लग्नकार्य आणि हळदी-कुंकू सोहळ्यांचा अचूक मेळ साधता येईल अशी एक कलाकृती आज शिकू या. दिवाळी, नाताळ, नववर्षांची शुभेच्छापत्रे आणि लग्न, मुंजींच्या पत्रिकांची बरीच ‘सुंदर रद्दी’ आता घरात गोळा झाली असेल. ठेवण्यासाठी जागा नाही आणि टाकण्याची इच्छाही होत नाही, अशा द्विधेत अडकले असाल तर ही रद्दी सत्कारणी लावू या.

साहित्य

जुन्या पत्रिका, शुभेच्छापत्रे, सॅटिन पट्टय़ा, कात्री, गम, पंच करण्याचे यंत्र, भूमितीचे साहित्य.

कृती

  • आमंत्रणपत्रिका आणि शुभेच्छापत्रांमध्ये काही कागद मायना किंवा शुभसंदेश छापलेले असतात तर काही नक्षीकाम असलेले शोभिवंत असतात. साधारण छोटय़ा आकाराचे आणि मोठे कागद वेगळे करा.
  • कोणतेही एक शुभेच्छापत्र घ्या. त्याला मुळातच मधोमध एक घडी असेल. मजकूर छापलेला भाग आत राहील अशा पद्धतीने शुभेच्छापत्र आडवे पकडा त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला बोटभर जागा सोडून दुमडा.
  • हा दुमडलेला भाग एकमेकांवर चिकटवला की छोटय़ा पिशवीचा आकार येईल.
  • एक भाग उघडा राहील. त्याच्या दोन्ही बाजू चिमटीत पकडून पंचच्या साहाय्याने दोन छिद्रं पाडा.
  • या छिद्रांतून सॅटिन रिबन ओवून पिशवीचे बंद तयार करा.
  • शुभेच्छापत्रांवरील किंवा आमंत्रणपत्रिकांवरील चित्रे कापून त्यावर चिकटवता येतील. पेपर क्विलिंग येत असल्यास त्याची एखादी कलाकृती तयार करून पिशवी सजवता येईल.
  • अशा चिमुकल्या पिशव्या हळदी-कुंकवाच्या दिवशी लाडू किंवा सुका खाऊ देण्यासाठी, छोटीशी भेटवस्तू देण्यासाठी वापरल्यास त्या पाहुण्यांसाठी केवळ सोयीचा नव्हे तर कौतुकाचाही विषय ठरतील.

apac64kala@gmail.com