मानसी जोशी

एकटय़ाने भटकंती म्हणजेच ‘सोलो बॅकपॅकिंग’ ही परदेशातील संकल्पना आता भारतातही रुळत आहे. ऑफिसला दहा-बारा दिवसांची सुट्टी टाकून बॅग भरून एकटय़ाने नवीन ठिकाणी फिरण्याचे प्रमाण गेल्या दोन-तीन वर्षांपासून वाढत आहे. एकटय़ाने केलेले प्रवासाचे नियोजन, त्या ठिकाणचा अभ्यास आणि पैशांची केलेली जुळवाजुळव हा अनुभव बऱ्याच नवीन गोष्टी शिकवून जातो. तसेच माणूस म्हणूनही समृद्ध करतो. याच सोलो बॅकपॅकिंगविषयी ….

रोजच्या धावपळीतून थोडी विश्रांती म्हणून उन्हाळ्याच्या सुट्टीत सहकुटुंब महाबळेश्वर, जम्मू-काश्मीर, शिमला- कुलू-मनाली येथे जाण्याची प्रथा वर्षांनुवर्षे आहे. प्रवासी कंपन्यांनी आखून दिलेल्या नियोजनात त्या ठिकाणची लोकप्रिय स्थळे पाहिली जातात. मात्र यामध्ये तेथील संस्कृती, दुर्लक्षित स्थळे पाहता येत नाहीत. यावर उपाय म्हणून सोलो बॅकपॅकिंगला तरुणांकडून पसंती मिळते आहे. सह्य़ाद्रीच्या डोंगररांगा फिरताना, गड-कि ल्ले पाहताना तसेच हिमालयात गिर्यारोहण करताना त्या ठिकाणची माहिती काढणे, ट्रेन, विमान, हॉटेलचे बुकिंग ही कामे एकटय़ाने केली जातात.

उपलब्ध रकमेत जास्तीत जास्त गोष्टी पाहण्यासाठी योग्य ते आर्थिक नियोजन केले जाते. हम्पी, गोकर्ण, हिमालय, दार्जिलिंग, लेह-लडाख, गोवा, अंदमान निकोबार, इत्यादी ठिकाणे फि रण्यासाठी तीन-चार महिन्यांत एका आठवडय़ाची सुट्टी पुरेशी असते. एकटय़ाने फिरताना विचित्र आणि रोमांचकारी अनुभवही येतात. कधी कोणाची बस अथवा ट्रेन रस्ता चुकते, कधी कोणीतरी अनोळखी माणूस मदत करतो, तर कधी फसवतोही. जास्त खरेदीमुळे कधी खिशात असलेले पैसे संपून जातात. तर कधी झोपडीत, जंगलात, इंटरनेटच्या रेंजशिवाय रात्र काढावी लागते. ही सर्व परिस्थिती शारीरिक, मानसिक क्षमतेचा कस पाहाते. माणूस स्वावलंबी होतो आणि आत्मविश्वासही वाढीस लागतो. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.

एकटय़ाने फिरताना नवीन माणसे भेटतात. त्यांचे अनुभव, प्रवासवर्णने यांमुळे नवीन गोष्टी शिकण्यास मिळतात. आपल्याला मिळत असलेल्या गोष्टींची किंमतही कळते. समाजमाध्यमावर सोलो बॅकपॅकिंगविषयी माहिती देणाऱ्या चित्रफिती, लेख उपलब्ध आहेत. यासाठी प्रवासी कंपन्याही सहलीचे पॅकेज देऊ लागल्या आहेत. दिल्ली, दार्जिलिंग, बनारस, ऋषीकेश, लेह-लडाख, केरळ, कर्नाटक, पाँडिचेरी या ठिकाणी राहण्यासाठी झॉस्टेल, ओयो, झॉस्टेलसारख्या लहान डॉर्मिटरी, खोल्या सुरू केल्या जात आहेत. देशात नोक री मिळण्याची बोंब असताना रोजगाराचा एक वेगळा मार्ग उपलब्ध झाला आहे.

अशाच एकटय़ाने भटकणाऱ्यांसाठी सिलीगुडी येथे राहणाऱ्या करण दत्ता याने चांगल्या पगाराची शिक्षकाची नोकरी सोडून ‘अतिथी गेस्ट हाऊस’ सुरू केले आहे. पश्चिम बंगाल राज्यातील सिलीगुडी हे शहर चहा आणि लाकडासाठी प्रसिद्ध आहे. तसेच ‘दार्जिलींग’, ‘गंगटोक’, ‘कलिमपाँग’ या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी येथूनच जावे लागत असल्याने वर्षभर सिलीगुडीला देशोदेशीचे प्रवासी येतात. चांगली सेवा आणि परवडणारे दर याच्या जोरावर २०१८ साली सुरू केलेल्या या व्यवसायाचा आता चांगलाच जम बसला आहे.

महिलांसाठी आव्हानात्मकच

एकटे फिरणे हा एक समृद्ध अनुभव असला तरीही महिलांसाठी हे अजूनही आव्हानात्मकच आहे. भारतासारख्या देशात एकटे फिरणाऱ्या महिलांची संख्या तुलनेने कमीच असल्याचे बॅकपॅकर्स सांगतात. महिलांनी एक टे फिरताना सुरक्षेची खात्री करणे गरजेचे आहे. पेपर स्प्रे, मिरचीची भुकटी जवळ बाळगावी. महिलांनी स्वरक्षणाचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. गाडीचा क्रमांक टिपून घ्यावा. आपण कोठे आहोत याची माहिती पालकांना आणि मित्रमैत्रिणींना द्यावी. त्याचबरोबर तेथील हेल्पलाइन तसेच पोलिसांचे क्रमांक जवळ ठेवावेत.

या गोष्टींची काळजी घ्यावी

’ नियोजित सहलीतील प्रसिद्ध ठिकाणे, संस्कृती, भाषा याचा अभ्यास करूनच भटकंती करावी .

’ ट्रेन, विमान, हॉटेलचे बुकिंग आधीच करून ठेवावे.

’ कमीत कमी सामान सोबत असावे.

’ कोठे जाणार याची माहिती जवळचे मित्र आणि पालकांना द्यावी.

’ सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात.

’ उगाच केलेले साहस महागात पडू शकते. त्यामुळे स्थानिकांना अथवा अनुभवी व्यक्तीला विचारून योग्य त्या ठिकाणी जावे.

इस्रायली नागरिकाची मदत

आसामहून येताना चालकाने कोकणातील त्याच्या शेतीविषयी सांगितले होते. त्याच्यासोबत मी आणि मित्र कोकणात फिरायलाही गेलो. मात्र कोकण सांगून त्याने आम्हाला रायगडच्या एका गावात नेले. खास पुण्याहून कोकणातील किनारा पाहण्यासाठी आलेल्या माझ्या मित्राची प्रचंड निराशा झाली आणि भरीस भर म्हणजे रात्री झोपताना आमच्या चादरीत साप आला. हा अनुभव मी कधीच विसरणार नाही.   – इंद्रजीत मोर

माणुसकीवरील विश्वास वाढला 

चित्रफीत, लेख वाचून तेथील खाद्यसंस्कृती, प्रसिद्ध ठिकाणे, भाषा, चालीरीती यांविषयी माहिती घेतो. मी ऋषीकेशला फिरताना एक परदेशी प्रवासी भेटला. त्याच्यासोबत मी बद्रीनाथला गेलो. बदामीला असताना बनशंकरी देवीला जाण्यासाठी सकाळची बस पकडायची होती. तेव्हा एका चहावाल्याने मला बाइकवरून बसस्थानकावर सोडले. या अनुभवामुळे माझा माणुसकीवरील विश्वास वाढला. – आदित्य दवणे

पक्षी पाहण्यासाठी एकटय़ाने भटकंती

दुर्मीळ प्राणी-पक्षी माझ्या कॅमेऱ्यात टिपणे हा भ्रमंतीचा मुख्य उद्देश असतो. कोणत्याही नवीन ठिकाणी गेल्यास तेथील अभयारण्यास भेट देतो. तेथे तासन्तास थांबून पक्ष्यांचे चित्रण करतो. हिमालयात लथपंछर गावात हॉर्नबिल पक्ष्यासाठी तर तालछप्परला गरुड पाहण्यासाठी गेलो होतो. केदारनाथ पक्षी अभयारण्यात हिमालयीन मोनाल, कोकला फेसंट या पक्ष्यांचे छायाचित्रण केले आहे. कर्नाटकामध्ये गणेशगुडी हे ठिकाण हॉर्नबिल आणि सोलापूरजवळील भिगवण हे ठिकाण दुर्मीळ पक्ष्यांच्या प्रजातीसाठी प्रसिद्ध आहे.    – योगेश दुर्गे