ऑफ द फिल्ड : ऋषिकेश बामणे

पॅरिसमधील शँटलेट थिएटर येथे प्रतिष्ठित ‘बलोन डी ओर’ (गोल्डन बॉल) पुरस्कार सोहळा सोमवारी थाटात पार पडला. या सोहळ्यातील पुरस्कार विजेत्यांबरोबरच अन्य रंजक घडामोडींविषयीही समाजमाध्यमांवर रंगलेल्या चर्चेचा घेतलेला हा आढावा.

मेसी, रॅपिनो पुन्हा सर्वोत्तम

आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्जेटिनाचे प्रतिनिधित्व करणारा बार्सिलोनाचा मातब्बर फुटबॉलपटू लिओनेल मेसी आणि अमेरिकेला विश्वविजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारी मेगान रॅपिनो या वेळी ‘बलोन डी ओर’ पुरस्काराचे मानकरी ठरले. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यात झालेल्या ‘फिफा’ पुरस्कारांमध्येही या दोघांनीच अनुक्रमे पुरुष आणि महिला गटातील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान मिळवला होता. मेसीने विक्रमी सहाव्यांदा हा पुरस्कार पटकावून पोर्तुगालचा कट्टर प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिव्हरपूलचा व्हर्गिल व्हॅन डिक यांना मागे टाकले. रोनाल्डोने कारकीर्दीत पाच वेळा या पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे. युव्हेंटसचा मॅथिग्स डी लेट सर्वोत्तम युवा खेळाडू, तर लिव्हरपूलचा अ‍ॅलिसन बेकर सर्वोत्तम गोलरक्षकाच्या पुरस्काराचा मानकरी ठरला.

मेसी-रोनाल्डोतील जुगलबंदी कायम

मेसी आणि रोनाल्डो यांच्यात सर्वश्रेष्ठ कोण, याची चर्चा नेहमीच सुरू असते. त्यातच एका क्रीडा संकेतस्थळाने धक्कादायक खुलासा केल्यामुळे या चर्चेला उधाण आले आहे. या सोहळ्यासाठी नामांकन लाभलेल्या खेळाडूंना फ्रान्समधील पत्रकार, अन्य देशांतीलही काही ठरावीक पत्रकार आणि राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक इत्यादींना मते देण्याचा अधिकार असतो.

परंतु एका इंग्रजी संकेतस्थळाने सप्टेंबरमध्ये झालेल्या ‘फिफा’ पुरस्कार सोहळ्यात कोणत्या खेळाडूने कोणाला सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी पसंती दर्शवली आहे, याचा गेल्या सहा वर्षांतील आढावा चाहत्यांपुढे सादर करून दोघांमधील द्वंद्वाला वेगळे वळण दिले. त्यांच्या सादरीकरणानुसार मेसीने गेली दोन वर्षे स्वत:च्या प्राधान्यक्रमात रोनाल्डोला अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान दिले, तर रोनाल्डोने मात्र आतापर्यंत एकदाही मेसीला पहिल्या तीन क्रमांकात स्थान दिलेले नाही. त्यामुळे काहींनी रोनाल्डोचे पितळ उघडे पडल्यामुळेच तो या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहिला नाही, तसेच मेसीला पुरस्कार स्वीकारताना त्याला पाहवणार नाही, अशा शब्दांत रोनाल्डोची फिरकी घेतली. तर एकाने मेसीच्या मुलाचे छायाचित्र टाकून त्याच्या शेजारील बालकाला रोनाल्डो रडतानाचे छायाचित्र जोडले.

समाजमाध्यमांवर चाहत्याचे ‘मेसी’प्रेम

वयाच्या ३२व्या वर्षीही एखाद्या किशोरवयीन तरुणाप्रमाणे खेळणाऱ्या मेसीवर चाहत्यांनी कौतुकाचा भरभरून वर्षांव केला. ‘विल टेल माय किड्स’ आणि ‘टेन इअर्स चॅलेंज’ यांसारख्या सध्या गाजत असलेल्या मीम्स शैलींत चाहत्यांनी मेसीचे गुणगाण गाताना त्याचा १० वर्षांपूर्वीचा आणि आताच्या ‘बलोन डी ओर’सोबतचे छायाचित्र टाकले. तर काहींनी मेसीमुळेच फुटबॉलचा उदय झाला, तो असेपर्यंत इतर कोणत्याही खेळाडूला हा पुरस्कार मिळूच शकत नाही, अशाप्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या.