एका क्लिकवर जेवणाची ऑर्डर देणाऱ्या किंवा संकेतस्थळांवर चटकन खरेदी करणाऱ्या तरुणाईची प्रेमाची परिभाषा बदलते आहे. आता प्रेमही ‘टू मिनिट नूडल्स’सारखं पटकन होतं आणि भंगही पावतं. ‘डेटिंग अ‍ॅप’च्या या आभासी दुनियेत हे क्षणभंगुर प्रेम सहज शक्य आहे. या आभासातील वास्तव मात्र, गंभीर आहे.

परराज्यातून मुंबईत नोकरीसाठी आलेला निशांत एका मल्टिनॅशनल कंपनीत उच्च पदावर काम करतो. आपलं कुटुंब आणि मित्रमंडळी यांच्यापासून दूर राहताना स्पर्धात्मक युगातील दैनंदिन ताण यातून त्याला मोकळीक हवी आहे. नव्या शहरात कार्यालयातील सहकर्मचाऱ्यांव्यतिरिक्त त्याला कोणी ओळखतही नाही. अशा वेळी कोणीतरी आपला एकटेपणा समजून घ्यावा म्हणून तो ‘डेटिंग अ‍ॅप’वर नोंदणी करतो. काही ‘स्वाइप’च्या खेळानंतर त्याला एखादी मैत्रीण मिळालेली असते. पुढे चॅटिंग, प्रेम आणि ब्रेकअपही. पुन्हा तोच खेळ सुरू.

प्रेम व्यक्त करण्यासाठी पत्रापासून मोबाइलपर्यंतचा प्रवास आता स्मार्टफोनवर येऊन ठेपला आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकची सीमारेषाही ओलांडत या प्रेमाने ‘डेटिंग अ‍ॅप’पर्यंत मजल मारली आहे. फक्त काही जुजबी माहितीनंतर या ‘डेटिंग अ‍ॅप’वर आपलं अकाऊंट ओपन करता येतं. आकर्षक सेल्फी आणि छायाचित्रे टाकून प्रोफाइलला जास्त ‘हिट्स’ मिळवण्याची सोय करू शकतो. आवडीनिवडी मांडल्यानंतर आवडीचा ‘जोडीदार’ मिळणे सोपे जाते. इथे जोडीदार या शब्दामुळे हे ‘अ‍ॅप्स’ विवाह संकेतस्थळे असल्याचा गैरसमज करू नये. या अ‍ॅप्सवर अनेक जण हे फक्त शॉर्ट टर्म डेटिंग अर्थात कमी वेळात प्रेम करण्यासाठी असतात. या प्रेमात गांभीर्य असेल असे नाही. काही काळ जोडीदारासोबत फिरणं, चित्रपट पाहणं, खाणपिणं, थोडक्यात ‘एन्जॉय’ करणं इतकाच या प्रेमाचा उद्देश असतो. या नव्या प्रेमाच्या संकल्पनेपासून प्रेमाच्या आणाभाका, त्याचं लग्नात रूपांतर होणं या गोष्टी खूप दूर आहेत.

या ‘डेटिंग अ‍ॅप’वरील अनेक तरुण-तरुणी हे एकटेपणाला कंटाळून आलेले असतात. काहींना मित्र-मैत्रिणी असतातही पण मानसिक गरजांसाठी या ‘डेटिंग अ‍ॅप’वर अकाऊंट तयार करणारे अनेक आहेत. अनेकदा यातून लैंगिक, आर्थिक फसवणूक असे गंभीर गुन्हेही घडतात. सायबर तज्ज्ञांच्या मते या ‘डेटिंग अ‍ॅप’वर अनेक खोटय़ा ‘प्रोफाइल’ असतात. खोटय़ा माहिती आणि छायाचित्रांच्या आधारे हे गुन्हेगार या अ‍ॅपवरील तरुणींना जाळ्यात अडकवतात. अनेकदा एकटेपणामुळे या तरुणी भावनेच्या आहारी जातात. कोणतीही शहानिशा न करता सर्व माहिती समोरच्याला देतात. क्रेडिट कार्ड पासवर्ड, बँक खात्याची माहिती सहज मिळवली जाते. त्याचा गैरफायदा घेत कित्येकींची आर्थिक फसवणूक केली जाते.

अशा प्रकारे आर्थिक फसवणूक करण्याच्या इराद्यात असलेल्या टोळीला गजाआड केल्याची माहिती एका तरुणाने दिली. काही चुकीचे संदेश पाठवल्यामुळे त्याला बराच काळ पैशांसाठी धमक्या, ब्लॅकमेल अशा गंभीर प्रकारांचा सामना करावा लागला. छायाचित्रकार असलेल्या रोहनच्या मते या अ‍ॅपवर अकाऊंट उघडताना मुलगा आणि मुलगी दोघांनीही काळजी घेणे जरुरीचे आहे. गेली काही वर्षे तो या अ‍ॅपवर आहे. यातील काही जणींना तो प्रत्यक्ष भेटला आहे. काही जणींच्या ‘ऑनलाइन प्रोफाइल’ आणि प्रत्यक्ष व्यक्तिमत्त्वात पूर्ण तफावत असल्याचंही त्यानं नमूद केलं. अर्थात, या अ‍ॅपवर सर्वच प्रोफाइल खोटय़ा असतात असं नाही. पण खऱ्या प्रोफाइलचीही गोची असते. ती अशी की, या अ‍ॅपवर अनेक जण प्रत्यक्षात जसे आहेत त्यापेक्षा वेगळे असतात. अगदी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप या समाजमाध्यमांवरही अनेक जण चॅट करताना तो मी नव्हेच, अशी भूमिका वठवण्यात तरबेज असतात.

येथेही समोरच्यावर छाप पाडण्यासाठी अनेक जण स्मार्ट आणि कुल असल्याचा आविर्भाव आणतात. काही जण श्रीमंतीच्या गमजा मारतात, गरजेपेक्षा जास्त संवेदनशील, भावुक असल्याचं भासवतात. भुरळ पाडणारं संवादकौशल्य त्यांच्यात ठासून भरलेलं असतं. मुलीही अशा व्यक्तिमत्त्वाला भुलतात आणि प्रेमात पडतात. प्रत्यक्ष भेटल्यावर मात्र अनेकांचा भ्रमनिरास झालेला असतो. चॅटिंगवर अस्खलिखित इंग्रजी बोलणारे प्रत्यक्षात इंग्रजीचं अवाक्षरही बोलत नाहीत हे भेटल्यावर लक्षात येतं, असे अनेक अनुभव तरुणी सांगतात. एका खासगी कंपनीत चीफ क्युरेटर असलेल्या तपोजा रॉय या तरुणीने एका तरुणाचा मजेशीर अनुभव सांगितला. तपोजा तीन वर्षांपासून एका डेटिंग अ‍ॅपवर आहे. तपोजाला अपेक्षित नसताना हा तरुण सतत चॅटवरून तिची काळजी वाहायचा. मात्र जेव्हा भेटण्याची वेळ आली तेव्हा कॉफी शॉपमध्ये भेटण्यास तो नकार देऊ लागला. तपोजाने सार्वजनिक ठिकाणाशिवाय इतरत्र भेटण्यासाठी नकार दिल्यावर त्याने भेटण्यात रस नसल्याचं कळवलं. याउलट अनुभव खासगी कंपनीत वरिष्ठ प्रमुख व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या करिश्मा सोलंकी हिला आला. तिने मैत्रीणीच्या आग्रहाखातर ‘डेटिंग अ‍ॅप’ इन्स्टॉल करून दोन तासांत डिलीटही केले. पण तिथे तिला भेटलेल्या पहिल्याच मुलाशी तिची मैत्री झाली. त्याने तिला इतर समाजमाध्यमांवर शोधून काढले आणि मैत्रीची विनंती केली. करिश्मा म्हणते ते दोघे आजही उत्तम मित्र आहेत. ते एकमेकांशी काहीवेळा बोलतात. छान गप्पा मारतात आणि आपापल्या कामात रमून जातात. त्या दोघांची व्यक्तिगत आयुष्य वेगवेगळी आहेत. असाच अनुभव आणखीही काही जणांना आला. एका तरुणाने डेटिंग अ‍ॅपवर एक चांगली मैत्रीण मिळाल्याचं सांगितलं. गेली दोन वर्षे हे दोघे उत्तम मित्र आहेत.

माणसांमाणसांमधील संवादाचा अभाव, नेहमीच्या समाजमाध्यमांनाही कंटाळलेले अनेक तरुण-तरुणी भावनिक आधारासाठी या डेटिंग अ‍ॅपचा आधार घेतात. प्रेमाच्या आभासी दुनियेत खरं प्रेम शोधण्याचा प्रयत्न करतात. काही जण याकडे निव्वळ मनोरंजन म्हणून पाहतात, तर काहींची विनाकारण भावनिक फरफट होते. प्रेमाची ही आभासी दुनिया परिकथेतील प्रेमाइतकी नक्कीच रंजक नाही.

काय काळजी घ्याल?

* आपला घरचा पत्ता, बँक खात्याची माहिती, क्रेडिट कार्ड पासवर्ड समोरच्या व्यक्तीला देऊ नका.

*  तुमच्याबद्दलची माहितीही एका विशिष्ट मर्यादेपर्यंत सीमित ठेवा.

*  प्रत्यक्ष भेटीच्या वेळी सेल्फी काढणे, जवळीक करणे टाळा.

*  भेटायला जाणाऱ्या व्यक्तीची पूर्व माहिती घ्या, त्या माहितीची इतर समाजमाध्यमांवरून खातरजमा करा.

* भेटायला जाताना शक्य असल्यास एखाद्या मैत्रिणीला किंवा मित्राला सोबत न्या.

‘डेटिंग अ‍ॅप’वर बरेचदा प्रेमाच्या नात्यात अडकण्यासाठी आसुसलेल्या व्यक्ती नोंदणी करतात. एकाकी व्यक्ती अनेकदा या अ‍ॅपच्या माध्यमातून जाळ्यांत अडकतात. फसवणुकीचे गुन्हे करणारे अशा अ‍ॅप्सवर सावज सहज हेरतात.

– प्रशांत माळी, सायबर कायदेतज्ज्ञ

 

आमच्या अ‍ॅपवर आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने सर्व काळजी घेतली आहे. मुळात आम्ही अ‍ॅप रजिस्टर करणाऱ्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेतो. त्यांच्या सर्व कागदपत्रांची तपासणी करतो. त्यानंतर निवड झालेल्यांनाच काही रक्कम भरून अ‍ॅपवर नोंदणी करता येते.

– सिद्धार्थ मंघरम, मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘फ्लोह डेटिंग अ‍ॅप’