ज्योती चौधरी-मलिक

साहित्य : १ वाटी बासमती तांदूळ, १ वाटी साखर, ४-५ लवंगा, १ चमचा वेलची पूड , जायफळाची पूड पाव चमचा. साजूक तूप ४ चमचे, ओल्या नारळाचा किस १ वाटी, मीठ चिमूटभर, चिमूटभर रंग, काजू, बदाम, किशमीस.

कृती :  तांदूळ धुऊन पाण्यात एक तास भिजवत ठेवा. तासाभरानंतर तांदूळ उपसून दुसऱ्या एका भांडय़ात काढून घ्या. त्यातील पाणी ओतून टाका. एका भांडय़ात भात करण्यासाठी पाणी तापत ठेवा. एका कढईमध्ये आवश्यकतेनुसार तूप गरम करा. त्यात ४-५ लवंगा टाका. त्या तळून वर आल्यावर त्यात तांदूळ टाका. ३-४ मिनिटे मंद आचेवर परता. यानंतर तांदळात तुमच्या आवडीप्रमाणे उकळलेले पाणी घाला. पाणी फार घातलेत तर भात पाणचट किंवा मऊसर होऊन जाण्याची शक्यता आहे. तांदूळ शिजल्यानंतर त्यात केशरी रंग, जायफळ, वेलची पूड टाका. साखर घाला. साखर घालून हळुवार परतवा. आता त्या भातात साखरेचा पाक तयार झाला असेल. त्यात ओले खोबरे घाला. सोबत काजू, बदाम, किसमीसचे कापही घाला. पुन्हा हलवून एखादे मिनिट गॅसवर ठेवा. गरमागरम नारळीभात तयार आहे.