नव्याची नवलाई’ जगासमोर आणत आहे. सातत्याने मानवी संशोधनाची जोड ही आधुनिक तंत्रज्ञानाला मिळत असून तंत्रज्ञानाशी निगडित नवनव्या गोष्टी बाजारात येऊ लागल्या आहेत. या गोष्टी, उपकरणे कोणत्या ठरावीक गॅझेटच्या श्रेणीतील नसतात तर ती इतर  गॅजेटना बळ देत असतात. अनेकदा तर असे काही  गॅजेट असतील का, याचीही आपल्याला शंका येते. अशाच काही गॅजेटच्या नवलाईविषयी..

पॉवर शेअर

अनेकदा मोबाइलची बॅटरी संपते अशा वेळेस अनेक जण पोर्टेबल बॅटरीचा आधार घेतात. मात्र समजा ऐन वेळी तुमच्याकडे पोर्टेबल बॅटरीही नसेल तर?.. प्रश्न पडला ना? पण तुमच्यासाठी एक नवीन गॅझेट उपलब्ध झाले आहे. ‘पॉवर शेअर’ नावाचे हे गॅझेट बाजारातील अनेक दुकानांत उपलब्ध आहे. साध्याशा ‘पेन ड्राइव्ह’सारख्या दिसणाऱ्या कनेक्टरमधून एका मोबाइलद्वारे दुसऱ्या मोबाइलची चार्जिग या पॉवर शेअर गॅझेटद्वारे करता येते. या पॉवर शेअर गॅझेटद्वारे मोबाइलमधील माहिती, फोटो, गाणी यांसारखा संग्रह हा एका मोबाइलमधून दुसऱ्या मोबाइलमध्ये घेता येतो.

* किंमत- ५०० ते १००० रुपये

मिनी प्रोजेक्टर

आजकाल शाळा, कॉलेज, व्यावसायिक क्षेत्र यांसारख्या विविध ठिकाणी प्रोजेक्टरचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातो. मात्र अनेकदा काही तांत्रिक कारणांमुळे प्रोजेक्टर बंद पडतो. अशा वेळी जुगाडू मिनी प्रोजेक्टर कामी येतो. मिनी प्रोजेक्टर म्हणजे पॉवर बँकसारखे दिसणारा आणि शर्टाच्या खिशात सहज मावणारा असा हा प्रोजेक्टर कुठेही नेता येऊ  शकणारा आहे. दिवसेंदिवस यामध्ये थ्रीडी गुणवत्ता देणारे मिनी प्रोजेक्टर बाजारात उपलब्ध होऊ लागले आहेत. सहजरीत्या हा मिनी प्रोजेक्टर लॅपटॉप, संगणक किंवा मोबाइलला जोडून प्रोजेक्ट करता येतो.

* किंमत- ५ हजारांपासून पुढे

सेल्फी स्टिक कम मोनोपॉड

तरुणांमध्ये सेल्फीची आवड ही काही जुनी नाही. सेल्फी काढताना सोयीस्करता यावी याकरिता सेल्फी स्टीक बाजारात आले. मात्र अनेकदा काहींना सेल्फी व्हिडीओदेखील घ्यायचा असतो. अशा वेळेस सेल्फी स्टीक कामी येत नाही. मात्र यावर जुगाड म्हणून सेल्फी स्टिक कम मोनोपॉड बाजारात उपलब्ध आहेत. सेल्फी स्टिकसारखा सेल्फी स्टॅण्डच्या माध्यमातून आपल्याला फोटो आणि व्हिडीओ दोन्ही चित्रित करता येते. अनेकदा व्हिडीओ शूटिंग करताना हातात कॅमेरा धरला तर तो हलतो आणि व्हिडीओची गुणवत्ता चांगली येत नाही. त्यामुळे यावर उपाय म्हणून सेल्फी स्टिक कम मोनोपॉडचा चांगल्या प्रकारे उपयोग केला जातो. एखाद्या कार्यक्रमाचे याद्वारे चांगले चित्राकरण करता येते.

* किंमत- ७०० ते १००० रुपये

मोबाइल होल्डर

सध्या अनेकांच्या मोबाइलच्या मागच्या बाजूला एक गोल आकाराचे होल्डर पाहायला मिळते. फॅशन म्हणून किंवा मोबाइल आकर्षित दिसावा म्हणून तरुणाई मोबाइलच्या मागच्या बाजूला एक गोल आकाराचा छोटा स्टॅण्ड लावतात. मात्र या फॅशनसोबत त्याचा वेगळा उपयोग आहे. मोबाइल धरताना पडू नये यासाठी या होल्डरचा प्रामुख्याने वापर होतो. आज प्रत्येकाची जीवनशैली ही वेगाची झाली आहे. ट्रेनमधून प्रवास करताना प्रत्येकाला मोबाइलचा वापर करावा लागतो, मात्र गर्दीमुळे मोबाइल पडण्याची दाट शक्यता असते अशा वेळेस या ‘मोबाइल होल्डर’चा वापर करण्यात येतो. हाताच्या दोन बोटांमध्ये मोबाइल व्यवस्थितपणे धरता येत असल्याने कितीही गर्दी असली तरी मोबाइल हातातून पडत नाही. वेगवेगळ्या रंगांचे, चित्रांचे हे होल्डर बाजारात उपलब्ध आहेत.

* किंमत- ५० ते १०० रुपये

आजकाल अनेक व्यक्तींना धावताना, व्यायाम करताना गाणी ऐकण्याची सवय असते. गाणी ऐकण्यासाठी हेडफोन्स्चा वापरही अनेक जण करतात. मात्र धावत असताना हेडफोन्स् सतत कानातून पडतात. त्यामुळे गाणी ऐकण्यात आणि व्यायाम करण्यात व्यत्यय येतो. मात्र आता यावर उपाय म्हणून जुगाडू वायरलेस स्पोर्टी हेडफोन्स् बाजारात उपलब्ध होत आहेत. हे हेडफोन्स् गळ्यात तसेच कानात अडकवून कोणत्याही व्यत्ययाविना व्यायाम करता येतो. या हेडफोन्स्द्वारे फोनवर संपर्कदेखील साधता येतो. तसेच ब्लूटूथ यंत्रणादेखील या हेडफोन्स्मध्ये आहे. वायरलेस असणारे या हेडफोन्स्ची सध्या बाजारात मोठी मागणी आहे. यामध्ये मायक्रो इयरफोन्स्देखील बाजारात उपलब्ध आहे. नाण्याच्या आकाराचे असणारे हे हेडफोन्स धावताना खूप उपयोगात येतात.

* किंमत- २ हजारांपासून पुढे

चार्जिग प्लग होल्डर

आज नवीन मोबाइल आला की मोबाइलसोबत त्याच्या नव्या चार्जरचेही महत्त्व वाढले आहे. मोबाइल हाती आल्यानंतर चार्जिग वायर किती मोठय़ा लांबीची आहे यावरून अनेकांचे मूड हे बदलत असतात. आजकाल अनेक चार्जिग वायर या कमी लांबीच्या मिळतात. त्यामुळे मोबाइल चार्जिग प्लगजवळ ठेवण्यासाठी जागाच उपलब्ध होत नाही. मात्र यावर उपाय म्हणून एक वस्तू बाजारात आहे, ती म्हणजे ‘चार्जिग प्लग होल्डर’. चार्जिगची वायर कमी असल्याने चार्जिग प्लगच्या बाजूला मोबाइल ठेवण्यासाठी अनेकदा कोणतीच जागा उपलब्ध नसते. या वेळी ‘चार्जिग प्लग होल्डर’ कामी येते. प्लगमध्ये चार्जिग स्टॅण्ड अडकवून मोबाइल चार्जिगला लावता येतो. यामुळे मोबाइलवर कोणाचा फोन आल्यानंतरही मोबाइल पडण्याची शक्यता नसते. या होल्डरमध्ये असणारे विविध रंग हे घराची शोभा वाढवण्यात सुद्धा मदत करते.

* किंमत- ८० ते १०० रुपये