व्हिंटेज वॉर : वैभव भाकरे

फोर्ड मॉडेल टी, लाडा क्लासिक, फॉक्सवॅगन बीटल, टोयोटा कॅरोला या जगातील सर्वात जास्त विक्री झालेल्या गाडय़ा. गाडीच्या विक्रीलाच निकष मानायचे झाले तर साहजिकच या जगातील सर्वाधिक लोकप्रिय गाडय़ा म्हणता येतील. या गाडय़ांनी डिझाईन, बॉडी, इंजिन, कार्यक्षमता या सर्व बाबींमध्ये लोकांची मने जिंकली. जगातील अशा आवडत्या मोटारींप्रमाणे नावडत्या मोटारीदेखील बऱ्याच आहेत.

जगातील तांत्रिकदृष्टय़ा सर्वात चांगल्या गाडय़ा त्यांच्या उत्पादनाच्या अनेक दशकांनंतरही चाहत्यांच्या मनात घर करून असतात, तर ज्या गाडय़ा अपयशी होतात किंवा चालकांच्या पसंतीस उतरत नाही, त्या एक-दोन वर्षांनंतर रस्त्यावरून गायब होतात. थक्क करण्याच्या उद्देशाने बनवलेल्या या गाडय़ांनी ग्राहकांना धक्काच जास्त दिला. या गाडय़ा डिझाइन, इंजिन कार्यक्षमता, इंधन कार्यक्षमता, बॉडी, सुरक्षितता अशा ग्राहकांच्या कोणत्याच अपेक्षा पूर्ण करीत नव्हत्या असे नाही. यातील काही गाडय़ांच्या विक्रीचा आकडा पाहिला तर या गाडय़ांना अपयशीदेखील म्हणता येणार नाही. पण या लोकप्रिय नाहीत एवढे मात्र नक्की. यातील काही गाडय़ा त्या नावडत्या आहेत या कारणामुळे अनेक चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये झळकल्यादेखील आहेत. यातील काही प्रमुख उदाहरणे म्हणजे डी एम सीची डेलॉरिअन, रेलियन्टची रॉबिन. ‘बँक टू द फ्युचर’ चित्रपट मालिकेत डेलॉरिअन ही टाइम मशीन म्हणून झळकली, तर फूल्स अँड हॉर्सेस या मालिकेत रॉबिन छोटय़ा पडद्यावर आली. चित्रपट आणि कार्यक्रमांमुळे या गाडय़ा लोकांना आवडू लागल्या आणि कालांतराने त्या लोकप्रियही झाल्या. (या लोकप्रियतेचा त्यांच्या विक्रीवर काही परिणाम झाला नाही) पण सर्वच नावडत्या गाडय़ांच्या वाटय़ाला चित्रपट पदार्पणाचे नशीब लाभले नाही. त्यामुळे त्या नावडत्याच राहिल्या. अशा या नावडत्या गाडय़ांचे नाव काढले तरी जगभरातील मोटार चाहते नाके मुरडतात.

निसान क्युब

एका ठोकळ्याला चाके लावावीत अशी रचना असलेली निसानची क्युब अगदी तिच्या नावाप्रमाणेच होती. निसानच्या या एमयूपीचे उत्पादन १९९८ मध्ये सुरू झाले. सुरुवातीला केवळ जपानमध्ये या गाडीची विक्री करण्यात आली. त्यानंतर उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये या गाडीची विक्री करण्यात आली. गाडीच्या डिझाईनमुळे अमेरिकी आणि युरोपियन ग्राहकांच्या ही गाडी पचनी पडली नाही. २०१४ पासून या गाडीची विक्री केवळ जपानमध्येच करण्यात येत आहे. २०१३ मध्ये अमेरिकी नागरिकांनी या गाडीला सर्वात लाजिरवाणी सवारी म्हणून निवडले होते.

फोर्ड इडझेल

१९५० च्या दशकात अमेरिकी रस्त्यांवर मोठय़ा गाडय़ा दिसत होत्या. त्या काळात अतिडिझाइन करण्यात आल्याने या गाडय़ांवर टीका करण्यात येत होती. याच वेळी फोर्डने अतिशय बटबटीत अशी इडझेल बाजारात आणली. या गाडीच्या डिझाइनमध्ये गरजेतून अधिक लाइन्स, मेटल एलेमनट्सचा वापर करण्यात आला होता. या गाडीबाबत तत्कालीन मोटार बाजारात कमालीची उत्सुकता होती. फोर्डसाठी इडझेल ही अत्यंत महत्त्वाकांशी गाडी होती. ही गाडी निर्माण करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पैसा ओतण्यात आला होता. ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने फोर्डला मोठे नुकसान झाले होते.

फियाट मल्टिप्ला

जर कधी जगातील सर्वाधिक नावडत्या गाडय़ांची क्रमवारी ठरवण्यात आली तर फियाटची मल्टिप्ला बहुदा पहिले स्थान पटकावेल. १९९८ मध्ये बाजारात दाखल झालेली फियाटची ही कॉम्पॅक्ट एमयूव्ही तिच्या तत्कालीन प्रतिस्पर्धीच्या तुलनेने आकाराने लहान आणि रुंद होती. या गाडीत प्रवाशांसाठी सहा आसने होती. जगातील सर्व गाडय़ांमध्ये समोर दोनच सीट्स असतात, मात्र या गाडीत पुढच्या बाजूला तीन सीट्स होत्या. २०१० पर्यंत या गाडीची विक्री होत होती. फियाट मल्टिप्लाला एका मॅगझीनने जगातील सर्वात कुरूप गाडीचा किताबदेखील दिला होता. गाडीच्या नंतरच्या मॉडेलमध्ये सुधारणा करूनही ही गाडी ग्राहकांच्या पसंतीस पडली नाही.

पॉन्टिअ‍ॅक अ‍ॅझटेज

जनरल मोटर्सची पॉन्टिअ‍ॅक अ‍ॅझटेज बनवताना एक अत्यंत बोल्ड आणि काही ठरावीक लोकांच्याच पसंतीस उतरणारी गाडी निर्माण करण्याचा आमचा हेतू असल्याचे या गाडीचे डिझाइनर टॉम पीटर्स यांनी एका ठिकाणी सांगितले होते. प्लास्टिकचा मोठय़ा प्रमाणात केलेला वापर, बम्पर आणि मागील बाजूची अत्यंत आक्रमक आणि ‘क्रांतिकारी’ ठेवण यामुळे ही गाडी ग्राहकांच्या पसंतीस उतरली नाही. २००१ ते २००५ दरम्यान या गाडीचे उत्पादन करण्यात आले. प्रसिद्ध मालिका ‘ब्रेकिंग बॅड’मध्ये ही गाडी झळकली होती. त्यानंतर लोकांमध्ये पुन्हा या गाडीबाबत कुतूहल निर्माण झाले होते.

vaibhavbhakare1689@gmail.com