मागील भागात आपण गॅलरीत किंवा बाल्कनीत लावता येतील अशा गुलाब आणि मोगरा या दोन सुगंधी फुलझाडांची माहिती घेतली. या भागात विविध रंगांच्या आणि सुगंधी चाफ्यांची माहिती घेऊ या..
सोनचाफा जर कुंडीत लावला तर जमिनीत लावलेल्या झाडापेक्षा अनेक पट अधिक फुले देतो. सोनचाफ्याचे तीन मुख्य प्रकार आहेत. केशरी, पिवळा व पांढरा. केशरी रंगाचे फूल सुंदर आणि सुगंधी असते. त्याला पाकळ्याही भरपूर असतात. पिवळे फूल थोडे लांबट असते, तर पांढऱ्या सोनचाफ्याला पाकळ्या कमी व नाजूक असतात, पण सुगंध बाकीच्या चाफ्यांपेक्षा खूप जास्त असतो. सोनचाफ्याच्या सर्व जातींची कलमे मिळतात. आवडीचे कलम आणून मोठी कुंडी घ्यावी. कलमाचा जोड मातीत जाणार नाही याची काळजी घ्यावी.
बागकामाची हौस पूर्ण करण्यासाठी काही गोष्टी आणून ठेवाव्या लागतात. खत व औषध महत्त्वाचे! सेंद्रिय पोषक खत वापरावे. ज्या झाडांचे आयुष्य जास्त आहे त्यांना साधारण १५-२० दिवसांनी खत घालावे. कडुनिंब/ करंज/ एरंडीची पेंड वापरावी. ती कुजून त्यातील अन्नद्रव्ये वनस्पतींना मिळतात. या वनस्पती मातीतील हानीकारक कीटक व बुरशी नियंत्रित ठेवतात. यात प्रामुख्याने नत्र असतो, जो झाडांची वाढ करतो. हाडांचा चुराही (बोनमील) वापरता येईल, त्यात स्फुरद (फॉस्फेट) असते, जे मुळांची व खोडाची वाढ व फुले येण्यास मदत करते. ही दोन्ही खते कुंडी भरतानाच चमचाभर मिसळावीत. सोनचाफ्याला मातीत पाणी साठलेले आवडत नाही. पाण्याचा ताण दिल्यास पालवी व त्यासोबत कळ्या/ फुले येतात. उन्हाळ्यात व शिरीष ऋतूमध्ये पाने गळतात, त्यामुळे जमिनीतील सोनचाफ्याला २-३ वेळा बहर येतो. आपण कुंडीत कळ्यांचा बहर संपल्यावर २-४ दिवस पाणी बंद केल्यास परत नवीन पालवी व फुले येतात. वर्षभरात साधारण ४०-५० फुले सहज मिळतात.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 16, 2018 1:49 am