परीक्षांचा जाच संपून भटकंतीचा हंगाम सुरू होतो. पण याच काळात उन्हाची काहिलीसुद्धा वाढू लागलेली असते. अशा वेळी शिमला-कुलू-मानली ही ठिकाणं पर्यटकांनी तुडुंब भरून जातात. उन्हाळ्यात हिमालयाशिवाय पर्यायही नसतो. अशा वेळी बॅग भरावी आणि तडक सिक्कीम गाठावं. हिमालयाच्या कुशीत विसावलेलं अत्यंत देखणं आणि शांत राज्य म्हणजे सिक्कीम. दार्जिलिंग या सुप्रसिद्ध पर्यटनस्थळामुळे काहीसं झाकलं गेलेलं, पण खूप शांत-निवांत आणि तितकंच निसर्गरम्य सिक्कीम अवश्य पाहायला हवं.

रेल्वेने कोलकाता, तिथून जलपाईगुडी आणि तिथून गंगटोक हा प्रवास काहीसा रटाळ होतो. त्यापेक्षा विमानाने सरळ गंगटोकजवळील बागडोगरा गाठावं आणि तिथून गंगटोकला जावं हे उत्तम. सिक्कीमच्या राजधानीचं हे शहर ५,४१० फूट उंचीवर वसलेलं आहे. लेपचा, नेपाळी आणि भुतिया जमातीचे लोक इथे मोठय़ा संख्येने आहेत. गंगटोकला मुक्काम करून आजूबाजूचा प्रदेश मनसोक्त भटकता येतो. इथे फिरण्यासाठी जीप, सुमो अशी वाहने मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असतात. सिक्कीमचे रस्ते लहान आणि डोंगरातून जाणारे असल्यामुळे इथे मोठय़ा बस चालत नाहीत. इथले स्थानिक चालकच या रस्त्यांवरून गाडय़ा चालवू जाणे. चीनच्या सीमेला लागूनच हे राज्य असल्यामुळे इथे सैन्याच्या वाहनांची वर्दळसुद्धा मोठय़ा प्रमाणावर असते.

how does hail fall marathi news, how does hail fall in summer marathi news
विश्लेषण: गारांचा पाऊस कडक उन्हाळ्यात कसा पडतो? हिमवर्षाव आणि गारपिटीमध्ये काय फरक?
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा

गंगटोकमध्ये कुठेही नजर टाकली तरी हिमालयाच्या रांगा दृष्टीस पडतात. गंगटोकपासून ५० कि.मी.वर असलेली चीनच्या सीमेवरील नथू-ला ही खिंड बघणं अगदी अनिवार्य आहे. नथू-लासाठी जे परमिट घ्यावं लागतं ते गंगटोकलाच मिळतं. इथे जाताना वाटेत असलेलं छांगु लेक डोळ्यांचं पारणं फेडतं. प्रदूषणविरहित वातावरण असल्यामुळे आकाशाच्या निळ्याशार रंगाचं प्रतिबिंब या सरोवरात पडलेलं असतं. बाजूलाच सैन्याचा मोठा तळ आहे. इथून पुढे येते भारत-चीन सीमेवरील १४,१४० फूट उंचावरील खिंड, नथू-ला.

प्राचीन काळातील प्रसिद्ध सिल्क रूट इथूनच जात असे. याच खिंडीतून कॅप्टन यंग हजबंडच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश सैन्याने तिबेटमध्ये प्रवेश केला होता. भारतीयांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट म्हणजे १९६२च्या मानहानीकारक पराभवानंतर १९६७ साली भारतीय सैन्याने याच खिंडीत चिनी सैन्याचा दारुण पराभव केला होता. भारतीय तोफखान्याने त्या वेळी मोलाची कामगिरी करून चिनी बंकर उद्ध्वस्त केले आणि जवळजवळ ४०० हून अधिक चिनी सैनिकांना यमसदनी धाडलं होतं. त्या विजयाचं स्मारक इथे उभारलेलं आहे. नथू-ला खिंड आणि परिसरातून चीनच्या सैन्याच्या चौक्या अगदी समोर दिसतात. इथूनच पुढे बाबा मंदिरकडे रस्ता जातो. हे ठिकाण आणि आजूबाजूचा परिसर निव्वळ पाहण्याजोगा आहे. हे अंतर गंगटोकवरून जरी फक्त ५० कि.मी. असले तरी अत्यंत अरुंद आणि वळणावळणाच्या रस्त्यांमुळे इथे जाऊन यायला अख्खा एक दिवस लागतो.

गंगटोकमध्येच असलेल्या गांधी मार्केटला मुद्दाम भेट द्यावी. इथे वाहनांना प्रवेश नाही. फक्त चालण्यासाठी रस्ते आहेत. या मार्केटमध्ये जागोजागी फुलांचे ताटवे आणि कारंजी आढळतात. गंगटोकवरून कुठेही निघालात तरी निसर्ग आपले विविध रंग उधळताना दिसतो. वाटेत लागणारी तिस्ता नदी आणि तिच्यावर उभारलेला जलविद्युत प्रकल्प, जागोजागी भारतीय सैन्याने बांधलेले लोखंडी पूल आणि उंचच उंच गेलेली हिमाच्छादित शिखरे आपला प्रवास कधीच कंटाळवाणा होऊ  देत नाहीत.

सगळा सिक्कीम मनमुराद फिरायचा असेल तर ८ दिवस तरी हवेतच. सिक्कीममध्ये एक पथ्य आवर्जून पाळावं, ते म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणं, अनुभवणं कधीही चुकवू नये. चारही बाजूंनी वेढलेल्या हिमालयाच्या शिखरांवर सूर्याचे किरण पडून त्यांचा सोनेरी होणारा रंग आणि सगळाच भारावून गेलेला आसमंत कधीही विसरता येत नाही.

ला-चेन

सिक्कीमच्या उत्तर भागात असलेलं ला-चेन हे ठिकाणसुद्धा अत्यंत सुंदर आहे. इथे मात्र एक दिवस मुक्काम करावा लागतो. पण ला-चेनला जाणं चुकवू नये. तिथे मुक्काम करून तिबेटच्या सीमेवर असलेला १७,००० फूट उंचीवरचा गुरुडोग्मार सरोवर बघता येतो. रम्य निसर्ग, प्रचंड शांतता आणि समोर पसरलेला अथांग सरोवर बघून इथून हलू नये असं वाटतं.

स्वागतसज्ज पेलिंग

सिक्कीममधलं दुसरे सुंदर ठिकाण म्हणजे पेलिंग. हे जणू पर्यटकांच्या स्वागताला सदैव तयार असलेलं ठिकाण वाटतं. पेलिंगमधील कुठल्याही हॉटेलमधून कांचनगंगा पर्वतरांग दिसते. अगदी पाहटे तीन-साडेतीनला उठावं आणि गच्चीत जाऊन सूर्योदयाच्या आधी लाल-केशरी होणारी हिमालयाची शिखरे अगदी न चुकता पाहावीत असं हे ठिकाण. पेलिंगमध्ये एक सुंदर बौद्ध मठ आहे. त्याच्या समोर अतिशय देखणं ‘काबरु’ नावाचं शिखर पाहायला विसरू नये.

ashutosh.treks@gmail.com