डॉ. सौरभ पाटणकर,

मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग

पावसाळा म्हणजे चिखल. अशात कपडे डागाळणं आणि ते डाग धुऊनही निघत नसल्यामुळे चिडचिड होणं साहजिकच. अशा वेळी ‘स्टेन रिमूव्हर’ हा पर्याय योग्य ठरतो. बाजारात हल्ली अनेक प्रकारचे ‘स्टेन रिमूव्हर’ उपलब्ध आहेत. पण हे डाग कपडय़ाच्या साध्या साबणाने का जात नाहीत, असा प्रश्न आपल्याला पडतो. त्याचं कारण आपण आजच्या लेखात जाणून घेऊ.

कपडय़ाचा साबण आणि स्टेन रिमूव्हर या दोन्हींत सर्फक्टंट (Surfactant) हा समान घटक असतो. हा घटक रासायनिकरीत्या ध्रुवीय आणि अध्रुवीय अशा दोन्ही भागांनी बनलेला असतो. ध्रुवीय भाग पाण्याबरोबर बंध करतात व अध्रुवीय भाग तेलकट डागांबरोबर बंध करतात. त्यामुळे डागांचे रेणू सर्फक्टंटच्या रेणूंबरोबर पाण्यात जातात व कपडे स्वच्छ करतात. परंतु चिवट डागांसाठी फक्त सर्फक्टंटची क्रिया अपुरी पडते व म्हणून फक्त साबणाने हे डाग निघत नाहीत. त्यामुळेच असे डाग घालविण्यासाठी अजून शक्कल लढवावी लागते व हे काम स्टेन रिमूव्हर करतात. सर्वसाधारणपणे बाजारात उपलब्ध स्टेन रिमूव्हरमध्ये इथेनॉलचा द्रावक म्हणून वापर होतो. इथेनॉलची ध्रुवीय क्षमता पाण्यापेक्षा वेगळी असल्यामुळे डागांचे रेणू जे पाण्यात सर्फक्टंट रेणूंबरोबर येत नाहीत ते इथेनॉलच्या रेणूंबरोबर येतात. खाण्याच्या पदार्थाचे कपडय़ांवर पडलेले डाग या क्रियेने निघतात. तशाच प्रकारे आपण जेव्हा कपडे ड्रायक्लिनिंगला देतो तेव्हा पेट्रोलचा द्रावक म्हणून उपयोग केला जातो. त्यामुळे रंग, ग्रीस यांचे डाग त्यात स्वच्छ होतात.

इस्पितळ व दवाखान्यातील कपडय़ांवर शारीरिक द्रव्ये व रक्ताचे डाग असतात, त्यांना घालविण्यासाठी स्टेन रिमूव्हरमध्ये जैविक उत्प्रेरक (enzymes) चा वापर होतो. ही उत्प्रेरके जैविक डागांचे विघटन करतात व हे विघटित डाग सर्फक्टंटने स्वच्छ होतात. गंजलेल्या धातूचे कपडय़ावरील डाग साध्या साबणाच्या पाण्याने निघत नाहीत. डागातील धातूंच्या रेणूंची पाण्यात विरघळण्याची क्षमता आम्लाचे रेणू (अ‍ॅसिड) वाढवितात. अ‍ॅसिडचे रेणू धातूंच्या रेणूंबरोबर रासायनिक अभिक्रिया करून धातूंचे क्षार (salt) बनवितात जे साध्या पाण्यातही सहज विरघळते. परंतु कठोर अ‍ॅसिड (strong acid) यासाठी वापरल्यास कापडाचे तंतूसुद्धा विरण्याची व तुटण्याची शक्यता असते. म्हणून ऑक्झालिक, अ‍ॅसिटीक अ‍ॅसिड किंवा लिंबाचा रस वापरतात.

पांढऱ्या कपडय़ांवरचे डाग घालविण्यासाठी ब्लिच (bleach) जे रासायनिकरीत्या सोडिअम हायपोक्लोराईट (sodium hypochlorite) हे ऑक्सिडंट आहे ते वापरले जाते. ह्याने रंगीत डागांच्या रेणूंचे रूपांतर रंगहीन रेणूंमध्ये होऊन ते स्वच्छ झाल्याचा आभास निर्माण करतात. हीच गोष्ट नीळची. त्याचे निळ्या रंगाचे रेणू कापडाला हलकी परत देऊन प्रकाश किरणे परावर्तित करतात व पाहणाऱ्याला कपडे उठावदार दिसतात.

तुमच्यासाठी कुठला स्टेन रिमूव्हर चांगला हे ठरविण्यासाठी डागांचे स्वरूप व स्टेन रिमूव्हरमधील यांची माहिती असणे उपयोगी ठरते.