आसूस या कंपनीने जगातील सर्वात पातळ आणि हलका ‘कन्व्हर्टिबल’ लॅपटॉप ‘झेनबुक फ्लिप एस’ (यूएक्स३७०) भारतीय बाजारात दाखल केला आहे. अवघ्या ११.२ मिमी जाडीचा आणि १.१० किलो वजनाचा हा लॅपटॉप प्रवासात वापरण्यास अतिशय सोयीस्कर आहे. ८व्या पिढीचा इंटेल कोअर-८५५०यू प्रोसेसर, १६जीबी रॅम, १३.३ इंचाचा इच स्क्रीन, आसूस सॉनिकमास्टर ऑडिओ तंत्रज्ञान अशी या लॅपटॉपची वैशिष्टय़े आहेत. हा ३६० अंशात वळवता येऊ शकत असल्याने त्याचा टॅब म्हणूनही वापर करता येतो. ‘झेनबुक फ्लिप एस’ हा विण्डोज १०च्या सर्व नवीनतम वैशिष्टय़ांशी सुसंगत आहे .

किंमत : १,३०,९९० रुपये.

आयजी इंटरनॅशनलचे सेंद्रिय सफरचंद

‘आयजी इंटरनॅशनल’ या फळ आयातदार आणि वितरक कंपनीने अमेरिकेतील वेनाची येथील सेंद्रिय सफरचंद भारतीय बाजारात आणली आहे. सेंद्रिय सफरचंदे, पेअर्स आणि चेरीजचे पॅकिंग आणि शिपिंग करणारी वायव्य अमेरिकेतील सर्वात मोठी कंपनी स्टेमिल्ट ग्रोअर्सशी असलेल्या संबंधांतून कंपनीने ही सफरचंदे आयात केली आहेत.  ‘देशातील फळप्रेमी सेंद्रिय फळांमध्ये रस घेत आहेत आणि सर्वोत्तम सेंद्रिय सफरचंदे बाजारात आणून आम्ही त्यांना हवे ते देत आहोत. स्टेमिल्टसोबतचा आमचा करार म्हणजे मोठे यश आहे आणि त्यामुळे भारतातील ग्राहकांपर्यंत वैविध्यपूर्ण फळे आणणे आम्हाला आतापर्यंत शक्य झाले आहे,’ असे कंपनीचे संचालक तरुण अरोरा यांनी सांगितले आहे.

क्वांटमची महापॉवर बँक

‘क्यूएचएमपीएल’ या कंपनीने तब्बल २० हजार एमएएच क्षमतेची पॉवर बँक भारतीय बाजारात आणली आहे. लिथियम आयन बॅटरी असलेल्या या पॉवर बँकमध्ये डय़ुअल यूएसबी पोर्ट पुरवण्यात आले असून त्याद्वारे एकाच वेळी दोन स्मार्टफोन चार्ज करता येतील. काळा आणि पांढरा अशा दोन रंगांत ही पॉवर बँक आघाडीच्या रिटेल दुकानांत उपलब्ध आहे.

किंमत : २९९० रुपये

स्विफ्ट कीचे अपडेट

स्मार्टफोनवरील ‘स्वीफ्ट की’ या कीबोर्ड अ‍ॅपच्या निर्मात्या मायक्रोसॉफ्टने या अ‍ॅपमध्ये विशेष बदल केला असून गेल्या दोन वर्षांत या अ‍ॅपमधील हा सर्वात महत्त्वाचा बदल असल्याचा कंपनीचा दावा आहे. या बदलानुसार या अ‍ॅपमधील कीबोर्ड इन्स्टॉल केल्यानंतर ‘+’ हे चिन्ह दाबताच वापरकर्त्यांना नवीन टूलबार पाहायला मिळेल. या टूलबारच्या माध्यमातून ते अनेक वैशिष्टय़ांचा लाभ घेऊ शकतील. अ‍ॅण्ड्रॉइड व आयओएस अशा दोन्ही आपॅरेटिंग सिस्टीमवर हा कीबोर्ड कार्य करतो. याखेरीज या कीबोर्डसोबत आकर्षक ‘स्टिकर्स’ही पुरवण्यात आली आहेत. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरून मोफत डाऊनलोड करता येईल.