तंत्रज्ञानाच्या जगात मानवाने मोठय़ा प्रमाणात प्रगती केली आहे आणि जीवन सोपे करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा मोठय़ा प्रमाणात वापर करून घेतला आहे. ज्या त्या गरजेनुसार मानवाने तंत्रज्ञानात प्रगती केली. हे बदलणारे तंत्रज्ञान महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याची बाब आपल्याला पाहायला मिळते. तंत्रज्ञानाची जोड आज महिला सुरक्षेला मिळाली आहे. एखाद्या महिलेजवळ असणाऱ्या स्मार्टफोनमधील विशेष सुरक्षा अ‍ॅपद्वारे ती तिचे संरक्षण आज करू शकते. महिलांना निर्धास्तपणे जगण्यास मदत करणाऱ्या अ‍ॅप्लिकेशनविषयी जाणून घेऊयात..

आजच्या काळातही महिला निर्धास्तपणे घराबाहेर पडू शकत नसल्याच्या तक्रारी अनेक महिला करत असतात. हत्या, बलात्कार, अपहरण, छेडछाड यासारख्या विविध घटना समाजात घडत असल्याचे आपल्याला माध्यमे, समाजमाध्यमांवर वाचायला मिळतात.

सकाळ असो किंवा रात्र महिला सुरक्षेचा प्रश्न हा कायम ऐरणीवर असतो. या पाश्र्वभूमीवर महिलांना सुरक्षेबाबत निश्चिंत करणारे किंवा त्यांच्या सुरक्षेची खबरदारी घेणारे अनेक अ‍ॅप सध्या अ‍ॅप बाजारात उपलब्ध आहेत.

‘एमएसएमआर वुमन सेफ्टी’

या अ‍ॅपमध्ये उपलब्ध असलेल्या सुरक्षा पर्यायाचा वापर केल्यास सायरन वाजते आणि महिला संकटात असल्यास आजूबाजूच्या लोकांचे लक्ष वेधून घेण्यास मदत होते. एसओएसच्या माध्यमातून आपला फोन थेट पोलिसांद्वारे असलेल्या महिला मदत क्रमांकावर जोडला जातो. तसेच अ‍ॅपमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या जवळच्या व्यक्तीच्या क्रमांकावर आपोआप संकटात सापडल्याचा संदेश पाठवण्यात येतो. या सुविधेमुळे महिलांना बिकट परिस्थितीत स्वत:हून फोन करण्याची किंवा संदेश पाठवण्याची गरज भासत नाही. या अ‍ॅपमध्ये स्वसुरक्षेसाठी काही युक्त्यांचा समावेश करण्यात आला आहे जे महिलांना ऐनवेळी उपयोगी ठरतात. या अ‍ॅपमध्ये संकटाच्या वेळी काय करावे आणि काय करू नये याचे प्रशिक्षण देणारे लेख आणि चित्रफितीदेखील उपलब्ध आहेत. या सर्व सुविधांमुळे महिलांवर येणारे संकट टाळण्यास मदत होते.

‘रक्षा’

या अ‍ॅपमध्ये ‘आर यू इन ट्रबल’ हा पर्याय आहे. या पर्यायावर संकटात सापडलेल्या महिलेने क्लिक केल्यास त्याची माहिती पोलिसांना मिळते. तसेच जवळच्या व्यक्तीचा संपर्क क्रमांक नोंदवला असल्यास त्या व्यक्तीच्या मोबाइलवर देखील महिला संकटात सापडल्याचा संदेश जातो. यामुळे महिलांना आपल्या जवळच्या व्यक्तींची मदत मिळणे सहज शक्य होते. कोणत्याही महिलेला सहज वापरता येईल असे हे अ‍ॅप्लिकेशन असल्यामुळे अनेक महिला हे अ‍ॅप्लिकेशन वापरण्यास प्राधान्य दर्शवतात.

‘माय सेफ्टीपिन’

जशी सेफ्टीपिन ही महिलांना ऐन वेळी उपयोगात येते तसेच हे अ‍ॅपही महिलांचे संकट निवारण करण्यास उपयुक्त ठरते. हे अ‍ॅप उपस्थित ठिकाणाची महिलांद्वारे चौकशी करून ती जागा किती सुरक्षित आहे याची माहिती पुरवते. या अ‍ॅपद्वारे संकटात असताना जीपीएस बंद असूनही उपस्थित ठिकाण ट्रेस होते आणि त्या ठिकाणापासून जवळचे सुरक्षित ठिकाण महिलेला दर्शवण्यात येते. महिलांना संकटातून वाचण्याची पूर्वसूचना माय सेफ्टीपिनद्वारे मिळते.

‘विथ यू’

या अ‍ॅपमुळे महिलांना कधीच एकटेपणा जाणवू शकत नाही. कारण अ‍ॅप सुरु करण्यापूर्वी संबंधित महिलेला तिच्या जवळच्या व्यक्तीचा क्रमांक तसेच इतर माहिती अ‍ॅप्लिकेशनमध्ये समाविष्ट करावी लागते. त्यानंतर महिला ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणची सर्व माहिती नोंद केलेल्या व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकावर पोहोचते. मात्र ही माहिती प्रत्येक दोन मिनिटांनी सबंधित व्यक्तीला तिच्या मोबाइलद्वारे कळत असते.

‘वुमन सेफ्टी’

महिला सुरक्षिततेसाठी या अ‍ॅपमध्ये ‘जस्ट टॅब बटण’ हा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये संकटाच्या वेळी अ‍ॅपमधील पर्याय असलेले बटण दाबल्यास संकटात सापडलेल्या महिलेच्या ठिकाणाची माहिती थेट अ‍ॅपशी संलग्न जवळच्या व्यक्तीच्या क्रमांकावर पोहोचते. अ‍ॅपद्वारे पुढील आणि मागील कॅमेऱ्याच्या आधारे दोन फोटो काढण्यात येतात, तसेच त्या वेळी चित्रफीत आणि ध्वनिसंकलन होऊन त्याचा मेल हा संलग्नित जवळच्या व्यक्तीच्या मेलवर आयडीवर जातो.

संकलन- गीता कुळकर्णी