ऋषिकेश बामणे

खेळाडू आणि दुखापती या कोणत्याही खेळाचा अविभाज्य घटक असतात. परंतु याच दुखापती खेळाडूंसाठी जीवघेण्याही ठरू शकतात. खेळादरम्यानच झालेल्या दुखापतीमुळे आपले प्राण गमावणाऱ्या काही दुर्दैवी क्रीडापटूंचा घेतलेला हा आढावा.

फिलिप ह्य़ुज (क्रिकेटपटू)

ऑस्ट्रेलियाचा कौशल्यवान डावखुरा फलंदाज फिलिप ह्य़ुजचा नोव्हेंबर, २०१४मध्ये मानेला चेंडू लागल्याने मृत्यू झाला. शेफील्ड शील्ड या ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक स्पर्धेतील एका सामन्यात फलंदाजी करताना सीन अबॉटने ह्य़ुजला टाकलेल्या त्या चेंडूचा प्रहार इतका होता की मैदानावरच ह्य़ुज खाली कोसळला. अखेरीस दोन दिवसांनी त्याचा सिडनीतील सेंट व्हिन्सेंट इस्पितळात मृत्यू झाला. विशेष म्हणजे अवघ्या तीन दिवसांनीच म्हणजे ३० नोव्हेंबर रोजी ह्य़ुज वयाची २७ वर्षे पूर्ण करणार होता.

आर्टन सीना (फॉम्र्युला-१ चालक)

फॉम्र्युला-१ शर्यतीतील नामांकित चालकांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ब्राझीलच्या आर्टन सीनाचा १९९४मध्ये सॅन मॅरिनो ग्रँड प्रिक्स शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातामुळे मृत्यू झाला. चार दिवस रंगलेल्या या शर्यतीतील सातव्या फेरीत प्रतिस्पध्र्याला मागे टाकण्याच्या प्रयत्नात ताशी ३०७ किलोमीटर वेगाने सुरू असलेली त्याची गाडी सीनाचे नियंत्रण सुटल्यामुळे थेट बाजूच्या भिंतीवर आदळली.

त्या धडकेचा प्रहार इतका होता की सीनाच्या शरीरातून जवळपास ४ लिटर इतके रक्त त्वरित बाहेर आले. अखेरीस त्याच दिवशी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. ३४ वर्षीय सीनाने कारकीर्दीतील तीन वेळा जागतिक विजेतेपद मिळवले होते.

रमण लांबा (क्रिकेटपटू)

२३ फेब्रुवारी १९९८ हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील काळा दिवस मानला जातो. कारण याच दिवशी भारताचा प्रतिभावान क्रिकेटपटू रमण लांबाचे दु:खद निधन झाले. २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशच्या प्रीमियर डिव्हिजन या स्थानिक स्पर्धेत लांबा अबाहनी क्रीडा चक्र या संघाचे प्रतिनिधित्व करत होता. या वेळी फॉरवर्ड शॉर्टलेगला क्षेत्ररक्षण करत असतानाच मेहराब हुसैनने जोरदार भिरकावलेला चेंडू लांबाच्या डोक्याला लागून थेट यष्टीरक्षकाच्या हाती विसावला. त्या वेळी लांबाने आपण ठीक असल्याचे सांगितले, मात्र ड्रेसिंग रूममध्ये परतल्यावर त्याला असह्य़ वेदना झाल्याने तो कोमामध्ये गेला. इस्पितळातही त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. अखेरीस तीन दिवसांनी त्याने अखेरचा श्वास घेतला.

अ‍ॅण्टोनिओ प्युर्टा (फुटबॉलपटू)

स्पेनच्या अ‍ॅण्टोनिओ प्युर्टाला या २२ वर्षीय फुटबॉलपटूचा २००७मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. २५ ऑगस्ट २००७ रोजी ला लिगा स्पर्धेतील गेटाफेविरुद्धच्या सामन्यात खेळताना चेंडूचा अंदाज चुकल्याने तो जोरात त्याच्या छातीवर आदळला. परंतु यामुळे त्याला काहीही दुखापत झाली नाही. मात्र त्याच सामन्यात काही मिनिटांनंतर त्याला मैदानावरच झटके येण्याचे सुरू झाले व तो बेशुद्ध झाला. अखेरीस दोन दिवसांनी त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. सेव्हिला क्लबकडून खेळणाऱ्या प्युर्टाने क्लबसाठी ५५, तर स्पेनसाठी एक सामना खेळला होता.

पॅट्रिक डे (बॉक्सर)

अमेरिकेचा बॉक्सर पॅट्रिक डे याचे गेल्या आठवडय़ातच झालेले दुर्दैवी निधन हे या मालिकेतील सर्वात ताजे उदाहरण.

१२ ऑक्टोबर रोजी व्यावसायिक (प्रोफेशनल) बॉक्सिंग स्पर्धेतील वेल्टरवेट प्रकारात चार्ल्स कोनवेलविरुद्धच्या लढतीत १०वी फेरी सुरू असतानाच कोनवेलने लगावलेला एक ठोसा थेट पॅट्रिकच्या मेंदूवरील भागाला लागला व तेथेच तो खाली कोसळून बेशुद्ध झाला. जवळपास चार दिवस डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. मात्र बुधवार, १६ ऑक्टोबरला सायंकाळी त्याची प्राणज्योत मालवली. २७ वर्षीय पॅट्रिकच्या आधी जुलै महिन्यातसुद्धा दोन बॉक्सर्सचा अशाच प्रकारे खेळताना दुखापत झाल्याने काही दिवसांनी मृत्यू झाला होता.