– शुभा प्रभू-साटम

साहित्य

कोवळी फरसबी १ मोठी वाटी अगदी बारीक चिरून, ओलं खोबरं पाव वाटी, मूग डाळ छान भिजलेली पाव वाटी किंवा कमी. फोडणीचे साहित्य – मोहरी, हिंग, कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या, उडीद डाळ.

कृती

आवडत असल्यास खोबरेल तेल किंवा अन्य तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, उडीद डाळ, सुक्या मिरच्या घालून मंद आगीवर साधारण लाल होईतो परता. त्यात भिजवून निथळवलेली मूगडाळ घालून पाचेक मिनिटे मंद आगीवर झाकण ठेवून शिजवा. नंतर त्यात फरसबी घालून मोठय़ा आचेवर ५ ते १० मिनिटे झाकण न ठेवता परता. ओलं खोबरं मीठ घालून परता आणि उतरून ठेवा. या भाजीत हळद घालत नाही. ही भाजी जरा कचकचीत चांगली लागते. अधिक शिजवू नये.