पाऊस अद्याप नीटसा सुरू झाला नसला, तरी अनेकांचे ट्रेकिंगचे प्लॅन मात्र जोरात सुरू झाले आहेत. गेल्या काही वर्षांत ट्रेकिंगचं अक्षरश: पेव फुटलं आहे. त्यामुळे त्यातल्या आव्हानांचं स्वरूपही बदललं आहे. साधारण सात-आठ वर्षांपूर्वीपर्यंत डोंगर-दऱ्यांत भटकताना शहरी कोलाहलापासून खूप दूर आल्याचा आनंद मिळत असे. पण आता पावसाळ्यात कोणत्याही विकेंडला कुठल्याही गडावर गेल्यास तिथे प्रचंड मोठी रीघ लागलेली दिसते. यात ट्रेकिंगपेक्षा समाजमाध्यमांवर झळकण्याची हौसच जास्त असल्याचे जाणवते. काही गडांवर अर्ध्यापर्यंत गाडीची सोय झाली आहे. जिथे पूर्वी फार तर झुणका भाकर मिळत असे, तिथे आता खाद्यपदार्थाच्या दुकानांचा बाजार भरलेला दिसतो. गिर्यारोहणाची आवड वाढत असेल, तर स्वागतार्हच आहे, मात्र हा छंद खूप जबाबदारीने जोपासायला हवा. ज्यांना खरोखरच आवड आहे आणि ज्यांची शारीरिक क्षमताही उत्तम आहे, त्यांनीच या वाटेला जावे. वाहनाने अर्धा गड चढल्यास साहसाचा निखळ आनंद मिळणे शक्य नाही. सोबत नेलेली प्रत्येक वस्तू परत घेऊन यावी. केरकचरा तिथेच टाकू नये. अनुभवी मार्गदर्शकाबरोबर न गेल्यास वाट चुकणे, भरकटणे असे प्रकार घडू शकतात, ते टाळावेत. आवश्यक ती सुरक्षेची साधने सोबत घेऊनच हे साहस करावे. एवढी काळजी घेतल्यास साहसाचा निखळ आनंद आपल्यालाही मिळेल आणि पुढील अनेक पिढय़ांसाठीही ही संधी खुली राहील.