राजेंद्र श्री. भट rsbhat1957@gmail.com

हंगामी कंदफुलांमध्ये प्रामुख्याने पावसाळ्याची कंदफुले व हिवाळ्याची कंदफुले असे दोन प्रकार आहेत. इतरही अनेक प्रकार आढळतात. साधारणपणे पावसाळ्यात येणारी कंदफुले ही उष्ण कटिबंधातील व हिवाळ्यात येणारी कंदफुले शीत कटिबंधातील असतात. पावसाळ्यात येणाऱ्या काही कंदफुलांना सुगंध असतो तर हिवाळ्यात येणारी कंदफुले मोठी, रंगीबेरंगी व आकर्षक असतात.

पावसाळ्यात येणारी कंदफुले भुईचाफा, वेगवेगळ्या प्रकारच्या लीली, फायबॉल (मे प्लॉवर) ही आहेत. हिवाळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या लीली डेलिया इ. येतात. काही प्रकारांमध्ये प्रथम फुलांचा दांडा येतो व मग फुले येतात. उदा. भुईचाफा, फायरबॉल कंदफुलांचा लागवडीचा हंगाम आल्यावर निसर्गत: या कंदांची सुप्तावस्था संपून त्यांना कोंब येण्यास सुरुवात होते. असे कोंब आलेले कंद लागवडीसाठी योग्य असतात. कोंब येण्याअगोदर जर कंद लावले तर ते कुजण्याची शक्यता असते. कंदाच्या जाडीच्या दुप्पट खोलीपेक्षा जास्त खोल लावू नयेत.

कंदाची सुप्तावस्था घालवणे : कंद कोणत्याही बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून ओलसर कापडात गुंडाळून अंधाऱ्या जागी ठेवले तर त्यांना कोंब येण्यास सुरुवात होते. कंद मातीतून काढल्यावर काळ्या, भोके असलेल्या पिशवी ठेवून फ्रिजमध्ये ठेवले तर सुप्तावस्था भंगते.

पावसाळ्याच्या सुरुवातीला भुईचाफ्याचा कळा बाहेर येतो. अल्पआयुष्य असणाऱ्या या फुलाची शोभा अवर्णनीय आहे. त्याच्याच थोडय़ा पुढेमागे मे फ्लॉवर/फायरबॉल नावाचे फूल येते. जमिनीतून प्रथम कळा बाहेर येतो. दररोज थोडा थोडा वाढून त्यातून फूल फुलते. कंदाच्या आकार व ताकदीनुसार ओंजळीएवढय़ा आकाराचे गोल, लाल कांद्याचे अप्रतिम फूल फुलते. यावर असंख्य कीटक येत असतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला येणाऱ्या बहुतेक सर्व कंदफुलांचे आयुष्य फार थोडे असते. परंतु सौंदर्य अप्रतिम असते.

याच काळात पांढऱ्या, पिवळ्या, गुलाबी रंगांच्या छोटय़ा लीली फुलू लागतात. थोडी मोठी गुलाबी लीलीसुद्धा फुलते. या छोटय़ाशा कंदफुलांचा ताटवा फार सुरेख दिसतो.

अमरेन्थस/ट्रम्पेट लीलीच्या फुलाचा दांडा भुईतून फूट/दीड फूट वर येतो. त्याच्या टोकाला कळ्या असतात. फुले ग्रामोफोनच्या कण्र्याच्या आकाराची असतात. म्हणून त्याचे नाव ट्रम्पेट लीली. अनेक रंगांची किंवा मिश्र रंगांची पुरवणी फुले येतात. यात एकेरी पाकळ्यांची व दुहेरी पाकळ्यांची दोन प्रकार असतात.

हिवाळ्यात थंड प्रदेशातील देखणी फुले फुलू लागतात. यात प्रामुख्याने डेलिया आहे. हा जणू कंदफुलांचा राजाच आहे. याचे आयुष्य थोडे जास्त असते. प्रथम बारीक झुडूप वाढते व त्याच्या शेंडय़ाला फुले येतात अथवा छोटय़ा फांद्या फुटून त्यांच्या शेंडय़ाला फुले येतात. या बगलफुटी व कळ्या काढून टाकल्यास शेंडय़ावरचे फूल मोठे होते. वेगवेगळ्या रंगाची, आकाराची, पाकळ्यांची एकेरी, दुहेरी किंवा भरगच्च रचनेची देखणी फुले येतात. फुले जास्त काळ टिकतात. कंदफुले येऊन गेल्यावर त्याला पाणी देणे बंद करावे. त्याने झाड सुकते व त्यातील द्रव कंदात उतरून कंद पोसतो. कंदाची सुप्तावस्था सुरू होते. कंद खोदून काढून हवेशीर, अंधाऱ्या जागी ठेवावे. नंतर योग्य वेळी परत लागवड करावी.