‘ट्रव्हिजन’ या कंपनीने २.१ ‘४०० बीटी मल्टिमीडिया स्पीकर’ भारतीय बाजारात आणला आहे. चकचकीत बाह्यावरण असलेला हा स्पीकर लाकडी चौकटीत बसवण्यात आला असून यात एलईडी डिस्प्लेही पुरवण्यात आला आहे. हे २.१ स्पीकर्स २० वॅट्स आरएमएस, सबवूफर्ससाठी ४ इंची ७ १ सेंमी बास ड्रायव्हरनी युक्त असून तुम्हाला तुमच्या संगीताच्या प्रत्येक तपशिलात सुस्पष्टतेचा आनंद घेता येतो. या स्पीकरमधून संगीत, चित्रपट आणि गेम्स यांच्यासाठी कुठल्याही ठिकाणी आरामदायीपणे बसून सर्वोत्तम आवाजाचा आनंद घेता येईल, असा कंपनीचा दावा आहे. या स्पीकरमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ, यूएसबी, पेनड्राइव्ह आणि मायक्रोएसडी असे पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये इनबिल्ट एफएमही पुरवण्यात आला असून रिमोट कंट्रोलच्या साह्याने या सर्व गोष्टी हाताळता येतात.
किंमत : २९९९ रुपये

‘रीअलमी’चा नवीन फोन

भारतीय मोबाइल ग्राहकांत लोकप्रिय होत असलेल्या ‘रीअलमी’ या ब्रॅण्डचा ‘सी१’ हा नवीन स्मार्टफोन बाजारात आला आहे. दोन जीबी रॅम + ३२ जीबी अंतर्गत स्टोअरेज तसेच तीन जीबी रॅम+३२ जीबी अंतर्गत स्टोअरेज अशा दोन प्रकारांत हा फोन उपलब्ध होणार आहे. ४२३० एमएएच क्षमतेची बॅटरी असल्यामुळे हा फोन गाणी ऐकत असतानाही १८ तास चार्जिगविना कार्यरत राहतो, असा कंपनीचा दावा आहे. याखेरीज क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ऑक्टा कोअर प्रोसेसर, २५६ जीबीपर्यंत स्टोअरेज वाढवण्याची क्षमता, ६.२ इंचाची स्क्रीन, १३+२ एमपीचा डय़ुअल कॅमेरा, पाच मेगापिक्सेलचा पुढील कॅमेरा अशी या फोनची अन्य वैशिष्टय़े आहेत.
किंमत – ७४९९ ते ८४९९ रुपये (फक्त फ्लिपकार्टवर)

‘आयसन’चा ६५ इंची टीव्ही

‘आयसन’ या कंपनीने अँड्रॉइड ६.० ऑपरेटिंस सिस्टिम असलेला ‘अ65वऊर980’ हा यूएचडी टीव्ही बाजारात दाखल केला आहे. उत्कृष्ट चित्र, उच्च दर्जाचे इंजिन, जलद प्रतिसाद, स्मार्ट असणारा हा मल्टि-फंक्शन टीव्ही मनोरंजनाचा अनुभव कैकपटीने वाढवतो. या टीव्हीचा डिस्प्ले स्क्रीन ३८४० बाय २१६० रेझोल्युशनचा असून ‘वाइड व्ह्यूइंग अँगल’मुळे चित्र अतिशय स्पष्ट दिसते, असा कंपनीचा दावा आहे. यात १.५ गिगाहार्ट्झचा क्वाड कोअर प्रोसेसर असून दोन जीबी रॅम व १६ जीबी स्टोअरेज क्षमता अशी या टीव्हीची प्रमुख वैशिष्टय़े आहेत. यात ४ यूएसबी पोर्ट, एक एव्ही इनपुट आणि ३एचडीएमआय पोर्ट पुरवण्यात आले आहेत.
किंमत – ७९९९० रुपये.

‘एफ अ‍ॅण्ड डी’चा स्मार्ट टीव्ही

ऑडिओ क्षेत्रात चांगले नाव असलेल्या ‘एफ अ‍ॅण्ड डी’ या कंपनीने एका स्मार्ट टीव्हीद्वारे टीव्ही उद्योगात पाऊल ठेवले आहे. ‘एफएलटी-४३०२ एसएचजी’ हा ४३ इंचाचा टीव्ही कंपनीने नुकताच भारतीय बाजारात आणला आहे. फुल एचडी असलेल्या या टीव्हीचे स्क्रीन रेझोल्युशन १९२० बाय १०८० इतके असून ए+ ग्रेड पॅनलमुळे टीव्हीवरील दृश्यातील कॉन्ट्रास्ट चांगला उठून दिसतो. या टीव्हीत आठ वॉटचे दोन स्पीकर पुरवण्यात आले आहेत. अँड्रॉइड ७.० वर चालणाऱ्या या टीव्हीत नेटफ्लिक्स, हॉटस्टार सारखे अ‍ॅप आधीच पुरवण्यात आले आहे. तसेच या टीव्हीवरून वेबब्राऊजिंग किंवा ऑनलाइन गेम खेळण्याचीही सुविधा पुरवण्यात आली आहे. एक जीबी रॅम, आठ जीबी स्टोअरेज, दोन यूएसबी पोर्ट, तीन एचडीएमआय पोर्ट अशी या टीव्हीची अन्य वैशिष्टय़े आहेत.
किंमत – ४९९९० रुपये

-‘रॅपो’चा वायरलेस माऊस, कीबोर्ड

‘रॅपो’ या कंपनीने वायरलेस माऊस आणि कीबोर्डचे संयुक्त उत्पादन बाजारात आणले आहे. १००० डीपीआय हायडेफिनेशन ट्रॅकिंग इंजिनच्या तंत्रज्ञानामुळे या माऊसचे कर्सर नियंत्रण अतिशय अचूक असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. यामध्ये २.४ गिगाहार्ट्झचे वायरलेस कनेक्शन असल्यामुळे दहा मीटर अंतरावरूनही या कीबोर्डद्वारे संगणक संचलन करता येते.
किंमत : १०७९ रुपये.