|| मानसी जोशी, पूर्वा साडविलकर

अमेरिकेत एका कार्यक्रमात आर्थिक सल्लागार वॉरेन बफे ट यांना एका विद्यार्थ्यांने यशस्वी होण्याचे रहस्य विचारले. खर्चापेक्षा गुंतवणुकीला महत्त्व दिल्याने आणि पैशांचे योग्य आर्थिक नियोजन के ल्यामुळे यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. याचेच अनुकरण काही प्रमाणात भारतातील तरुणही करत आहेत. त्यांच्यात गुंतवणुकीबाबत जागरूकता आल्याचे दिसत आहे.

शाळा-महाविद्यालयात असताना आईवडिलांकडून ठरावीक पॉकेटमनी मिळत असतो. शैक्षणिक खर्च आणि इतर मूलभूत गरजा पालकच भागवत असल्याने बऱ्याचदा पॉकेटमनी खाण्या-पिण्यावर, मजा करण्यावर उडवला जातो. पण महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर तरुण मुले स्वत नोकरी किंवा छोटासा व्यवसाय सुरू करतात. घरगुती जबाबदाऱ्याही घ्याव्या लागतात. मग अशावेळी वैयक्तिक गरजा भागवण्यासाठी आर्थिक नियोजन महत्त्वाचे वाटू लागते. दर महिन्याला मिळणाऱ्या पगारातून ठरावीक रकमेची बचत केली जाते. भविष्यात अडीअडचणीला ही रक्कम उपयोगात आणली जाते. पगारातील ७० टक्क्यांपर्यंत पैशांची गुंतवणूक करावी असे अनेक आर्थिक सल्लागारांचे मत आहे. यासाठी शेअर्स, म्युच्युअल फंड्स, सोने इत्यादी पर्याय आहेत. एखादी मोठी वस्तू घ्यायची असल्यास त्याचे आर्थिक नियोजन करताना आजची तरुण पिढी दिसत आहे. उदाहरणार्थ, एखादी गाडी घ्यायची असल्यास त्यांची किंमत आणि लागणारा वेळ याचे नियोजन के ले जाते. एखाद्या मुलीला ६० हजार रुपयांची दुचाकी खरेदी करायची असेल व तिला दर महिन्याला मिळणारा पगार १५ हजार असेल, तर ती दर महिन्याला पाच हजार रुपयांची बचत करते. याप्रमाणे बचत के ल्यास अंदाजे एक ते दोन वर्षांत ती दुचाकी घेऊ शकते. याप्रमाणे आर्थिक नियोजन करून हवी ती वस्तू घेता येते. यात आयफोन, लॅपटॉप, दुचाकी, चारचाकी अशा गोष्टींचा समावेश आहे. आजची पिढी ही ईएमआयवर जगणारी आहे असे गमतीने म्हटले जाते. परंतु, काही तरुण ईएमआयचा वापर न करता पैशांची बचत करून त्या गोष्टी घेतात. के ळकर महाविद्यालयात तृतीय वर्षांला शिकणाऱ्या हर्षदा जोशी हिने पहिल्या वर्षांपासून ५०० रुपये बचत के ली. ती एका क्लासमध्ये दहावीच्या मुलांना शिकवते. सलग दोन वर्षे बचत के ल्यावर तिने स्वतसाठी १२ हजार रुपयांचा मोबाइल घेतला. स्वतच्या कमाईतून घेतलेल्या मोबाइलची मजा काही वेगळीच असल्याचे ती सांगते. ‘यामुळे मला बचतीची सवय लागली. दोन वर्षांपूर्वी वडिलांच्या सल्ल्याने बचत करायला सुरुवात के ली होती. परंतु आज हा माझ्या दैनंदिन सवयीचा एक भाग बनलेला आहे. त्यामुळे आता आर्थिक नियोजन कसे के ले जाते याची माहिती मिळाली’, असल्याचेही हर्षदाने सांगितले.

काही वर्षांनंतर शिक्षणासाठी, फिरायला जाण्यासाठी, दुचाकी, चारचाकी घेण्यासाठी तसेच बके ट लिस्टमधील गोष्टी पूर्ण करण्यासाठी साठवलेले पैसे उपयोगास येतात. काही जणांचे हिमालयात, माऊंट एव्हरेस्टवर जायचे स्वप्न असते. तर काही मुलांचे युरोप किंवा बाईकवरून लेह लडाखला फिरायला जायचे स्वप्न पूर्ण होते. काही मुलींच्या या गुंतवणुकीचा उपयोग स्वतच्या किंवा लहान भावंडांच्या लग्नासाठीही केला जातो. पदवीचे शिक्षण घेतल्यावर पुढील शिक्षणासाठी परदेशात जायचे असल्यास या गुंतवणूक के लेल्या पैशांचा उपयोग होतो.

घरखरेदी, बँक ठेवी, दागिने या पारंपरिक गुंतवणुकींना फाटा देत म्युच्युअल फंड्स, शेअर्स याचा पर्याय तरुण पिढी अवलंबताना दिसत आहे. यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर जास्त होत आहे. कमी कालावधीत जास्त परतावा देणाऱ्या पर्यायांचा विचार प्राधान्याने केला जातो. म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मुलांचे प्रमाण अधिक आहे. अपघात, शिक्षण, आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास लगेच पैसे काढता येणाऱ्या पर्यायांचा मुले विचार करत आहेत. आजकाल महाविद्यालयापासूनच मुले आर्थिक नियोजन करू लागली आहेत. एकू णच आजची पिढी ही गुंतवणूक करण्यात आणि मिळणाऱ्या पैशांचे योग्य नियोजन करण्यात जागरूक आहे, असे आर्थिक सल्लागार असलेल्या सुधीर घोरपडे यांनी सांगितले.

शेअर्स हासुद्धा गुंतवणूक करण्याचा चांगला मार्ग आहे. यासाठी डीमॅट खाते उघडणे गरजेचे आहे. शेअर बाजारातील परिस्थितीनुसार शेअर्स खरेदी करायचे हा निर्णय तुम्ही घेऊ  शकता. शेअर्सचे ऑनलाइन ट्रेडिंग करता येणे शक्य झाले आहे. अनेक अ‍ॅपद्वारे शेअर्सचे ट्रेडिंग करता येते. तसेच याबाबत या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेता येतो. तुमचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवण्याचे काम आर्थिक सल्लागार करत असतो.

सोन्यात पैसे गुंतवणे हासुद्धा गुंतवणूक करण्याचा चांगला पर्याय ठरू शकतो. अनेक सोनार आता भिशीची सोय उपलब्ध करून देत आहेत. यामध्ये दर महिन्याला एक हजार रुपयांपासून गुंतवणूक करायची असते. साधारणत एका वर्षांनंतर आपल्याला सोन्याचे दागिने खरेदी करता येतात. अथवा सोन्याची बिस्किटे, नाणी खरेदी के ली जातात. शिवाय पेटीएम, गुगल पे, फोन पे या अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाइन सोने खरेदीचा पर्यायसुद्धा उपलब्ध आहे.

अनेक संके तस्थळे, यू-टय़ुब यांवर आर्थिक नियोजन कसे करावे याची माहिती उपलब्ध असते. आर्थिक नियोजनाविषयी मार्गदर्शन करणाऱ्या परिसंवादातही सहभागी होता येते. तसेच विविध वृत्तपत्रांत अर्थविषयक  पुरवणीमध्ये सदर येत असतात. याचा उपयोग आर्थिक नियोजन करताना होऊ  शकतो. पालकांचा याबाबत सल्ला घेणे मोलाचे ठरते.

आर्थिक नियोजन करताना पुढील गोष्टींची काळजी घ्यावी

१) दर महिन्याला खर्चापेक्षा अधिक पैशांची बचत करण्याचा प्रयत्न करा.

२) आपल्याला मिळणारा पगार, भविष्यातील खर्च आणि त्यासाठी लागणारा वेळ याचा विचार करून आर्थिक नियोजन करावे.

३) पैसे गुंतवताना त्यातून मिळणाऱ्या परताव्याचा विचार करावा.

४) आर्थिक सल्लागाराचे ज्ञान कितपत आहे याची खात्री करूनच पैसे गुंतवावेत.

५) आर्थिक सल्लागार आणि ग्राहक यांच्यात पारदर्शकता महत्त्वाची आहे.

६) पैशांचे व्यवहार करताना रोखीने व्यवहार करणे टाळावे. ऑनलाइन अथवा धनादेश यांचा वापर करावा.

हिमालयात ट्रेकला जाण्यासाठी गुंतवणूक 

मी एका कंपनीमध्ये आर्थिक सल्लागार आहे. महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षांपासून मी पैशांची बचत करत आहे. मला आता १५ हजार पगार मिळतो. दर महिन्याला ६ हजार रुपये गुतंवणुकीसाठी राखून ठेवले आहेत. त्यातील २ हजार रुपये २-३ वर्षांकरिता म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवल्याने भविष्यात त्याचा उपयोग शिक्षणासाठी होऊ शकतो. उरलेले ३ हजार द्रवरूप रोखे (लिक्विड फंड्स) मध्ये ठेवले आहेत. उरलेले १ हजार शेअर्समध्ये गुंतवते. मला एका वर्षांत हिमालयात फिरायला जायचे आहे. त्यासाठी आतापासून पैसे वाचवत आहे.    – सुप्रिया घोरपडे

बचतीमधून घर घ्यायचे आहे

मी एका ट्रॅव्हल कंपनीत सहल सल्लागार या पदावर कार्यरत आहे. दोन ते तीन महिन्यांपासून मी पैशांची गुंतणूक करण्यास सुरुवात के ली आहे. दर महिन्याला २ हजार रुपये बँके त ठेवतो. दहा वर्षांसाठी ही बचत करणार आहे. त्या बचतीमधून मला स्वतचे घर घ्यायचे आहे. त्यामुळे एका वर्षांत जास्तीत जास्त बचत करण्याचा प्रयत्न करत आहे.    – ओंकार घाग

गुंतवणुकीचा उपयोग व्यवसायवाढीसाठी

मी माझ्या दोन मित्रांसह संस्था स्थापन के ली आहे. यातून मिळणारे पैसे बँके त ठेवले आहेत. तसेच त्यातील ४ हजार रुपये आरडी खात्यात जमा के ले आहेत. एक वर्ष झाल्यावर ती रक्कम चालू खात्यात जमा करणार आहे. वडिलांनी त्यांच्या नावाने पॉलिसी काढली आहे. या पॉलिसीचा कालावधी दोन ते तीन वर्षे आहे. यातून मिळणाऱ्या रकमेचा उपयोग व्यवसायवाढीसाठी करणार आहे.   – प्रथमेश माईन