नमिता धुरी

कामाच्या धबडग्यात हरवून गेलेल्या व्यक्तींना कदाचित हा दिवस म्हणजे शुद्ध बालिशपणा वाटेल. पण जरा मागे जाऊ न कॉलेजचे दिवस आठवले तर लक्षात येईल की, हा बालिशपणा आपल्यापैकी बऱ्याच जणांनी कधी ना कधी केलेला असतो. मुलगी ‘हो’ म्हणाली तर आयुष्यभराची साथ मिळते, पण ‘नाही’ म्हणाल्यावर झालेली फजिती, मित्रांनी केलेली चेष्टा आणि मनातून झालेले दु:ख या गोष्टी कायमच लक्षात राहतात.

कॉलेजचा कट्टा, कॅम्पस, कॅण्टीन अन् त्या गर्दीतला ‘तो’ आणि गर्दीतली ‘ती’. तो थोडा खटय़ाळ, ती थोडी सलज्ज. त्या दोघांवर अर्थात बघ्यांच्या नजराही खिळलेल्या. काही नजरांमध्ये काहीच अपेक्षा नाही. वावगं काही घडतंय वा केलं जातंय, असा भावही नाही. तर काहींची ती चेष्टेखोर नजर अगदी नकोशीच. पण त्याची पर्वा कोण कशाला करतोय. मनाच्या तळाशी साठलेलं ओठांवर आणण्यासाठी इतके दिवस ज्या दिवसाची वाट पाहिली तो प्रेम व्यक्तविण्याचा दिवस, अर्थात ‘व्हॅलेन्टाइन डे’.

बऱ्याच मुली सैन्यदलात नोकरी मिळविण्याच्या वाटेवर असलेल्या अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेतील (एनसीसी) विद्यार्थ्यांच्या प्रेमात पडतात. यात काही जणींचा आटापिटा इतका, की भावी जवानाची नजर एकदा तरी आपल्यावर पडावी म्हणून सदैव ‘दक्ष’ असतात. त्यानं ‘बाए मुड’ म्हटलं की या चालल्या गुलाब घेऊ न उजव्या बाजूला. पण करणार काय, हिंदीचा गोंधळ. ‘बाए’ म्हणजे ‘डावा’ हे लक्षातच येत नाही. मग हिच्याकडे पुन्हा पाठच. असे एक ना अनेक किस्से तरुणाईच्या मनात कुठे तरी घर करून राहतात. दर वर्षी ‘व्हॅलेन्टाइन डे’ला त्यांची आठवण आल्यावाचून राहत नाही.

महाविद्यालयातील पहिला दिवस आणि उशीर झालेला घाई-घाईत वर्ग शोधत असताना एका मुलीला धक्का लागला. मग मी ‘सॉरी’ बोलून पुढे गेलो. असं वाटलं की, आपल्याला माफ केलं गेलंय. धक्का लागलेल्या ‘ती’ची मैत्रीण माझ्या वर्गात होती आणि माझा मित्र तिच्या वर्गात होता. त्यामुळे पुढे आमच्यात चांगली मैत्री जुळली. मग दोघांत तासन्तास गप्पांना सुरुवात झाली. आमच्या दोघांच्या आवडी-निवडी सारख्याच. महाविद्यालयीन कार्यक्रमांत एकत्र, फिरायला एकत्र जात असू. मला वाटलं आमच्यात काही तरी आहे आणि ते प्रेमच आहे हे माझ्या मित्राने मला पटवून दिलं होतं. म्हणून मी येत्या व्हॅलेन्टाइनला तिला प्रपोज करण्याचं ठरवलं. त्यासाठी जय्यत तयारी केली, वर्गात ती ज्या जागेवर बसायची तो बाक सजवला, गिफ्ट ठेवलं, फुलं, पेस्ट्री असा सर्व तामझाम केला. मात्र तिने आम्हाला कॉलेजबाहेर एका कॅफेमध्ये बोलावलं, मला बाहेरच्या काचेतून दिसलं तिच्या हातात लाल गुलाब होते. मी लगेच केस सरळ केले आणि आत्मविश्वासाने तिच्याजवळ जात होतो, तर तिने आम्हाला पाहताच उठून उभी राहिली आणि माझ्या मित्राजवळ जाऊन त्याला गुलाब दिले, आपलं प्रेम व्यक्त केलं आणि मला त्यासाठी थँक्यू म्हटलं, कारण माझ्यामुळे तिला माझा मित्र किती चांगला आहे हे समजलं आणि पटलं. हाच तो तिचा खरा पार्टनर.. खूप वाईट वाटलं, हृदय तुटणं काय असतं, ते तेव्हा समजलं. मात्र मी हसत होतो आणि मनातून रडत पण मग मी तिकडून पळ काढला तिच्या वर्गात जाऊन सर्व स्वच्छ केलं आणि थेट घरी पळालो, ही समीरने त्याच्या आयुष्यात २०१० साली घडलेली घटना सांगितली.

हॉटेल मॅनेजमेंटमध्ये शिकणाऱ्या नेहा सकपाळ आणि जयंत व्हावळे यांच्याकडेही प्रेमाच्या अशाच काही गोड आठवणी आहेत. खरं तर हे दोघे लहानपणापासूनचे मित्र. पण पाचवीनंतर जयंतचं राहण्याचं ठिकाण बदललं. त्यानंतर दोघांची भेट झाली ती थेट आठ वर्षांनंतर कॉलेजमध्ये. नेहाला त्याच्याविषयी प्रचंड कुतूहल होतं. मात्र जयंत साधं हाय-हॅलोसुद्धा करायचा नाही. नेहाने हिंमत करून स्वत:च बोलायला सुरुवात केली. नंतर काही कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या भेटीगाठी झाल्या. मात्र जयंत त्याच्या भावना लपवत होता. नेहाने मग थेटच प्रश्न केला. ‘प्रेम करतोस माझ्यावर, लग्न करशील माझ्याशी?’ यावर साधारण हो, नाही किंवा विचार करतो वगैरे उत्तरं तिला अपेक्षित होती. मात्र जयंतचं उत्तर काही तरी भलतंच, ‘ए माझे पप्पा खूप स्ट्रीक्ट आहेत गं.’ आता हे उत्तर ऐकल्यावर कोणतीही मुलगी विचार करेल की, ‘काय घाबरट मुलगा आहे हा.’ पण नेहाचा जयंतवर पूर्ण विश्वास होता. तिला खात्री होतीच की तो कधी तरी हिंमत दाखवेल आणि तसंच झालं. जयंतने एक दिवस स्वत:हून विचारलं, ‘ए मी तुला प्रपोज करू?’ ती हो म्हणाली आणि त्यानंतर पहिल्या व्हॅलेन्टाइन डेला जयंतने तिला गुडघ्यावर बसून रेड हार्ट गिफ्ट करून प्रपोज केलं. या वेळी त्याने मोबाइलवर ‘किस मी, क्लोज युवर आईज अ‍ॅण्ड मिस मी’ गाणं लावलं होतं. नेहा आणि जयंतच्या नात्याला दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र दिवसेंदिवस त्यांचं नातं अधिकच दृढ होत चाललं