News Flash

बारवांच्या प्रदेशात

बागलाणच्या वायव्य भागात डेरमाळ गडाजवळील अनेक मंदिरे व गुहांना पांडवांशी निगडित नावे आहेत.

अहिल्यादेवी होळकरांनी मंदिराभोवती दगडी कोट बांधला आहे.

रोहित जाधव

नाशिकपासून ९५ किमीवर असणारा सटाणा तालुका म्हणजेच इतिहासकालीन बागलाण. सह्य़पर्वताचे हे उत्तर टोक. या उत्तर टोकाच्या ३० किमी रांगेत ११ किल्ले आहेत. पुरातन राजवटींनी निर्मिलेल्या स्थापत्याचे अवशेष इतिहासाची पाने उलगडतात. तालुका सटाणा असला तरी आजही येथील लोक तालुका बागलाण असेच सांगतात इतके हे नाव इतिहासाशी जोडलेले आहे. येथील अत्यंत कल्पकतेने नियोजनपूर्वक बांधलेल्या आणि दुष्काळी भागाची तहान भागवणाऱ्या अनेक बारवा म्हणजेच विहिरी प्रेक्षणीय आहेत.

बागलाण तालुक्याच्या वायव्य भागात तालुक्याचे मुख्य ठिकाण सटाण्यापासून २१ किमीवर मोसम नदीकिनारी वसलेले एक संस्थानिक गाव इनामपूर. हा भाग जसा पौराणिक कथांमध्ये दिसतो तसाच संस्थानिक गावांनीसुद्धा समृद्ध आहे. १६७२ साली मोरोपंत पिंगळे यांनी हा भाग स्वराज्यात आणला. तेथील इनामदार व वतनदार हे स्वत:हून स्वराज्य लढय़ात सहभागी झाले. नामपूर येथील मोसम नदीकिनारी मराठा व मुघलांची झटापट झाली. त्या लढाईचे प्रतीक असलेल्या वीरगळी नदीकिनारी आहेत. या ठिकाणी नाथाडी, बाथाडी, मोसम या नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. संगमाशेजारी व्याघ्रेश्वर हे प्राचीन महादेव मंदिर आहे. अहिल्यादेवी होळकरांनी मंदिराभोवती दगडी कोट बांधला आहे. मंदिराबाहेर गोसावी समाजाच्या अनेक मोठय़ा समाध्या आहेत. नामपूरचे नाव इतिहासात अमर झाले ते नरहर गोपाळशेठ अलई यांच्यामुळे. त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात खूप मोलाची कामगिरी केली. १९३० साली महाराष्ट्रात शेतसारा भरणारे ते एकमेव व्यक्ती होते. त्यांनी चंदन व सागात वाडा पद्धतीत तीन मजली विठ्ठल मंदिर बांधले. येथे पांडुरंगाला राई व रुख्मिणी अशा दोन पत्नी दाखवल्या आहेत.

आज नामपूर वाडय़ांचे गाव म्हणूनच प्रसिद्ध आहे. अलई, देशपांडे, खामलोणकर, विठ्ठल मंदिर वाडा विशेष देखणे आहेत. मोसम नदीचे पात्र विस्तीर्ण असल्यामुळे प्रत्येक गावाला दगडी कोट बांधलेले आढळतात.

बागलाणच्या वायव्य भागात डेरमाळ गडाजवळील अनेक मंदिरे व गुहांना पांडवांशी निगडित नावे आहेत. श्रीपुरवडे येथील भीमाशंकर या महादेव पिंडीतून भिवरी-शीवरी या नद्यांचा उगम होतो, असे मानले जाते. तिसऱ्या श्रावणी सोमवारनंतर हे महादेव मंदिर पाण्यात बुडते आणि महाशिवरात्रीला मोकळे होते अशा प्रकारे सहा महिने मंदिराचे गर्भगृह पाण्यात असते. मंदिरातून भिवरी शेवरी नदीचे दुधासारखे शुभ्र पाणी वाहते त्यामुळे त्यांना दूधगंगा असे म्हणतात.

बागलाणात अनेक ठिकाणी प्राचीन बांधीव विहिरी म्हणजेच बारव आहेत. बागलाणातून खानदेशात जाण्याचे सहा प्राचीन राजमार्ग या भागातून असल्यामुळे प्रत्येक घाटात सुंदर बारव आहेत. नामपूरच्या पश्चिमेस होळकर धाटणीच्या दोन कमानी बारव आहे. पायविहिरीची बांधणी संपूर्ण खांडकी दगडात असून तिला १८ पायऱ्या आहेत. पुढे दगडी पुष्करिणी तलाव आहे. त्यात एक मुख्य प्रवेशद्वार असून मध्यभागी दगडाचा उंचवटा आहे. ज्यावर लाकडाच्या ६४ खांबावर लाकडी वाडा होता. तिथे न्यायदानाचे काम चालत असे. आजूबाजूला ६४ देवकोनाडे होते. हिची खोली ४० फूट होती. एवढी मोठी पुष्करिणी त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त स्वरूपात पाहायला मिळते.

पिसोळ किल्लय़ाखालील नंदिन गावात हाळ असलेली दोन कमानी पायबारव बघायला मिळते. तिला १८ पायऱ्या असून गुरांना पाणी पिण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. अशा बारव क्वचितच सापडतात. येथील राणेश्वर महादेव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. डेरमाळ किल्लय़ाखालील टीन्घ्री व बिलपुरी येथील गोलाकार बारवमध्ये वर्तुळाकार पायऱ्या खाली जातात. वरील तळीवर बैलांकडून रहाट चालवत पाणी काढले जाते. तळीच्या पायबारव स्थापत्यशास्त्राचा अप्रतिम नमुनाच म्हणावा लागेल.

चिराई गावात खान्देश कुलदैवत चिराई देवीचे प्राचीन मंदिर व बाजूलाच राष्ट्रकुटकालीन बारव आहे. तिला एक प्रवेशद्वार होते व फेरीसाठी सज्जा आहे. विहिरीत उतरण्यासाठी दोन्ही बाजूंनी नऊ  पायऱ्या, तसेच दर ३ फुटांवर देवकोष्टके आहेत. वरील बाजूस प्रमुखासाठी बसण्याचे ठिकाण आहे. हिची खोली जास्त नाही. पूर्वी हिच्यावर लाकडी खांबांचा मंडप होता. अशा विहिरी मराठवाडय़ात जास्त बघायला मिळतात.

३६ ते ४५ पायऱ्या

हा भाग दुष्काळप्रवण असल्यामुळे विहिरींची खोली जास्त असते. काही पायविहिरी ३६ पायऱ्यांच्या आहेत. अशीच एक बारव नामपूरजवळ एका शेतात आहे. तिला पाच कमानी असून उतरण्यास ४५ पायऱ्या आहेत. प्रत्येक कमान व पायरीचा टप्पा समान रेषेत असतो. म्हणजे जेवढे पाणी वाढले तेव्हढय़ा टप्प्यावर लाकडाचे सोपान चढवत. अंबासन येथील खांबदेव बारव ते सारदे येथील पाय बारवेपर्यंत खापरीची पाणी व्यवस्था होती. प्रत्येक बारवमध्ये सप्तमातृका रूपी आसरांची स्थापना केलेली असते. जल देवता म्हणून त्यांची पूजा केली जाते. बारव दुष्काळी भागात त्याच ठिकाणी खोदल्या आहेत जेथे जमिनीत पाण्याचे जिवंत झरे आहेत. अतिशय सुंदर, अभ्यासपूर्ण नियोजन त्या काळातील लोकांनी करून ठेवले आहे.

वन्यजीव आणि गडकिल्ले

याच भागातील भामेर किल्लय़ाची हद्द असलेल्या मळगाव भामेर येथील उंच डोंगर व दाट जंगलात हरीण, तरस व मोर मोठय़ा प्रमाणावर दिसतात. पावसाळ्यात अनेक धबधबे कोसळतात. त्यामुळे पर्यटकांची नेहमी गर्दी असते. दुर्लक्षित असलेल्या या भागात पिसोळ, डेरमाळ, बिश्ता, फोफिरा या विविधतेने नटलेल्या गडदुर्गाचे तसेच अनेक पायविहिरी व मंदिरांसमवेत वाडय़ांचे दर्शन होते. दोन दिवसांच्या सहलीत हे सर्व बघता येते. येथूनच पुढे खान्देशातील गाळणा किंवा भामेर गडदुर्ग बघता येतात.

rohitj1947@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2018 3:34 am

Web Title: best tourist places to visit near satana taluka
Next Stories
1 शहरशेती : हवा शुद्ध ठेवणारी झाडे
2 सुंदर माझं घर : ऐटबाज बाटली
3 दोन दिवस भटकंतीचे : त्र्यंबकेश्वर
Just Now!
X