|| राजेंद्र श्रीकृष्ण भट

मनीप्लँटच्या पानांच्या आकाराचीच पाने असलेली अस्सल भारतीय काळीमिरी, नागवेल (खाण्याचे पान), लेडी पिंपळी या वेलीसुद्धा परावर्तित प्रकाशात छान वाढतात. त्या छान तर दिसतातच शिवाय त्यांचा उपयोग खाद्य, औषध, वातावरणशुद्धी, वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी होतो.

पिंपळी – पिंपळीची पाने खाण्याच्या पानांसारखीच असतात. पिंपळीची फळे व मुळे औषधात वापरतात. मॉशस्टिकवर वाढलेली वेल फार छान दिसते. पिंपळीचा विशेष औषधी उपयोग फुफ्फुसे व गर्भाशयाच्या आजारांवर होतो. या वेलीचे तीन प्रकार आहेत. गजपिंपळी, लेडी पिंपळी, सुगंधी पिंपळी.

मिरी-मिरीची पाने जरा जाडसर असतात. खायचे पान व मिरीत फरक असा आहे की खायचे पान चकचकीत व पातळ असते, तर मिरीचे पान जाडसर व  काळपट हिरवे असते. ते चकाकत नाही. कोकण कृषी विद्यापीठाने मिरीची झुडुप प्रकाराची जात विकसित केली आहे. तिला ‘बुश पेपर’ म्हणतात. आपल्या घरातील कुंडीत लावलेले मिरीचे झुडुप त्याच्या विस्तारानुसार पहिल्याच वर्षांपासून उत्पादन देऊ  लागते.

नागवेल (खाण्याचे पान) – याचे अनेक प्रकार भारतात उपलब्ध आहेत. हिंदू धर्मात कोणतेही कार्य विडय़ाच्या पानाशिवाय होतच नाही. या पानांचा रस अनेक आजारांवर गुणकारी असतो. कफ प्रधान रोगांत विविध प्रकारच्या सर्दी-कफ निर्माण करणाऱ्या रोग जंतूंचा नाश तो करतो. जेवणानंतर विडा खाल्ल्याने लाळेचे प्रमाण वाढून पचनक्रिया वेगाने होते. रातांधळेपणात पानाचा रस डोळ्यात घालतात.

हे काटक व शोभिवंत वेल आहेत. हॉलमध्ये लावल्यास त्यांचा चमकदार हिरवा रंग डोळ्यांना सुखावह असतो. कीड व रोग जवळजवळ नाहीतच. मनीप्लँटपेक्षा खूप उपयुक्त वेल आवर्जून घरात लावावेत.

rsbhat1957@gmail.com