क्षितिज पटवर्धन, लेखक

ताण हा कला क्षेत्राचा एक अविभाज्य घटकच आहे. कला क्षेत्र हे फारच अनिश्चित आहे. या क्षेत्रात आज आवडलेली गोष्ट उद्या अचानक आवडेनाशी होऊ शकते. आज एखाद्या गोष्टीला मिळालेला होकार दुसऱ्या दिवशी अचानक नकारात बदलतो. त्यामुळे येथे काम करताना येणारा ताणही तशाच प्रकारचा असतो. या क्षेत्रात सतत होणाऱ्या बदलाला आपण तयार असलो तर कदाचित या ताणावर नियंत्रण मिळवता येते. आपणही या क्षेत्राप्रमाणे ‘रेडी फॉर चेन्ज’ असलो तर आजूबाजूच्या घटकांमुळे आपल्यावर येणारा ताणही नियंत्रणात येतो. प्रत्येक व्यक्ती ही संवेदनशील असते. आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्या मनातील संवेदनशीलता लपवता येत नाही. त्यामुळे आयुष्यातील अनेक गोष्टींचा ताण येणेही स्वाभाविक गोष्ट आहे. कोणत्याही गोष्टीचा ताण आला की मला सर्वात सोपा मार्ग झोपण्याचा वाटतो. अनेकदा झोपेमध्ये मला माझ्या समस्यांची उकल झाली आहे. झोपेत मार्ग सुचल्याने झोप हा कोणत्याही ताणावर नियंत्रण मिळवण्याचा सोपा मार्ग असल्यासारखे वाटते. योगसाधना ही ताणावर नियंत्रण आणण्याचा सोपा पर्याय आहे. मी दररोज सकाळी उठल्यावर योगसाधना करतो. या मननामध्ये सर्व गोष्टींचा व्यवस्थित विचार करतो. त्यामुळे काही गोष्टींचा फारसा ताण जाणवत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यक्तीने वर्तमानाचा ताण घ्यायला हवा. अनेकदा आपण भविष्यातील चिंतेने ताण घेत असतो. आज आपल्याकडे ज्या साध्य गोष्टी आहेत त्यांचाच आपण ताण घ्यायला हवा. भविष्यात एखादी गोष्ट घडेल असा विचार करून ताण घेण्याचा प्रकार अनेकदा घडतो.  भविष्यात अशी गोष्ट नक्की होणारच का याचीही काही शाश्वती नसते त्यामुळे सध्याच्या स्थितीचाच विचार करणे शहाणपणाचे ठरते.

एखाद्या समस्येचा किंवा घटनेचा ताण आला तर अशा वेळी निर्णय घेणे फारच चुकीचे ठरते. मनावर ताण असताना निर्णय घेऊ नये. ताणाच्यावेळी काही काळ जाऊ देणे महत्त्वाचे असते. अनेकदा असे लक्षात येते की जी गोष्ट आपल्याला महत्त्वाची वाटत असते ती जास्त महत्त्वाची नसतेच. शेवटी ताण हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे, आपले आयुष्य नाही!