बाजारात नवे काय?

लॅम्बोर्गिनी हुराकन ईवो आरडब्ल्यूडीचे अवतरण

लॅम्बोर्गिनी भारतीय बाजारात आधुनिक फिचर्स व उपकरणांसह  हुराकन ईवो आरडब्ल्यूडी उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारीच्या २९ तारखेला ती उपलब्ध होणार आहे. या कारमध्ये तीन ड्रायविंग मोड स्ट्राडा, स्पोर्ट व कोरसा ठेवण्यात आले आहे. या सुपर कारमध्ये ५.२ लीटर एनए वी १० पेट्रोल इंजिनाचा उपयोग करण्यात आला आहे. हे इंजिन ८००० आरपीएम वर ६१० बीएचपी पॉवर तथा ६५०० आरपीएम वर ५६० न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. या गाडीमध्ये सात स्पीड ऑटोमेटिक गियरबॉक्स लावण्यात आल्याने मागच्या टायरलाही शक्ती मिळते. ही कार ३.३ सेकंदात ताशी ०-१०० किमी इतका वेग देते.

नुकतेच रॉयल एनफिल्डने आपली सर्वाधिक विकली जाणारी दुचाकी क्लासिक ३५० के बीएस-६ ही आवृत्ती बाजारात उतरवली होती. आता याच सेगमेंट मधील इंटरसेप्टर बीएस-६ च्या लॉचिंगची तयारी सुरु आहे. विशेष म्हणजे डिलर्सनी इंटरसेप्टरची बुकिंग सुरु केली आहे. नव्या इंटरसेप्टर ६५० ची बुकिंग १० हजार रुपये देऊन होत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात ही बाईक शोरुम मध्ये उपलब्ध असणार आहे. या बाईकमध्ये ट्विन सिलेंडर, फ्यूल इंजेक्टेड लिक्विड कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. याद्वारे ४७ बीएचपी पॉवर आणि ५२ न्यूटन मीटर टॉर्क उत्पन्न होते.