News Flash

गाडीच्या देखभालीबाबतचे गैरसमज

गाडीची योग्य देखभाल न केल्याने अनेक प्रकारच्या समस्या येऊ  शकतात.

(संग्रहित छायाचित्र)

गाडीची देखभाल कशी करायची, गाडी कशी चालवायची, यासाठी अनेक जण विविध सल्ले देतात. काही वेळा एकाच गोष्टीबाबत वेगवेगळी मत आपल्याला ऐकायला मिळतात. यातील काही जण स्वानुभावातून बोलतात, तर काही त्यांनी ऐकलेल्या गोष्टी सांगतात. पण बरेच वेळा गैरसमजामुळे चुकीची माहिती दिली जाते. आणि अशा चुकीच्या माहितीला कालांतराने योग्य समजले जाते. असे सल्ले ऐकताना या गोष्टी निश्चितच पटू शकतात, मात्र प्रत्यक्ष त्या अमलात आणल्या असता काही वेळा तुम्हाला फायदा कमी तर नुकसानच अधिक होऊ  शकते.

गाडी घेणे हा मोठा निर्णय असतो. चांगली रक्कम खर्च करून गाडी घेतली असल्यामुळे गाडीची कामगिरी योग्य पद्धतीने होत नसल्यास वाहनमालकाला साहजिकच काळजी वाटते. गाडीची योग्य देखभाल न केल्याने अनेक प्रकारच्या समस्या येऊ  शकतात.

गाडीच्या छोटय़ा मोठय़ा अडचणी आपण स्वत:हून सोडवाव्यात असे कोणालाही वाटणे साहजिकच आहे. आणि गाडी नवीन असल्यावर तिची अधिकच काळजी घेतली जाते. गाडीच्या टायरमध्ये हवा किती भरावी, गाडी किती अंतर चालल्यानंतर इंजिन ऑइल बदलावे, गाडीसाठी साधे इंधन चांगले की प्रीमियम? असे प्रश्न कार मालकांना पडतात. म्हणून या बाबतीत योग्य माहिती मिळवणे गरजेचे आहे नाही तर गाडीची देखभाल करण्याबाबतच्या गैरसमजांमुळे तुमची मेहनत आणि पैसे वाया जातात. त्याचप्रमाणे गाडीत बिघाड होण्याची शक्यताही वाढते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कोणतीही शंका असल्यास त्याबाबत अनुभवी व्यक्तीकडे विचारणा करा, योग्य माहिती नसल्यास कोणत्याही प्रकारचे काम केल्याने गाडीचे नुकसान होण्याची शक्यता असते.

सर्व्हिसिंग

आपण जिथून गाडी विकत घेतो त्याच सव्‍‌र्हिस केंद्रातून गाडीची सर्व्हिसिंग चांगली होते हादेखील एक गैरसमज आहे. आपण ज्या ठिकाणाहून गाडी घेतली तिथेच त्याची चांगली सर्व्हिसिंग होऊ  शकते अशी चुकीची धारणा अनेकांमध्ये असते.

तुमची गाडी ज्या कंपनीची आहे, त्या कंपनीच्या कोणत्याही अधिकृत सव्‍‌र्हिस केंद्रावर तुम्हाला चांगली सेवा मिळू शकते. तुमच्या मनात कोणतीही शंका असल्यास एक दोन सव्‍‌र्हिस केंद्रांची चौकशी करून बघा किंवा तेथे गाडी सर्व्हिसिंगला देऊन पाहा याने तुम्हाला तेथे दिल्या जाणाऱ्या सेवेचा अंदाज येईल. गाडीच्या मॅन्युअलवरून तुम्हाला नक्की कोणत्या प्रकारची सव्‍‌र्हिस हवी आहे याचा अंदाज येईल.

इंधन

वाहनासाठी अधिक ऑक्टेनचे इंधन फायद्याचे : पेट्रोल पॅम्पवर गेल्यावर हाय ऑक्टेन इंधनाचा पर्याय उपलब्ध असतो. वाहनासाठी ओक्टेनची मात्रा अधिक असलेले इंधन फायद्याचे असल्याचा समज चुकीचा आहे. हे महागडे इंधन वापरल्यास कोणतेही नुकसान होत नाही त्याचप्रमाणे तुमच्या गाडीच्या कार्यक्षमतेत कोणत्याही प्रकारे सुधारणा करीत नाही. ओक्टेनेची मात्रा अधिक असल्याने पूर्व प्रज्वलनाची समस्या कमी होते. तुमच्या गाडीसाठी कोणत्या प्रकारचे इंधन आवश्यक आहे हे तुमच्या गाडीच्या माहितीपुस्तिकेत लिहिले असते. त्यात अधिक ऑक्टेनच्या इंधनाचा उल्लेख केला नसेल तर उगाच महागडे इंधन भरून पैसे वाया घालवू नका.

ब्रेक फ्लुइड

गाडी वापरताना कालांतराने ब्रेक फ्लुइड कमी होते. परंतु ब्रेकिंग यंत्रणेत कोणतीही अनियमितता जाणवत असल्यास केवळ ब्रेक फ्लुइड किंवा ब्रेक ऑइल बदलून चालत नाही. अपेक्षित पातळीहून ब्रेक ऑइल कमी झाल्यास नक्कीच त्यात भर घालणे गरजेचे आहे. ब्रेकिंग यंत्रणेत काही बिघाड जाणवत असेल तर स्वत:हून कोणतेही सोपस्कार करण्यापेक्षा मेकॅनिकला दाखवून घ्या.

कार कोटिंग

गाडी वॅक्स करून झाल्यानंतरही अजून एक थर लावल्यास फायद्याचे असते अशी समजूत चुकीची आहे. वॉक्सच्या एका थराने गाडी चकचकीत आणि नवी दिसते. त्यावर पुन्हा वॅक्स लावल्यास तुमच्या गाडीचा रंग निस्तेज वाटेल. त्याचप्रमाणे तुमची गाडी वंगणामुळे  जुनाट वाटेल. त्यामुळे गाडीला वॅक्स लावून झाल्यावर केवळ स्वच्छ कपडय़ाने ती नीट पुसून घ्या.

गाडीवरील ओरखडे

कार वॅक्समुळे गाडीवरील ओरखडे जातात : गाडीवर कार वॅक्स लावल्यास गाडीवरील ओरखडे जाऊ  शकतात. हा गैरसमज अनेकांना असतो. कार वॅक्सच्या थरामुळे गाडीवरील ओरखडे हे तात्पुरते लपवले जाऊ  शकतात. परंतु त्यावर पाणी पडल्यास किंवा पावसात वॅक्स निघून गेल्यावर पुन्हा ओरखडे दिसू शकतात. म्हणून गाडीवर ओरखडे पडले असल्यास केवळ कार वॅक्स लावणे हा कायमस्वरूपी उपाय नाही.

इंजिन कूलंट

गाडीचे इंजिन ऑइल बदलताना कूलंट बदलण्याची गरज नाही. जर तुम्हाला इंजिन ऑइल बदलताना कूलंट बदलण्याचा सल्ला दिला असेल तर लगेचच तसे करू नका. इंजिन ऑइल आणि कूलंट यांची कार्यक्षमता वेगवेगळी असते. जर कूलंटचे तापमान जास्त वाढले असेल किंवा गळती होत असेल तरच कूलंट बदला. कूलंटला तीन वर्षे किंवा त्याच्या कालखंड पूर्ण होण्याआधी बदलण्याची गरज नाही. जर कूलंटच्या रंगात बदल होऊन तो तपकिरी झाला असेल तर तात्काळ कूलंट बदलून घ्या.

इंजिन

गाडी चालवण्यापूर्वी इंजिन सुरू ठेवणे : गाडी चालवण्यापूर्वी काही सेकंद इंजिन सुरू ठेवण्याची काही लोकांना सवय असते. असे करण्याची कोणतीही आवशकता नाही. अतिशय थंडी असल्यास गाडी सुरू करण्याआधी इंजिन २ ते ३ सेकंद इंजिन चालू राहू देण्याची गरज असते. परंतु इतर परिस्थितीत आधुनिक गाडय़ांना प्रवासाआधी प्रत्येक वेळी अशा प्रकारे सुरू ठेवण्याची गरज नाही. गाडी सुरू झाल्यावर गाडीतील कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आणि इतर भागांचेदेखील तापमान वाढते. गाडी चालवण्याआधी १०-१५ सेकंद इंजिन सुरू ठेवल्यास केवळ इंधन वाया जाऊ  शकते. त्यातून कोणताही फायदा होत नाही.

गाडीची स्वच्छता

गाडी धुण्यासाठी कपडे आणि भांडय़ाच्या साबणाचा वापर : गाडी धुण्यासाठी कपडे धुण्याच्या किंवा भांडी घासण्याचा साबणाचा किंवा पावडरचा वापर करता येतो हे चुकीचे आहे. अशा प्रकारे गाडी धुतल्यास गाडी स्वच्छ होते, परंतु यामुळे गाडीवरील वॅक्स आणि इतर संरक्षणात्मक थराला यामुळे नुकसान होते. अशा प्रकारच्या साबणाने किंवा पावडरने गाडी धुतल्यानंतर ती नक्कीच स्वच्छ आणि चमकदार दिसते परंतु यामुळे ऑक्सिडेशन प्रक्रिया जलद गतीने होऊन तुमच्या गाडीच्या रंगाचे आयुष्य कमी होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 12:48 am

Web Title: article on misunderstanding car maintenance
Next Stories
1 व्हिंटेज वॉर : फेरारी विरुद्ध मॅकलेरन
2 कोकण भ्रमंती
3 कॉफी, टोफू आणि भाजलेली केळी
Just Now!
X