घरातलं विज्ञान – डॉ.शैलेश आठल्ये,

मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग

मानवाला पहिल्यापासून रंगांचे आकर्षण आहे. रंगांना मानवाने आपल्या जीवनात, उत्सवात, जेवणात महत्त्वाचे स्थान दिले आहे. दिवाळी किंवा अन्य सण, लग्न समारंभाच्या आधी आपण घर आकर्षक दिसावे म्हणून रंगकाम करून घेतो. पुरातन काळात नैसर्गिक रंगांचा वापर केला जात होता. ह्याचे उत्तम उदाहरण अजिंठा येथे पाहावयास मिळते. अजिंठा येथील रंग निसर्गातील झाडे, पाने, फुले, भाजीपाला यापासून बनवले गेले.

घर रंगवणे हा व्यवसाय साधारण अकराव्या शतकात उदयास आला व चौदाव्या शतकापर्यंत घर रंगवणे ही पद्धत रूढ झाली. नैसर्गिक रंग मर्यादित असल्याने कृत्रिम रंगांचा शोध लावण्यास सुरुवात झाली. रासायनिक रंग बनवण्यात यश आल्याने रंगक्रांती झाली. रंगांमध्ये दोन प्रकार असतात. १) डाय  २) पिग्मेंट. यातील फरक असा की चित्रकलेसाठी लागणारे रंग हे डाय व तैलचित्राचे रंग हे पिग्मेंट. कापड रंगवण्यासाठी ‘डाय’चा वापर केला जातो.

सुरुवातीला द्रावक (बेस मटेरिअल) म्हणून तेल किंवा पाण्यामध्ये जस्त, लोह, तांबे व फळांचे रंग एकत्र केले जात व प्राण्यांच्या केसांपासून बनवलेल्या ब्रशने लावले जात. आता प्रश्न होता तो रंगकण अतिशय बारीक करण्याचा. जितके रंगकण बारीक तितके ते पृष्ठभागावर एकसारखे पसरतात. यासाठी पिग्मेंट बारीक करणाऱ्या गिरणीचा शोध लावला गेला.

रंग लावण्याआधी पृष्ठभाग तयार करणे आवश्यक आहे. भिंत घासून जुना रंग काढला जातो व मग त्यावर पुट्टी लावली जाते.  पुट्टी लावल्यामुळे बारीक भेगा भरल्या जातात व पृष्ठभाग समतल होतो. मग त्यावर प्रायमर लावला जातो. प्रायमरमुळे रंग पृष्ठभागावर चांगला चिटकतो, दीर्घकाळ टिकतो व आतील ओल असल्यास रंगावर त्याचा परिणाम होऊ  देत नाही.

रंग म्हणजे रंगकण (पिग्मेंट) द्रावक, रेसिन व इतर घटक. डिस्टेंपर रंग यात द्रावक पाणी असते व ऑयल पेंट यात द्रावक ऑइल असते. आजकाल लोकप्रिय झालेले प्लास्टिक इमलशन यात तेल व पाण्याचे मिश्रण हे द्रावकाचे काम करते. रंग भिंतीवर लावल्यानंतर द्रावक उडून जाते व भिंतीवर रंग घट्ट बसतो. घराला बाहेरून रंग देतात त्यात पृष्ठभागावर धूळ बसू नये म्हणून व्हेदर कोट रंग आज उपलब्ध आहेत. धुलिकण प्रभारित असल्याने भिंतींना चिकटतात. तसे होऊ  नये म्हणून रंगात उपयुक्त घटक मिसळतात,  ज्याच्यामुळे धूळ भिंतींना चिकटणार नाही. तसेच आतील भिंतींना रंग देण्याकरिता हेल्थ-शिल्ड रंग उपलब्ध आहेत. यात सिल्व्हर आयन तंत्रज्ञानाचा वापर आहे. चांदीचे आयन (विद्युत प्रभारित कण) हे जिवाणूंच्या पेशी भित्तिकामध्ये छिद्र करून पेशी उद्ध्वस्त करतात. पेशीच्या डी.एन.ए.ला चिकटून त्यांच्या सर्व कार्यात अडथळे आणतात. इतकेच नव्हे तर विषाणू, कवक (बुरशी) व इतर रोगाणूंच्या पेशीच्या अंतर्गत रचनेत बिघाड करतात. असाच परिणाम पारा देखील करतो. परंतु शिसे व पारा हे आपल्या शरीराला अपायकारक असल्याने वापरले जात नाही. चांदी केवळ रोगाणूंच्या पेशींना घातक आहे. सस्तन प्राण्यांच्या आरोग्यावर चांदीचा कोणताही विपरीत परिणाम होत नाही.