गायत्री हसबनीस

सध्याच्या सणासुदीच्या दिवसात सर्व वयोगटातील मंडळींना विविध प्रकारची स्टायलिंग आणि फॅशनला बऱ्याच अंशी मोकळीक मिळाली आहे. अस्सल पारंपरिक कपडय़ांची खरेदी तर या काळात होतेच होते.

गुढीपाडव्यासारखे सण आता जवळ येऊन ठेपले आहेत. नाही म्हटलं तरी चैत्रात पारंपरिक कपडय़ांच्या वा दागिन्यांच्या खरेदीला उधाण येते. सध्याच्या सणासुदीच्या दिवसात सर्व वयोगटांतील मंडळींना विविध प्रकारची स्टायलिंग आणि फॅशनला बऱ्याच अंशी मोकळीक मिळाली आहे. अस्सल पारंपरिक कपडय़ांची खरेदी तर या काळात होतेच होते, तसेच खरेदीचा एक भाग हा जरी असला तरी अनेक जण स्वत:ला हवे तसे आउटफिट्स शिवून घेतात. साडी वा एथनिक कपडे घेऊन ‘रिसायकल’ केलेले कपडे स्वस्त आणि टिकाऊ असतात. त्यामुळे वैयक्तिक फॅशन करण्यावर लोकांचा भर असतो. साडय़ांच्या फॅशनची क्रेझही या दिवसात कायम असते. याउपर सध्या बाजारात येणाऱ्या ‘कस्टमाइज्ड’ दागिन्यांची खरेदी म्हणजे युवक आणि युवतींच्या आवडीचा विषय आहे.

गुढीपाडवा हा असा एक सण आहे जिथे हल्ली फॅशनचे रूपडे झपाटय़ाने बदलत आहे. गेल्या दोनएक वर्षांच्या कालावधीत हा बदल हमखास टिपतो. या सणाला युनिसेक्स फॅशनचा पगडा अधिक आहे. मुला-मुलींची फॅशन वेगवेगळी असे चित्र पाहायला मिळत नाही. तर प्रौढही त्यांच्या आवडीच्या फॅशनसाठी नेहमीच सिद्ध असतात. दैनंदिन फॅशनमधून बाहेर पडून वेगळी वा ‘आउट ऑफ द बॉक्स’ अशी फॅशन करण्याची योग्य संधी गुढीपाडव्याच्या निमित्त युवक-युवतींना मिळते हे सध्या गुढीपाडव्यातील पारंपरिक आणि आधुनिक फॅशनचं वैशिष्टय़ म्हणावं लागेल.

कापडांमध्ये पाहिले तर मुलींमध्ये कॉटन, लेनिन आणि सिल्कसारखे सर्वज्ञात प्रकार लोकप्रिय असतात. मुली जास्त करून साडय़ांच्या कापडाचे कुर्ते, पायजमा, पलाझो, स्कर्ट, जॅकेट अशा स्टाइल्सचे कपडे शिवून घेतात, तसेच विकतही घेतात. अशा स्टाइलिश कपडय़ांवर ज्वेलरीतील विविध प्रकार घालायला वाव असतो. सध्या नोझरिंग, मेटल आणि स्टोनचे ऑक्सिडाइज नेकलेस आणि ब्रेसलेट्स असे प्रकार ट्रेण्डमध्ये आहेत. त्याव्यतिरिक्त अंगठय़ांमध्येही मेटल वा सिल्व्हर पद्धतीच्या अंगठय़ा जाऊन तिथे सोनेरी धातूच्या आणि डायमंडच्या अंगठय़ा ट्रेण्डमध्ये आहेत. मुलींना दागिन्यांतला सध्या सर्वात आवडणारा प्रकार म्हणजे पैंजण. चांदीच्या पैंजणाची क्रेझ सुरू आहे ही खूप महत्त्वाची बाब आहे. कारण पैंजणात आधुनिक म्हणजेच वेस्टर्न स्टाइल्स येत असतात.

योग्य निवड आणि पसंती 

मुलांच्या बाबतीत पाहायला गेलं तर पैठणी, इरकल आणि जरीच्या कापडाचे कुर्ते, ब्लेझर, जॅकेट आणि कोट असे प्रकार हमखास उपलब्ध असतात. सध्या अशा फॅब्रिकपासून बनवलेले कपडे हे पेशवाई स्टाइलमध्ये आहेत. ज्यात खासकरून ‘धोती आणि कुर्ता’, ‘पायजमा आणि कोट’, ‘पॅन्ट धोती आणि पेशवाई मनी कुर्ता आणि त्यावर जॅकेट’ असे ट्रेण्ड मेन्सवेअरमध्ये आहेत. मुलांमध्येही दागिन्यांचे वेड आहे. मुलांसाठीही धातूच्या अंगठय़ा, भिकबाळी, सोन्याच्या चेन्स, मोत्याचे कानातले आणि पेंडन्ट असलेले नेकपीस ट्रेण्डमध्ये आहेत. मुलं असे दागिने सणावाराला हमखास घालतात. दुसरीकडे मुलींच्या फॅशनमध्ये एक गोष्ट आवर्जून लक्षात येते ती म्हणजे ज्यांना साडय़ा, साडय़ांचे एथनिक ड्रेसेस वा वनपीस घालायला आवडत नाहीत, त्या जास्त करून लांबलचक आणि ढगळ पलाझो पॅन्ट, लांब स्लीवलेस कुर्ते आणि कॉटनचे ड्रेस परिधान करायला आवडतात. त्यासोबत अशा आउटफिटला शोभतील अशी पारंपरिक नथही मुली परिधान करतात.