कुठलेही वाहन चालवताना वाहनचालकाचा प्रवास आरामदायी व्हावा म्हणून जसे चाक, टायर्स आणि तरंगक याचे महत्त्वाचे योगदान असते, तितकेच महत्त्वाचे योगदान आसनाचे असते. सर्वसाधारणपणे फटफटींना एकल आसन (वल्ल्र३ रीं३ ) असते. अपवाद बुलेट किंवा तत्सम फटफटींचा. तर स्कुटरमध्ये दोन वेगवेगळ्या आसनांची पद्धत आहे. नवीन पिढीला आकर्षित करण्यासाठी सहप्रवाशाला थोडं उंच वाटेल अशी आसन व्यवस्था केलेली असते.

आसन वाहनाच्या चासीला पुढच्या बाजूला एका पिनने जोडलेले असते. त्याच्या खालच्या बाजूला पॉलिमर पदार्थाचे खोगीर असते त्याला पाणी वाहून जायला भोकं असतात. त्या खोगिरावर आरेखनाप्रमाणे योग्य घनतेचे स्पंज असते. ह्या स्पंजमध्ये स्प्रिंग असतात. आणि सर्वात वरच्या बाजूला कमी घनतेचा आणि जास्त मऊ असणारा स्पंज असतो. आसनाला कृत्रिम चामडय़ाचे आच्छादन असते. आसनांच्या आच्छादनाला आकर्षक रंगसंगती आणि नक्षीकाम असते.

दुचाकी उघडय़ावर असल्यामुळे पावसात भिजू शकते तसेच दुचाकी धुताना पाणी आसनाला लागतेच. बरेचदा आसनाच्या आतील स्पंजमध्ये हे पाणी शिरते. ते निघून जावे म्हणून जी भोकं असतात ती कायम मोकळी ठेवावीत. अन्यथा पाण्याचा निचरा न होता स्पंज कुजण्याची शक्यता असते. वापरून वापरून विषेशत: वजनदार चालक किंवा सहप्रवासी असेल तर स्पंज कायमचा दबून त्यातील आरामदायीपणा कमी होऊ  शकतो. तेव्हा वेळचे वेळी आसनाचा आकार त्याचा मऊ पणा तपासून योग्य वेळी दुरुस्ती करावी. तसेच आच्छादन फाटले तर त्याला अतिरिक्त आच्छादन बसवून घ्यावे. मूळ आसनाचा आकार चालकाला आणि सह प्रवाशाला आरामदायी राहील असा असतो, तो बदलून नव्या पद्धतीचे आसन लावताना ही गोष्ट ध्यानात घ्यावी.

आसनाला चासीला जोडणारी पिनसुद्धा वेळोवेळी तपासून घ्यावी. ती लोखंडाची असते. ती गंजून जाऊ  नये म्हणून त्यावर कधी मुलामा चढविलेला असतो. तरीसुद्धा ती पिन गंजून तुटू शकते. त्यावेळी तीसुद्धा गरजेनुसार बदलावी. सुरक्षेच्या दृष्टीने ते एक महत्त्वाचे पाऊल आहे.

अनेकदा दुचाकींवर दोनऐवजी तीन, चार, पाचच नव्हे तर संपूर्ण कुटुंब प्रवासाला निघतं. असं करताना आसनाच्या क्षमतेचा विचार जरूर करा. कारण बहुतांश दुचाकींचे आसन दोन प्रौढ व्यक्तींच्या वापरासाठी बनवलेले असते.