08 December 2019

News Flash

गर्द झाडीतील शिरसी

एका बाजूने घाटमाथ्याचे सान्निध्य लाभलेला शिरसी परिसर गर्द वनश्रीने नटलेला असल्यामुळे उन्हाळ्यात फिरताना इथे त्रास होत नाही.

(संग्रहित छायाचित्र)

आशुतोष बापट

आपला सख्खा शेजारी असलेला कर्नाटक, महाराष्ट्राप्रमाणेच विविधतेने नटलेला आहे. सह्यद्रीच्या रांगा, समुद्र, थंड हवेची ठिकाणे, धबधबे, विपुल निसर्गसंपदा याबरोबर इथे समृद्ध प्राचीन राजवटींनी निर्माण केलेली मंदिरे आणि त्यावर असलेले सुंदर मूर्तिकाम या गोष्टी पर्यटकांना कायम आकर्षित करत आलेल्या आहेत. कर्नाटकाचा काही भाग ऐन उन्हाळ्यातसुद्धा रम्य असतो. शिरसी आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश असाच मनसोक्त फिरावा असा आहे.

एका बाजूने घाटमाथ्याचे सान्निध्य लाभलेला शिरसी परिसर गर्द वनश्रीने नटलेला असल्यामुळे उन्हाळ्यात फिरताना इथे त्रास होत नाही. बेळगावच्या दक्षिणेला सुमारे १८० कि.मी.वर असलेले हे कर्नाटकातील सुंदर गाव आहे. धबधबे, जंगले, मंदिरे आणि गर्द झाडी असा हा सर्वागसुंदर प्रदेश आहे. शिरसी हे तालुक्याचे ठिकाण मध्यवर्ती ठेवून या परिसरात मनसोक्त भटकंती करता येईल. हे पश्चिम घाट परिसरातील अगदी मध्यवर्ती आणि मोक्याचे ठिकाण आहे. ‘यक्षगान’ ही कर्नाटकातील प्रसिद्ध लोककला. शिरसी हे या लोककलेचे केंद्रच म्हणायला हवे. महाराष्ट्रात जसा दशावतार तसाच कर्नाटकातील यक्षगान. शिरसीची अजून एक ओळख म्हणजे सुपारीच्या व्यापाराचे हे एक मोठे केंद्र आहे.

अघनाशिनी नदीचा उगम शिरसीच्या जवळच झाला आहे. या नदीवर बरेच धबधबे आहेत. इथून जवळ असलेल्या ठिकाणांपैकी मुद्दाम पाहिलेच पाहिजे असे ठिकाण म्हणजे ‘याना रॉक्स’. शिरसीपासून ४० कि.मी. वर असलेल्या या ठिकाणी जाणारा रस्ता गर्द झाडीतून जातो आणि वळणावळणांचा आहे. रस्ता संपतो तिथून अर्धा कि.मी. पायी जावे लागते. उंचच उंच झाडे आणि सोबतीला पक्ष्यांचे आवाज यामुळे हा रस्ता कधी संपूच नये असे वाटते. दोन प्रचंड उंच खडक इथे आपल्या स्वागताला उभे असतात. जणू काही पाषाणाची शिखरेच ही. ‘भैरवेश्वर’ आणि ‘मोहिनी’ अशी नावे असलेल्या या दोन शिखरांची उंची अनुक्रमे १२० मीटर आणि ९० मीटर इतकी आहे. विष्णूने मोहिनीरूप घेऊन भस्मासुराचा वध याच ठिकाणी केला अशी आख्यायिका इथे प्रसिद्ध आहे.

याना हे ठिकाण एक तीर्थक्षेत्र म्हणूनसुद्धा ओळखले जाते. एका पाषाणखंडाखाली पोकळ जागा असून इथे एक शिवपिंड ठेवलेली आहे. त्यावर खडकातून सतत पाण्याचा अभिषेक होत असतो. शिवरात्रीला इथे रथोत्सव साजरा केला जातो. चहूबाजूंनी जंगलाने वेढलेल्या या जागी अवश्य भेट द्यवी. मनाची शांतता आणि एकाग्रता साधण्यासाठी ही जागा अगदी उत्तम आहे. याना रॉक्सपासून परत मुख्य रस्त्याला येऊन आपण उंचाली धबधब्याकडे जाऊ  शकतो. शिरसीपासून हे ठिकाण ३८ कि.मी. वर आहे. अघनाशिनी नदी इथे १२० मीटर उंचीवरून खोल दरीत झेप घेते. गर्द झाडीतून येणारी नदी काहीशी तिरक्या कोनात दरीत कोसळते. त्यामुळे इथे उंचाली धबधबा तयार झाला आहे. इथे पर्यटकांची हुल्लडबाजी अजिबात नसते. धबधबा वेगवेगळ्या उंचीवरून पाहता यावा म्हणून इथे वन विभागाने डोंगरउतारावर वेगवेगळ्या उंचीवर मनोरे उभे केलेले आहेत. अगदी खालच्या मनोऱ्यावरून घडणारे धबधब्याचे रौद्र दर्शन फारच सुंदर असते. या परिसरात विविध रंगांची आणि आकारांची फुलपाखरे मोठय़ा संख्येने दिसतात. याना रॉक्स आणि उंचाली धबधबा बघितल्यावर प्राचीन कदंब साम्राज्याची राजधानी असलेल्या बनवासीला जायलाच हवं. तिथलं मधुकेश्वराचं मंदिर प्रेक्षणीय आहे.

बनवसीला मुक्काम करून पुढे बळ्ळीगावी इथले केदारेश्वर मंदिर न चुकता पाहावे. गावातले मानवी रूपातील गंडभेरुंड शिल्प फारच देखणे आहे. होयसळांची राणी शांतला हिचे माहेर म्हणून हे गाव ओळखले जाते. इ.स.च्या ११-१२व्या शतकात बांधलेले केदारेश्वर मंदिर हे कल्याणी चालुक्य राजवटीत शैव अध्ययन केंद्र होते. याचा उल्लेख दक्षिण केदार असा केला जातो. तीन गाभारे असलेले हे शिल्पसमृद्ध मंदिर सुंदर आहे. निसर्गरम्य शिरसी परिसरात मनसोक्त भटकताना उन्हाळा आड येत नाही. खास दाक्षिणात्य पद्धतीचे खाद्यपदार्थ आणि आजूबाजूला हिरवागार निसर्ग बघून आपल्याला इथून हलू नये असेच वाटते. निसर्ग, पक्षी आणि मंदिरअभ्यासक या सर्वानाच हा परिसर खुणावतो आहे. पर्यटकांची झुंबड नसल्यामुळे तो अजूनही शांत आहे. आपल्या भटकंतीत तो तसाच शांत राहावा याची काळजी मात्र आपण घ्यायला हवी.

बनवासीबनवासी हे कदंब राजाचे एकेकाळी राजधानीचे शहर होते. खरे तर कर्नाटकची मूळ राजधानी बनवासीच होती असे सांगितले जाते. शिरसीपासून फक्त २५ कि.मी.वर असलेले हे निसर्गरम्य ठिकाण आहे. गावाच्या तीनही बाजूंनी वरदा नदी वाहते. इथे असलेले मधुकेश्वराचे मोठे मंदिर आवर्जून बघण्यासारखे आहे. इ.स.च्या नवव्या शतकात कदंब राजवटीमध्ये बांधलेले हे मंदिर. अत्यंत आकर्षक आहे. गुळगुळीत, चमक असलेले खांब आणि विविध आभूषणांनी मढवलेली नंदीची प्रतिमा ही कल्याणी चालुक्यांची खासीयत या मंदिरात आहे. मंदिराच्या प्रशस्त आवारात अष्टदिक्पालांची छोटी छोटी मंदिरे आहेत. पाच फण्यांच्या नागाचे सुंदर शिल्प आणि एक भव्य आणि इंचन इंच कलाकुसरीने मढवलेला दगडी पलंग मंदिर परिसरात ठेवलेला आहे. हा दगडी पलंग इ.स. १६२८ साली रघुनाथ नायक या राजाने देणगी म्हणून दिलेला आहे.

vidyashriputra@gmail.com

First Published on May 10, 2019 12:08 am

Web Title: article on sirsi
Just Now!
X