28 January 2020

News Flash

सांधेदुखी आणि ‘ओटी’

आर्थरायटिसचे अनेक प्रकार असतात. साधारणत: १०० ते १०८ प्रकाराचे आर्थरायटिस ओळखले जातात.

डॉ. जयश्री काळे, ऑक्युपेशनल थेरपी विभाग प्रमुख, केईएम रुग्णालय

आर्थरायटिस म्हणजे सांध्यात येणारी सूज अथवा होणाऱ्या वेदना. या आजाराची अनेक कारणे असू शकतात. आनुवंशिकता किंवा ऑटो इम्युनिटी, सांध्याला झालेली इजा किंवा संसर्ग याही पलीकडे सांध्याचा वारंवार वापर होऊन त्यात झालेली झीज. या आजारावर व्यवसायोपचार चिकित्सा म्हणजेच ऑक्युपेशनल थेरपी(ओटी) करण्याचे अनकेदा सुचविले जाते. तेव्हा हा उपचार म्हणजे नेमके काय ते जाणून घेऊ या..

 

आर्थरायटिसचे अनेक प्रकार असतात. साधारणत: १०० ते १०८ प्रकाराचे आर्थरायटिस ओळखले जातात. प्रथमदर्शनी सांधेदुखीच्या रुग्णांमध्ये वरील कारणांमुळे अनेक बदल झाल्यामुळे सांध्यात वेदना, सूज, सांध्याची हालचाल कमी होणे, सांधा लाल व गरम झाल्याचे आढळून येते, तसेच दैनंदिन कार्य करताना रुग्णाला सांध्यात आवाज येणे अथवा कार्यक्षमता कमी झाल्याचे जाणवते.

जेव्हा सांधेदुखीचा रुग्ण ऑक्युपेशनल थेरपीसाठी पाठवला जातो, तेव्हा क्ष-किरण, एमआरआय, रक्ततपासण्यांसह इतर चाचण्या केल्या जाऊन रुग्णाचे वैद्यकीय निदान केलेले असते. या उपचारामध्ये सर्वप्रथम सांध्यांची औपचारिक पद्धतीने तपासणी करून आजाराचे नक्की स्वरूप जाणून घेतले जाते. ऑक्युपेशनल थेरपीच्या दृष्टीने महत्त्वाच्या सर्व तपासण्या करून वैद्यकीय निदानाशी तुलना केली जाते. रुग्णांमध्ये दिसलेली लक्षणे काय आणि कशामुळे आहेत, रुग्णांची जीवनशैली, त्याच्या कामाचे स्वरूप, कामात जास्तीत जास्त होणाऱ्या सांध्याच्या हालचाली व त्या करताना बसण्याच्या आणि उठण्याच्या पद्धती आणि इतर अवयवांचा प्रयोग कसा करतो (म्हणजेच पोश्चर) यावरून रुग्णाच्या उपचारांची आखणी केली जाते.

उपचारपद्धती

उपचार पद्धतीत दोन मुद्दय़ावर लक्ष केंद्रित केले जाते. एक म्हणजे सांध्याच्या हालचाली जास्तीत जास्त कार्यशील ठेवणे आणि दुसरे सांध्याभोवतीचे स्नायू बळकट करणे.

सांध्याला आधार देणे, त्याची हालचाल सुरळीत ठेवणे व सांध्याला चालना देणे, हे स्नायूचे मुख्य काम असते. स्नायू कमजोर झाल्यास सांध्याचे हळूहळू ढासळणे सुरू होते. त्यामुळे स्नायूंची ताकद वाढविणे आणि त्याचा दैनंदिन कामांत वापर करणे महत्त्वाचे आहे. स्नायूमध्ये ताकद आली की वेदनेच्या प्रमाणात फरक पडतो तसेच सांध्याची कार्यक्षमता वाढते. उपचारात प्रामुख्याने पुढील पद्धती अवलंबिल्या जातात.

१. पी. आर. आय. सी. ई.

पी – (प्रिव्हेंटिव्ह) प्रतिबंधात्मक उपाय. सर्वप्रथम, कामात वारंवार वापरल्या जाणाऱ्या किंवा काम करताना एखाद्या सांध्यावर अधिक ताण येत असल्यास या दोन्ही गोष्टींमुळे अपाय टाळण्यासाठी सल्ला दिला जातो. लठ्ठपणामुळे गुडघ्यावर अथवा घोटय़ावर सतत दाब येत असतो, प्रमाणाबाहेर चालणे, चुकीचे व्यायाम करणे यामुळे सांध्यांची झीज होऊन ऑस्ट्रिओ आर्थरायटिससारखी सांधेदुखी होऊ  शकते. अधिक वजन उचलल्याने पाठीवरही परिणाम होऊ  शकतो. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे सांध्याची लहान वयात झीज होऊ  शकते. या थेरपीमध्ये त्यावर प्रतिबंधक उपाय सांगितले जातात. उदाहरणार्थ व्यायामाचे नक्की प्रमाण आणि प्रकार. व्यायामाचा औषधासारखाच डोस दिला जातो. तसेच वजन कमी करण्यासाठीही प्रत्येक रुग्णाप्रमाणे टेलर मेड पद्धती सुचविल्या जातात. कॅल्शिअम हाडांमध्ये रोखून ठेवण्यासाठी विशिष्ट कसरती व आहारही सांगितला जातो.

आर -(रेस्ट) दुखणाऱ्या सांध्याला आराम मिळण्यासाठी व त्याच्यात येणारा ताठपणा टाळण्यासाठी जैविक तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या पट्टे बनवून त्यांचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.

आय -(आयसिंग)  सूज ,वेदना व उष्णता असलेल्या साध्यांसाठी रुग्णांच्या लक्षणांप्रमाणे कोणता शेक द्यावा हे ठरविले जाते. सांध्याची तपासणी करून आवश्यकतेनुसार बर्फ अथवा कोमट पाण्याचा आळीपाळीने ३ मिनिटाचा शेक दिला जातो.

सी -(कॉम्प्रेशन) सूज असलेल्या सांध्यावर ठरावीक दाबाचा पट्टा (इलेक्ट्रोकेप बँडेज) व प्रोटेक्टिव्ह कफ बरेचदा गरजेचे असतात. पट्टा बांधल्यानंतर सांध्याला कोणत्या स्थितीत आराम द्यावा आणि वेदनाग्रस्त सांध्याला शेकल्यानंतर व्यायाम करून दाबाचा पट्टा कसा बांधायचा याबाबतही रुग्णाला मार्गदर्शन केले जाते.

ई -( एक्सरसाइज) सांध्याची चिकित्सा केल्यानंतर त्याची लक्षणे जाणून घेऊन व्यायाम ठरविले जातात. सूज व तीव्र वेदना असल्यास प्रथम पेन मॅनेजमेंट करणे आवश्यक असते. अशा साध्यांला प्रथम बर्फाचा शेक व आधार देऊन व्यायाम केला जातो. कालांतराने व्यायामाची गती व तीव्रता वाढवता येते. बरेच रुग्ण वेदनेमुळे सांधा आखडून एका विशिष्ट स्थितीत धरतात (पेन स्पाजम सायकल). यामुळे सांध्याची हालचाल कमी होते, परंतु सांध्याशी निगडित स्नायू ताठ होऊ  लागतात. कालांतराने त्या कमजोर होतात आणि त्यांची झीज सुरू होते.

२. जॉइंट प्रोटेक्शन टेक्निक्स

या उपचार पद्धतीचे क्षेत्र मोठे आहे. कमजोर सांध्यावर अधिक भार न देता सांध्याची सुरक्षितता बाळगणे महत्त्वाचे असते. त्यासाठी सांध्याशी निगडित कामाचा भार, अगोदर व नंतरच्या सांध्यावर भार येऊ नये यासाठी दुखणारा सांधा विभाजित कसा करावा याचे तंत्र रुग्णाला सांगितले जाते. वजन उचलताना एका ऐवजी दोन्ही हातांचा वापर करण्याचा सल्ला अथवा दैनंदिन दिनचर्येतील कामे करण्यासाठी पर्यायी साधनांचा वापर (अ‍ॅडॅपटिव्ह डिव्हायसेस) वापर करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

३. वेदनेचे निवारण करण्यासाठी स्टीम्युलेशन व संलग्नित उपायांचा वापर केला जातो. शरीरातील ऊर्जा बचतीचे तंत्र, कमीत कमी ताकद वापरून दैनंदिन कामे करण्याचे उपाय व पद्धतींवर जोर दिला जातो.

वेदनाग्रस्त आजारांच्या रुग्णांना दिलासा देणारी ही एक समग्र उपचारपद्धती आहे. थोडक्यात स्वावलंबी जीवन जगण्याची आरोग्य संजीवनी आहे, असे म्हणायला हरकत नाही.

First Published on October 22, 2019 1:40 am

Web Title: joint pain acupanchar therapy akp 94
Next Stories
1 संधिवात
2 ब्रोकोली बदाम सूप
3 शतकापूर्वीचे शिक्षण केंद्र सिडनी विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया
Just Now!
X