News Flash

क्रीडा क्षेत्रातही करोनाचा कहर

गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण विश्वावर करोनाचा कहर पहावयास मिळत आहे.

ऑफ द फिल्ड : ऋषिकेश बामणे

गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण विश्वावर करोनाचा कहर पहावयास मिळत आहे. क्रीडा क्षेत्रालाही याचा मोठय़ा प्रमाणावर फटका पडला असून जवळपास सर्वच खेळांच्या बहुतांश स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. यापूर्वीही करोनाव्यतिरिक्त अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे अथवा विविध कारणांनी क्रीडा क्षेत्रावर अशी वेळ ओढावली होती. अशाच काही घटनांचा घेतलेला हा आढावा.

स्पर्धाचे वेळापत्रक कोलमडले

चीनमधून संपूर्ण जगभर पसरलेल्या करोनामुळे सध्या युरो चषक फुटबॉल, फ्रेंच ओपन, इंडियन प्रीमियर लीग यांसारख्या महत्त्वाच्या स्पर्धा लांबणीवर पडल्या आहेत. त्याचप्रमाणे टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेवरही या विषाणूचे सावट पसरत आहे. एके काळी प्रेक्षकांच्या उपस्थितीशिवाय सामन्यांमध्ये चुरस नसायची; परंतु आता बंदिस्त स्टेडियममध्ये चाहत्यांविनाही सामने खेळण्याचा प्रस्ताव अनेक क्रीडा संघटनांनी स्वीकारला आहे. भारतात आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व स्पर्धा रद्द करण्यात आल्या असून स्थानिक स्पर्धाचेही वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात सर्व काही सुरळीतपणे सुरू होण्यासाठी आणखी काही आठवडे प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दहशतवादी हल्ल्याचाही क्रिकेटला फटका २००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे इंग्लंड क्रिकेट संघ भारत दौरा अर्धवट सोडूनच मायदेशी माघारी परतला. या घटनेतून सावरण्यासाठी देशाला जवळपास महिन्याभराचा अवधी लागला. त्याचप्रमाणे २००९ मध्ये श्रीलंकन क्रिकेटपटूंवर झालेली बेछूट गोळीबाराची घटनासुद्धा क्रीडाविश्वाला काळिमा फासणारी ठरली. पाकिस्तानमध्ये झालेल्या या हल्ल्यामुळे तब्बल १० वर्षे विश्वातील अन्य संघांनी पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास नकार दर्शवला.

वणव्यामुळे ऑस्ट्रेलियावर नामुष्की

२०२०च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियात निर्माण झालेल्या वणवाजन्य परिस्थितीमुळे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला फटका पडला. त्याचप्रमाणे अनेक खेळाडूंची तंदुरुस्तीही यामुळे खालावली गेली. वायू प्रदूषणामुळे काहींनी स्पर्धेतून माघार घेतली, तर काहींनी दिलगिरी दाखवून पुढे येत या वणव्याचा बळी ठरलेल्या कुटुंबीयांसाठी आर्थिक साहाय्य करण्याचा निर्णय घेतला.

 

भारत-पाकिस्तान दौरा स्थगित

१९८४-८५ दरम्यान भारताच्या त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यामुळे भारताला पाकिस्तान दौरा अर्धवट सोडून माघारी परतावे लागले होते. उभय संघांतील दोन कसोटी सामने अनिर्णित राहिले, तर तिसरी कसोटी इंदिरा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात निर्माण झालेल्या संतापाच्या लाटेमुळे रद्द करण्यात आली होती.

bamnersurya17@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 1:48 am

Web Title: off the filed sports player corona virus effect akp 94
Next Stories
1 नवलाई : सॅमसंगचा ‘एम३०एस’
2 एकला चलो रे!
3 पेटटॉक : करोनाचे भय नाही, पण स्वच्छता हवीच