डॉ. नीलम रेडकर

पावसाळा हा ऋतू तरुणांसाठी आल्हादायक असला तरी घरातील ज्येष्ठ मंडळींसाठी मात्र तो बऱ्याचदा त्रासदायक असतो. या वयामध्ये शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्याने पावसाळ्यातील साथीच्या आजारांची लागण त्यांना होण्याची शक्यता अधिक असते. पावसाळ्यात होणारी डासांची उत्पत्ती, वातावरणातील दमटपणामुळे होणारा जंतुसंसर्ग या कारणांमुळे डोके वर काढणारे मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस या आजारांची लक्षणे ज्येष्ठांमध्ये काही प्रमाणात वेगळी असतात. तसेच या आजारांचे दुष्परिणामही त्यांच्यामध्ये गुंतागुंतीचे असतात.

हिवताप किंवा मलेरिया

अ‍ॅनॉफिलिस नावाच्या जातीच्या डासांच्या चावण्याने हा आजार होतो. या रोगाचे जंतू मानवी शरीरात प्रवेश केल्यानंतर काही दिवसांनी हिवतापाची लक्षणे दिसू लागतात.

लक्षणे :

*  ताप येण्याआधी थंडी वाजते. थंडी वाजण्याचा त्रास १५ मिनिटे ते तासभर असतो.

*  ताप कमी होताना घाम येऊन उतरतो.

*  ताप सहसा दिवसाआड किंवा रोज येतो.

*  तापासोबतच डोकेदुखी, अंगदुखी, थकवा ही लक्षणेही कधी कधी दिसून येतात.

*  प्लासमोडिअम फाल्सिपॅरम प्रकारच्या मलेरियाच्या जंतूमुळे रुग्ण कोमात जाण्याची आणि दगावण्याची शक्यता अधिक असते.

*  मूत्रपिंड निकामी होणे, कावीळ होणे, श्वसनाचा त्रास होणे, रक्तातील पांढऱ्या पेशी (प्लेटलेट्स) कमी झाल्याने रक्तस्राव होणे गंभीर लक्षणेही आढळून येतात.

वरील लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डेंग्यू

एडीड जातीच्या डासांच्या चावण्याने हा आजार होतो. हा तीव्र फ्लूचा आजार आहे. डासांच्या चावण्यानंतर पाच ते सहा दिवसांनंतर या रोगाची लक्षणे दिसायला लागतात.

या आजाराचे दोन प्रकार आहेत. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्राव ताप. डेंग्यू रक्तस्राव ताप अधिक तीर्व स्वरूपाचा असून यात मृत्यूही ओढवू शकतो.

लक्षणे :

*  अचानक थंडी वाजून ताप येणे.

*  डोकेदुखी, अंगदुखी आणि हातापायांना खूप वेदना होणे. म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात.

*  डोळ्यांच्या मागील भागात वेदना होणे व डोळ्यांच्या हालचालीसोबत अधिक वेदना होणे.

*  प्लेटलेट्स कमी झाल्याने अंगावर लाल रंगाचा पुरळ येणे.

*  डेंग्यू रक्तस्रावात्मक तापात अंगावर लाल चट्टे उठणे, हिरडय़ांमधून रक्तस्राव होणे, शरीरातील अंतर्गत भागात रक्तस्राव होणे, छातीत आणि पोटात पाणी जमा होणे ही लक्षणे दिसून येतात.

लेप्टोस्पायरोसिस

लेप्टोस्पायरोसिस या जिवाणूंमुळे हा आजार होतो. उंदीर, पाळीव प्राणी, गाय, म्हैस, घोडा, कुत्रा यांच्या मूत्राद्वारे हे विषाणू मानवी शरीरात त्वचेच्या माध्यमातून प्रवेश करतात. नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामध्ये जेष्ठ मंडळी तुंबलेल्या पाण्यातून चालत आली असतील तर पुढील लक्षणे काही दिवसांत आढळतात का यावर लक्ष ठेवावे.

लक्षणे :

*  थंडी-ताप येणे.

*  अंगदुखी, डोकेदुखी.

*  सांधेदुखी आणि स्नायूंमध्ये तीव्र वेदना होणे.

*  कावीळ होणे.

*  डोळे लालसर होणे.

मूत्रपिंड निकामी होणे, फुप्फुसांमध्ये अंतर्गत रक्तस्राव होणे ही गंभीर लक्षणे आहेत.

घ्यावयाची काळजी

*  अनवाणी पायाने पाण्यात जाणे टाळावे.

*  पायावर जखम किंवा ओरखडा असल्यास पट्टी (ड्रेसिंग) करून घ्यावी.

*  पावसाच्या पाण्यात जाऊन आल्यास तात्काळ हातपाय साबणाने स्वच्छ धुवावेत.

*  प्रतिबंधात्मक उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने डॉक्सिसायक्लिन नावाचे औषध घेणे.