18 November 2019

News Flash

ऑफ द फिल्ड : खेळाडूंचे ‘लकी चार्म’

धोनी आजही फलंदाजी करताना सातत्याने ग्लोव्हजचे कव्हर उघडून पुन्हा बंद करायचा.

ऋषिकेश बामणे

क्रिकेटपटू आणि त्यांच्या काही अंधश्रद्धांविषयी नेहमीच चर्चा रंगते. त्यातच आपला आवडता खेळाडू एखादी खास वस्तू फलंदाजी करताना स्वत:जवळ राखत असेल अथवा एखादी कृती तो वारंवार करत असेल, तर ती गोष्ट लगेच समाजमाध्यमांवर वाऱ्याच्या वेगाप्रमाणे पसरते. आजच्या सदरात अशाच काही आजी-माजी खेळाडूंच्या ‘लकी चार्म’वर टाकलेली एक नजर.

महेंद्रसिंह धोनी

भारतीय क्रिकेटला सर्वोच्च यश मिळवून देणाऱ्या कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे जगभर चाहते आहेत. धोनी आजही फलंदाजी करताना सातत्याने ग्लोव्हजचे कव्हर उघडून पुन्हा बंद करायचा. स्वत: धोनीने आपल्याला असे करण्याची कुमार वयातील क्रिकेटपासूनच सवय असून एकप्रकारे ते मला लकीसुद्धा ठरले आहे, असे काही वर्षांपूर्वी सांगितले होते. त्याशिवाय धोनीच्या जर्सीवर असलेला सात क्रमांकसुद्धा त्याच्यासाठी लकी आहे. धोनीचा वाढदिवस ७ जुलै रोजी म्हणजेच सातव्या महिन्याच्या सातव्या दिवशी असल्याने त्याने स्वत:हूनच हा क्रमांक मागितला होता. त्याचप्रमाणे धोनीने कारकीर्दीत बहुतांश वेळा सातव्या क्रमांकावरच फलंदाजी केली आहे.

विदेशी क्रिकेटपटूंचेही असे ‘लकी चार्म’

भारतीय खेळाडूंबरोबरच विदेशी खेळाडूसुद्धा विविध प्रकारच्या अंधश्रद्धा पाळण्यात कमी नाहीत. श्रीलंकेचा लसिथ मलिंगा आजही गोलंदाजी करण्यापूर्वी प्रत्येक चेंडूचे चुंबन घेतो. सनथ जयसुर्याची प्रत्येक चेंडू खेळण्यापूर्वी स्वत:चे सर्व बॅटिंग कीट तपासण्याच्या शैलीविषयीसुद्धा फार चर्चा रंगायची. ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर प्रत्येक शतकानंतर हवेत सूर मारून आनंद साजरा करतो. त्यामुळे आपल्याला पुढील शतकासाठी अधिक प्रेरणा मिळते, असे खुद्द वॉर्नरनेच स्पष्ट केले आहे. तर ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज स्टीव्ह वॉ नेहमी त्याच्या खिशात लाल रंगाचा रुमाल ठेवायचा. दक्षिण आफ्रिकेच्या नील मॅकेन्झी तर फलंदाजीला येण्यापूर्वी ड्रेसिंग रूममधील सर्व लाइट-पंखे बंद असल्याशिवाय फलंदाजीलाच जायचा नाही.

विराट कोहली

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि सध्याच्या घडीला विश्वातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या विराट कोहलीसुद्धा काही बाबतीत अंधश्रद्धा पाळतो. २०१२-१३च्या काळात विराट सर्व सामन्यांत त्याच ग्लोव्हजची जोडी घालून खेळत असे ज्यामुळे त्याच्या धावा होत. स्वत: कोहलीने आपण बालपणापासूनच ही प्रथा पाळत असल्याचे कबूल केले होते. मात्र त्यानंतर त्याने ही प्रथा मोडली. सध्या कोहली नेहमी हातात एक कडा व काळ्या रंगाचा बँड घालताना आढळतो. त्यामुळे याविषयीसुद्धा चाहत्यांमध्ये चर्चा रंगते.

सचिन तेंडुलकर

महान फलंदाज सचिन तेंडुलकर नेहमी फलंदाजीला सुरुवात करण्यापूर्वी डाव्या पायाचा पॅड प्रथम बांधायचा. त्यामुळे हे त्याच्यासाठी फार नशीबवान असल्याची समज होती. त्याचप्रमाणे सचिन बहुतांश सामन्यात एकच बॅट घेऊन फलंदाजीला उतरत असे. एमआरएफकडून आदिदासकडे वळल्यावरसुद्धा सचिनने बॅटवर विविध उपचार करून कारकीर्दीच्या शेवटच्या लढतीपर्यंत एकच बॅट वापरली.

First Published on July 11, 2019 1:19 am

Web Title: cricketers and their lucky charms zws 70
Just Now!
X