विजय दिवाण vijdiw@gmail.com

तेलंगण राज्याची राजधानी हैदराबाद ऐतिहासिक तर आहेच, शिवाय तेलंगी, आंध्रप्रदेशी, कर्नाटकी, मराठी, मुस्लीम अशा निरनिराळ्या प्रादेशिक संस्कृतींचे मिश्रण येथे दिसते. इथे जाणाऱ्याने पॅराडाईज्ची बिर्याणी, बावर्चीचा मुर्ग-मुसल्लम, कोडिकुर्रा चिट्टिगारेचा चिकन रश्श्यातला मेदुवडा, चारमिनार भागात मिळणारे हैदराबादी हालीम आणि जागोजागच्या उपाहारगृहांतील बगारा बैंगन, मिरची का सालन, इडली-डोसा, रसम, शाही टुकडा, डबल का मीठा, खुबानी का मीठा, हे पदार्थ अगदी आवर्जून खायला हवेत. बटर डोसा, मसाला इडली, उत्थपम, उपमा आणि वडा-चटणी तिथे हातगाडय़ांवर उत्तम मिळते. या हातगाडीला तिकडे बंडी म्हणतात. हैदराबादेत अशा अनेक बंडय़ा दिसतात.

नामपल्ली स्टेशनजवळ असणारी ‘राम की बंडी’, किंवा चारमिनारमधील ‘गोविंद की बंडी’ या अवघ्या हैदराबाद शहरात एक ‘प्रस्थ’ बनल्या आहेत. जुन्या चारमिनारभोवती हेरिटेज वॉक केल्यानंतर चार-कमानींजवळच्या घनसीबाजार भागात जावे. गल्लीमध्ये पाचपन्नास खवय्यांचा गराडा पडलेली गोविंद की बंडी दिसते. हातगाडीचा मालक गोविंद एकाच वेळी अनेक डोसे आणि कढईत उकळणारे अनेक वडे मोठय़ा निष्णातपणे हाताळतो. तयार झालेल्या डोशांवर बटर लावून भाजीसह ते कागदावर सव्‍‌र्ह करण्याचे काम त्याचा एकमेव मदतनीस करतो. ऑर्डर देणारे खवय्ये उभ्याउभ्याच ते डोसे आणि वडे यांचा आस्वाद घेतात. मसाला इडलीही अत्यंत चविष्ट असते.

गेली ४० वर्षे हा गोविंद ‘बंडी’वर अत्यंत चविष्ट, रुचकर, आणि पुन:पुन्हा खावेसे वाटणारे इडली-डोसे तयार करून साध्या कागदावर सव्‍‌र्ह करत आला आहे. अवघ्या हैदराबाद शहरातले आय.टी. नवाब दूरून येऊन, आपआपल्या गाडय़ा दूर उभ्या करून, त्याच्या बंडीसमोर रांग लावून त्या अप्रतिम पदार्थाचा आस्वाद घेत आले आहेत!