मकरंद जोशी

शुभ्र धबधब्यांना जन्म देणारे डोंगर, चिंब भिजलेल्या दऱ्या, धुक्यात हरवलेल्या वाटा, त्यांच्या कडेकडेने वाढलेल्या गवतात दडलेले विविध जीव पाहण्याचा योग पावसाळ्याच्या दोन महिन्यांत वारंवार जुळवून आणायलाच हवा. शहराच्या थोडं बाहेर पडलं आणि डोळसपणे आजूबाजूला सुरू असलेला हिरवा उत्सव पाहिला तर पाऊस खऱ्या अर्थाने साजरा केल्यासारखा वाटतो. कुठे जाता येईल, यावर एक दृष्टिक्षेप..

एखाद्या मोठय़ा सोहळ्यासाठी जसे नियोजन केलेले असते आणि एका सादरीकरणानंतर दुसरे सादरीकरण लगोलग सुरू राहाते, अगदी तसेच भोवतालच्या निसर्गात घडत असते, त्यालाच आपण ऋतुचक्र म्हणतो. ग्रीष्मातल्या झळांनी आणि उन्हाच्या तडाख्याने तापलेल्या, पोळलेल्या सृष्टीला शांत करायला, नवसंजीवनी द्यायला वर्षां ऋतू अवतरतो आणि बघता बघता अवघी सृष्टी जलधारांचे स्वागत करायला आपले रूप पालटते. या पावसाच्याही तऱ्हा वेगवेगळ्या असतात. सुरुवातीचा पाऊस म्हणजे नव्याने प्रेमात पडलेल्या प्रेमिकासारखा थोडा संकोचत, लाजत, घाबरत येणारा आणि आला आला म्हणेपर्यंत गायब होणारा असतो. नंतर मात्र प्रेमाच्या धुंदीत अनावरपणे बरसणारा, कोसळून कोसळून हैराण करणारा आणि प्रेमाच्या वर्षांवात चिंब चिंब भिजवणारा पाऊस अनुभवता येतो. नंतर मग प्रगल्भ प्रेमाची साक्ष देणारा, कधी ऊन तर कधी पाऊस असा खेळ सुरू होतो. या सगळ्या अवस्थांमध्ये सृष्टीची अवस्था प्रियकराच्या आविर्भावासरशी, विभ्रम बदलणाऱ्या नवयुवतीसारखी असते. पावसाचे हे सगळे रंग अनुभवायचे असतील तर पावसातली वनभ्रमंती करायलाच हवी.

पावसाच्या आगमनाची चाहूल देणाऱ्या काजव्यांचा प्रकाश महोत्सव जूनच्या आरंभी होऊन गेला आणि वळवाच्या सरी कोसळू लागल्या की रानवाटांवर उमलणारी रानफुले जणू पावसाच्या आगमनाची ग्वाही देतात. रानवाटांच्या कडेला उमललेले गुलाबी, जांभळे रानहळदीचे तुरे हमखास लक्ष वेधून घेतात. शिंदळवन किंवा कचोरा नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती जिंजर म्हणजे आल्याच्या कुळातली आहे. याच कुळातली आणखी एक वनस्पती म्हणजे स्पायरल जिंजर. आपल्या नावाप्रमाणेच या वनस्पतीची पाने खोडावर चक्राकार असतात आणि पानांमधून आलेल्या लालभडक  ब्रॅक्टमधून क्रेप पेपरची वाटणारी पांढरी फुले उमलतात. यांना मराठीत पेव म्हणतात. पावसाळ्यातील रानफुलांमध्ये आपल्या दुरंगी अवतारामुळे चटकन नजरेत भरणारी फुले म्हणजे कळलावी अर्थात ग्लोरी लिली. अर्धा भाग लाल चुटुक आणि अर्धा भाग पिवळा धम्मक अशा कळलावीच्या फुलाच्या पाकळ्या नाजुकपणे कातरलेल्या असतात. मात्र ही वनस्पती विषारी असते, हे विसरू नका.

पावसाळ्यातील सृष्टीचा खरा दागिना म्हणजे आंबा, अंजन, फणस, ऐन अशा मोठय़ा वृक्षांच्या खोडांवर फुलणारी बांडगुळं अर्थात ऑर्किड्स. सीतेची वेणी, मयूर पुष्प, वाघरी अशी नाजूक आणि सुंदर ऑर्किड्स जशी या काळात झाडांच्या बुंध्यांवर फुललेली दिसतात त्याचप्रमाणे टेरेस्ट्रियल ऑर्किड्स म्हणजे भुई आमरीचे अनेक प्रकारही पावसाळ्यात पाहता येतात. वाघचौरा, आषाढ आमरी, बाहुली, पाचगणी हबे आमरी अशी अनेक जमिनीवर उगवणारी आणि फुलणारी ऑर्किड्स फक्त पावसाळ्यातच दिसतात.

पावसाळ्यात रानवाटांवरून भटकंती करताना आधी ऐकू येणारे आणि मग शोधल्यावर दिसणारे भिडू म्हणजे बेडूक. पाण्यात आणि जमिनीवर तसेच झाडांवरही राहाणारे हे उभयचर त्यांच्या मंडूक वाणीमधून जणू पावसाचे स्तोत्र म्हणत असतात. टाइपरायटरच्या टकटकीसारखा हुबेहूब आवाज काढणारा बॉम्बे बुश फ्रॉग, गळ्याजवळच्या निळ्या निळ्या पिशव्या फुगवून ‘डराव डराव’ची ललकारी देणारा इंडियन बुल फ्रॉग, काली पिलीची आठवण करून देणारा दुरंगी बाय कलर्ड फ्रॉग, पाठीवरचा केशरी रंग, कडेचा काळा रंग आणि पायांवरचे पट्टे मिरवणारा बहुविस्तारा फंगॉइड बेडूक आणि हिरव्यागर्द रंगाचा, पॅराशूटसारखा तरंगणारा मलबार ग्लायडिंग फ्रॉग हे सगळं बघायचं तर पावसाळ्यात डोंगरवाटा तुडवायलाच हव्यात.

पावसाळ्यात रानातून फिरताना आणखी एक गोष्ट आपलं लक्ष वेधून घेते, एखाद्या वठलेल्या ओंडक्यावर, शेवाळाने मढलेल्या झाडाच्या खोडावर किंवा पायवाटेलगतच मातीतून अचानक तरारून वर आलेल्या अळंब्या. कालपर्यंत अस्तित्वात नसलेल्या आणि एका रात्रीत उगवणाऱ्या या अळंब्या अर्थात मशरुम्समध्ये जे आकाराचे आणि रंगांचे वैविध्य दिसते ते थक्क करणारे असते. टम्म फुगलेल्या पावासारख्या दिसणाऱ्या मशरुम्सपासून ते अंगावर झिरझिरीत बुरखा ओढून घेतल्याप्रमाणे दिसणाऱ्या मशरुम्सपर्यंत कितीतरी प्रकारचे मशरुम्स पावसाळ्यात रानात उगवतात. मात्र त्यांचे आयुष्य एक-दोन दिवसांचे असते आणि ते आकारानेही लहान असतात. त्यामुळे शोधक नजर नसेल तर त्यांचे दर्शन घडत नाही.

पावसाळ्यातील भटकंतीमध्ये फुलपाखरे तुलनेने कमी दिसतात. तरी संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळीच उडणारे पतंग म्हणजे मॉथ मात्र नक्की पाहायला मिळू शकतात. अ‍ॅटलास मॉथ हा जगातला सर्वात मोठा पतंग आपल्या महाराष्ट्रात (अगदी मुंबई आणि परिसरातही) आढळतो, पावसाळ्यात या देखण्या आणि मोठ्ठय़ा पतंगाचे दर्शन व्हायची शक्यता असते. मात्र पावसाळ्यात वनभ्रमंती करताना काही धोकादायक मंडळीही तुमच्यासमोर येऊ  शकतात. त्यातील ठरावीक नावे म्हणजे बाम्बू पीट व्हायपर, मलबार पीट व्हायपर, मण्यार इ. आता सर्पकुळातील हरणटोळ, कुकरी, कॅट स्नेक, दिवड असे बिनविषारी सापही रानवाटांवर दिसू शकतात. पण सापांची ओळख असो किंवा नसो त्यांच्यापासून दूर राहिलेलेच चांगले.

एकूणच पावसाळ्यातील वनभ्रमंती रोमांचक, थरारक आणि संस्मरणीय असते. पनवेलजवळचे कर्नाळा पक्षी अभयारण्य, मुंबईतले तुंगारेश्वरचे जंगल, आंबोलीचे अरण्य, पुण्याजवळचा ताम्हिणी घाट, साताऱ्याजवळचे चाळकेवाडीचे पठार, दोडामार्ग तालुक्यातील वानोशी, कोल्हापूरजवळचा तिलारी घाट, मुंबईजवळचे माथेरान अशी अनेक ठिकाणे झिम्माड पावसातील भन्नाट निसर्ग बघायला उत्तम आहेत. मात्र यातील अनेक ठिकाणे वनखात्याच्या अधिकारात येतात. तिथे जाताना रीतसर परवानगी घेऊन जावे. वनभ्रमंती करताना आपल्याजवळील प्लास्टिक, धातूचा कचरा जंगलात राहून जाणार नाही, याची काळजी आवर्जून घ्यावी. काही रानवनस्पती, मशरुम्स विषारी असतात, त्यामुळे रानातील फुले, पाने, मशरुम्स तोडू नयेत तसेच ज्यांच्याविषयी माहिती नाही अशी फळे खाऊ  नयेत.

पावसाळ्यात रानवाटा निसरडय़ा झालेल्या असतात, कडय़ाच्या टोकावर, धबधब्याजवळ छायाचित्रण करताना काळजी घ्यावी आणि अपघात टाळावेत. निसर्गाचे चक्र त्याच्या गतीने, रीतीने अविरत फिरत असते, तुमच्या जाण्याने त्याला अवरोध होणार नाही याची खबरदारी अवश्य घ्या आणि चला धुक्यात हरवलेल्या रानवाटांवर पावसाळी वनभ्रमंतीचा आनंद घ्यायला.

makarandvj@gmail.com