|| आशुतोष बापट

शनिवार

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातले हे नितांत सुंदर गाव आहे. इथला मोती तलाव आणि राजवाडा पाहावा. राजवाडय़ात गंजिफा बनवण्याचे काम चालते, ते पाहावे. तिथेच वरच्या मजल्यावर मोठे संग्रहालय आहे. राजवाडय़ातला दरबार पाहण्यासारखा आहे. तिथून आंबोली घाट चढून आंबोलीला जावे. सावंतवाडी संस्थानचे हे थंड हवेचे सुंदर ठिकाण. हिरण्यकेशी नदीचा उगम आणि तिथले मंदिर पाहावे. घाटातून कोकणचे दृश्य रमणीय दिसते. लाकडी खेळण्यांचे कारखाने पाहून संध्याकाळी आरोंद्याला जावे. किरणपाणीतला खाडीवरचा पूल आणि तिथून सूर्यास्त पाहावा. यशवंतगड पाहावा.

रविवार

झारापची भावई देवी आणि भगीरथ उपक्रम पाहावा. तिथून पुढे पिंगुळीला जावे. पिंगुळी गावात चित्रकथीचा खेळ करणारे गंगावणे हे आता एकमेव कुटुंब आहे. त्यांचे वस्तूंचे संग्रहालय पाहावे. आदिवासी कला आंगण असे त्याचे नाव. त्यांच्याकडे चित्रकथी, कठपुतल्यांचा खेळ पाहता येतो. तसेच कलाकारांसाठी तिथे कार्यशाळा घेतल्या जातात. फक्त एकाच कुटुंबापुरती मर्यादित राहिलेली कला अवश्य पाहावी. तिथून पुढे वालावलला जावे. इथे नदीकाठी असलेले लक्ष्मीनारायणाचे देखणे मंदिर पाहावे. लाकडी खांबांवर केलेली कलाकुसर निव्वळ अप्रतिम आहे. तिथून धामापूर मार्गे मालवणला जावे अन्यथा परत सावंतवाडीला परतावे.

ashutosh.treks@gmail.com