नियोजन आहाराचे :- डॉ. अरुणा टिळक

दडॉक्टर तुम्ही काय? तुम्ही कधी आजारीच पडत नसणार. तुमच्याकडे सर्वच रोगांची औषधे असतात.. असे आमच्या, बहुतेक रुग्णांना वाटत असते. पण मग त्यांना समजवावून सांगावे लागते की, आम्हीसुद्धा तुमच्यासारखीच दोन हाता-पायाची माणसे आहोत. आम्हालाही सर्व आजार, रोग होऊ शकतात. दिवसभर अनेक रुग्णांना तपासले जाते, त्यामुळे विविध आजारांची लागण त्यांनाही होऊ शकते.

डॉक्टरांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी आहाराद्वारे कशी घ्यावी हे बघू या.. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’च्या धर्तीवर रुग्णसेवेस वाहिलेल्या डॉक्टरांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी नक्कीच घेतली पाहिजे. योग्य त्या मास्कचा वापर करणे. हँडग्लोव्हजचा वापर करणे आवश्यक आहे. ज्या डॉक्टरांना दवाखान्यातून येण्यासाठी दुपारी दोन/अडीच होणार असतील, तसेच रात्री ११-१२ वाजत असतील तर सकाळी दवाखान्यात जातानाच जेवण करून जावे. तसेच संध्याकाळीसुद्धा जेवण करूनच घराबाहेर पडावे. रात्री घरी आल्यावर जर भूक लागली असेल तर गरम दुधात सुंठ/ हळद/ केशर घालावी. याने त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच गरज पडल्यास राजगिरा लाडू, राजगिऱ्याच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा असा हलका आहार घ्यावा. बदाम भिजवून खाल्ल्याने बुद्धिवर्धक होतात. पण भिजवून सोललेले दोन बदाम रात्री खाल्ल्यास ‘स्ट्रेस लेव्हल’ कमी होऊन शांत झोप लागते. त्यामुळे त्याचे रात्री जरूर सेवन करावे. पुरुषांच्या बरोबरीने स्त्री डॉक्टरसुद्धा व्यवसाय करतात. अशावेळी त्यांना घर, मुले, त्यांचे आरोग्य, दवाखान्याचा संसार ही तारेवरची कसरत करावी लागते. स्त्री जीवनातील सर्व टप्पे पार करताना तिच्या शारीरिक स्थितीचा तिने नक्कीच विचार करावा. तिने मुलांचे डबे भरताना (खाण्यास वेळ नसेल तर) ओटय़ाशीच प्रथम नाश्ता करावा. दवाखाना लांब असेल, गाडीने जावे लागत असल्यास अथवा गाडी चालवत जावे लागत असल्यास, (काजू,  बदाम, चिक्की, एखादे फळ) आपल्याजवळ जरूर बाळगावे. ज्या डॉक्टरांना शक्य असेल त्यांनी आपला जेवणाचा डबा दवाखान्यात जाताना बरोबर न्यावा. दुपारी १२.३० किंवा १ यावेळेस रुग्ण तपासणी थांबवून आपले जेवण करावे. आपण जर तंदुरुस्त असू तरच आपण दुसऱ्यांना दुरुस्त करणार ना!

रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आहारात, आवळा च्यवनप्राश, सुंठ, मिरीचा जेवणात वापर जरूर करावा. आल्याचा, ओल्या हळदीचा वापर, तुळशी, पुदिन्याचा वापर, तसेच लसणीचा प्रयोग आहारात जरूर करावा. सतत चहा-कॉफी पिणे टाळावे. जेव्हा शक्य आहे, तेव्हा गरम पाणी प्यावे. कारण रुग्ण संपर्क आणि संसर्ग हा श्वासावाटे, घशाकडे चटकन होऊ शकतो. वेखंड चूर्ण आणि सुंठ चूर्ण हे कपाळाला, घशाला, छातीला जरूर लावावे. त्याने जंतुसंसर्ग टाळण्यास मदत होते.

ब्लू बेरी, रास्पबेरी, स्ट्रॉबेरी ते अननस या बेरी वर्गातील फळांचे जरूर सेवन करावे. त्यात अ‍ॅन्टिऑक्सिडंट गुण असतात. त्याच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती उत्तम वाढते. गाईच्या तुपाचे चार-चार थेंब नाकात जरूर घालावेत. पपई, आंबा, लिंबू या फळांचे जरूर सेवन करावे. डॉक्टर मित्रमैत्रिणींनो अशाप्रकारे स्वत:ची काळजी घ्यावी.