‘पीजन’ या भारतीय कंपनीने ‘मॉडर्न क्युकिना स्लो ज्यूसर १.०’ हे नवीन उपकरण बाजारात आणले आहे. या उपकरणाचे प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे, फळे आणि भाज्या सावकाश दाबून त्यांचा रस काढण्याचे तंत्रज्ञान यात पुरवण्यात आले आहे. हा स्लो ज्यूसर, त्याच्या कोल्ड प्रेस आणि सावकाश स्क्वीझिंग यंत्रणेमुळे पदार्थातील आवश्यक पोषक तत्वे सुरक्षित ठेवतो. नेहमीच्या ज्यूसर मिक्सर ग्राइंडरच्या हा ज्यूसर ५०% पर्यंत जास्त रस काढतो, असा कंपनीचा दावा आहे. या ज्यूसरमध्ये ‘स्टॉपर’ पुरवण्यात आला असून तो रस सांडू देत नाही. तसेच ज्यूस जार, पल्प जार, क्लिनिंग ब्रश अशा जोडवस्तू त्याच्यासोबत देण्यात आल्या आहेत.

किंमत : ४५९९ रुपये

आसूसचा लहान लॅपटॉप

आसूसने सर्वात लहान आकाराच्या झेनबुक श्रेणीतील लॅपटॉप भारतात आणले आहेत.  त्यापैकी ‘झेनबुक १५’ या १५.६ इंची लॅपटॉपमध्ये ४के डिस्प्ले, फिजिकल न्युमरिक पॅड, १६ तास चालणारी बॅटरी अशी वैशिष्टय़े आहेत. ‘झेनबुक १४’मध्ये १४ इंची आकाराचा लॅपटॉप, नंबरपॅड आयकॉन, १४ तास चालणारी बॅटरी अशी वैशिष्टय़े आहेत. तर सर्वात लहान अशा १३ इंची ‘झेनबुक १३’मध्ये वरील वैशिष्टय़ांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

‘एचपी’चा प्रीमियम ‘पीसी’

‘एचपी’ या प्रसिद्ध कंपनीने आपल्या संगणक श्रेणीत ‘स्पेक्ट्र फोलिओ’ आणि ‘स्पेक्ट्र एक्स-३६०’ असे दोन नवीन कॉम्प्युटर बाजारात आणले आहेत. ‘स्पेक्ट्र फोलिओ’ हा जगातील पहिला लेदर कन्व्हर्टेबल पीसी असून तो पूर्णपणे लेदर बॉडीने बनवण्यात आला आहे. त्यामुळे या लॅपटॉपचा वापर टॅब्लेट पीसी आणि टॅब म्हणून करणेही शक्य होते. यामध्ये ‘इंटेल कोअरचा आय७’ प्रोसेसर असून लॅपटॉपचा मदरबोर्डही अतिशय लहान आहे. १६ जीबी मेमरी, ५१२ जीबी एसएसडी स्टोअरेज, फ्रंट स्पीकर अशी याची अन्य वैशिष्टय़े आहेत. याच श्रेणीत ‘स्पेक्ट्र एक्स ३६०’ हा लॅपटॉपही सादर करण्यात आला असून दीर्घकाळ चालणारी बॅटरी हे या लॅपटॉपचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. या उपकरणामध्ये प्रायव्हसी कॅमेरा किल स्विचही देण्यात आले आहे. यामुळे वापरकर्त्यांला वेबकॅम वापरात नसेल तेव्हा इलेक्ट्रिकली बंद करून ठेवता येईल.

किंमत: ‘फोलिओ’- १,९९,९९० रुपये. ‘एक्स ३६०’- १,२९,९९० रुपये.

‘ एफ अ‍ॅण्ड डी’चा पार्टी बुस्टर

‘एफ अ‍ॅण्ड डी’ या कंपनीने ‘डब्ल्यू४०’ या नावाने पोर्टेबल ब्लुटुथ स्पीकर भारतात आणला असून तो ‘पार्टी स्पीकर’ असेल, असा दावा केला आहे. मोठा ‘बेस’ आणि आकर्षक दिवे ही या स्पीकरची प्रमुख वैशिष्टय़े आहेत. या दोन्ही वैशिष्टय़ांमुळे हा स्पीकर कोणत्याही जागेला एखाद्या ‘क्लब’मध्ये बदलतो, असा कंपनीचा दावा आहे. या स्पीकरवरील पॅनेल चमकदार आणि पातळ आहेत. या स्पीकरमध्ये ‘टीडब्ल्यूएस’ तंत्रज्ञान पुरवण्यात आल्याने एका वेळी दोन स्पीकर एकमेकांशी जोडून आवाजाची पातळी वाढवण्याची सुविधाही यात आहे.

किंमत : १२९९० रुपये