मिलिंद गांगल

वाढते शहरीकरण लांबपल्लय़ाचे मोठे रस्ते, त्याहून अधिक वेगाने वाढणारी वाहन संख्या, तरुणाईला भुरळ घालणाऱ्या अन वेगाच्या स्पर्धेला प्रसंगी प्रवृत्त करणाऱ्या अत्याधुनिक गाडय़ा, खूप ठिकाणी आढळणारे बंपर टू बंपर ट्राफिक. आणि यासोबत वाढत आहेत ते अपघाताचे प्रमाण.

याचे भान ठेवून वाहन उत्पादक अनेक प्रकारच्या सुरक्षा यंत्रणा आपल्या वाहनात बसवत असतात. कायद्याने या सुरक्षा यंत्रणा बसवणे बंधनकारक असते. वाहन अपघातात चालक तसेच डावीकडे बसलेल्या व्यक्तीचा मृत्यू दर कमी करणारी महत्त्वाची सुरक्षा यंत्रणा म्हणजे एस आर एस (सप्लिमेन्ट रिस्ट्रेन सिस्टीम) एअर बॅग. बऱ्याच वेळा एकावर एक वाहन आदळून अपघात होतो. अशाप्रकारच्या हेड ऑन अपघातात प्रवाशांचे प्राण एअर बॅग अन सीट बेल्ट्समुळे वाचतात.

बऱ्याचदा चालकाचा मृत्यू स्टेरिंग छातीला लागल्याने बरगडी तुटून फुप्फुसात गेल्याने आणि डोक्याला मार लागल्याने होतो. हे टाळण्यासाठी एअर बॅगचा उपयोग होऊ  शकतो. गाडीच्या स्टेरिंग व्हीलमधल्या हॉर्न पॅडमध्ये तसेच डावीकडे ‘ग्लो बॉक्स’च्यावर एअर बॅग बसवलेल्या असतात.

एअर बॅग साधारणत: नायलॉन मटेरियल वापरून बनवलेल्या असतात. विशिष्ट पद्धतीने घडी घालून एअर बॅग्स स्टेरिंगच्या हॉर्न पॅड आणि डॅशबोर्डमध्ये बसवलेल्या असतात.  अपघात घडत असताना एअर बॅगला कार्यरत होण्यास केवळ तीन मिली सेकंदांचा अवधी असतो.

एअर बॅग यंत्रणा, अपघातात एकदा वापरली गेली की दुरुस्तीत संपूर्णत: नवीन बसवावी लागते. त्यासोबत गाडीतील पुढचे सीट बेल्ट्सही बदलावे लागतात. सीट बेल्ट चालक आणि डावीकडील बाजूच्या व्यक्तीने न लावल्यास एअर बॅग काम करत नाहीत.

आता छोटय़ा कारमध्ये देखील किमान दोन एअर बॅग असणे बंधनकारक करण्यात आले आहे.  त्याचप्रमाणे मोठय़ा गाडय़ा एसयूव्ही किंवा आलिशान गाडय़ा यामध्ये तर सहा किंवा आठ एअर बॅग्स असतात.

गाडीच्या पुढील बाजूस उजव्या हेड लाइटच्या खाली एक इम्पॅक्ट सेन्सर बसवलेला असतो. अपघात घडताना, समोरून एखादे वाहन किंवा अन्य काही वस्तू गाडीवर आदळत असताना हे सेन्सर एअर बॅग मॉडय़ुलला संदेश पाठवतो. त्यानंतर तात्काळ ती यंत्रणा कार्यान्वित होऊन एक नियंत्रित स्वरूपाची, रासायनिक क्रिया घडवून आणली जाते. दोन्ही एअर बॅग्स नायट्रोजन गॅसने भरून उघडतात. चालक, बाजूचा सहप्रवासी, गाडीचा डॅशबोर्ड अन स्टेरिंग यामध्ये उघडलेल्या एअर बॅग्स एखाद्या उशीसारखे काम करतात.

सीट बेल्ट्स गाडीत बसणाऱ्या व्यक्तींनी लावता क्षणी, सीट बेल्ट्समधील सेन्सरद्वारे एअर बॅग सेन्सर व इलेक्ट्रॉनिक यंत्रणेला सीटवर प्रवासी बसले असल्याची सूचना देते. स्टेरिंग, डॅशबोर्ड, काचेचे पिलर, ए पिलर, बी पिलर (मधल्या दरवाजाचे जवळ) आणि साइड बॉडीमध्ये एअर बॅग्स बसवलेल्या असतात.  ही यंत्रणा चालक व इतर प्रवाशांचा जीव वाचवणारी यंत्रणा आहे. पण त्यासाठी सीट बेल्ट्स लावणे आवश्यक असते. आपल्या देशात गाडी विकत घेताना ती सुरक्षित आहे का? त्यात सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्या सुविधा आहेत, हे मात्र कोणी फारसे विचारात घेत नाही.

एअर बॅग असलेल्या गाडीची किंमतही जास्त असते. इन्शुरन्सही महाग असतो. याबाबतसुद्धा इन्शुरन्स कंपन्यांनी आपले धोरण बदलून एअर बॅग्स प्राण वाचवणारी यंत्रणा म्हणून इन्शुरन्स प्रीमियममध्ये सूट द्यायला हवी. माणसाच्या मृत्यूनंतर इन्शुरन्सला भारीभक्कम भरपाई त्याच्या कुटुंबाला द्यावी लागते, त्या तुलनेत एअर बॅग्सची किंमत नक्कीच कमी आहे आणि एअर बॅग्स असलेल्या गाडीत अपघात प्रसंगी मृत्युदर कमी असतो, याचा विचार इन्शुरन्सविषयक तज्ज्ञांनी करायला हवा.