21 September 2020

News Flash

रोड ट्रिपवर जाताना..

रोड ट्रिपवर निघण्याआधी आपली गाडी प्रवासासाठी सज्ज असायला हवी.

फेब्रुवारी आणि मार्च महिना तसा पाहायला गेलं तर परीक्षांच्या धामधुमीचा.. पण परीक्षा संपल्यावर सुट्टीच्या मोसमात दूरवर एखादी ट्रिप काढावी असं सर्वानाच वाटतं. उन्हाळय़ाच्या सुट्टीत आठवडा, महिनाभर गावी जाऊन राहण्याची पद्धत आता काहीशी मागे पडत चालली आहे. आजकाल लोक प्रवासाचा नवा अनुभव घेण्याच्या प्रयत्नात असतात. अशा वेळी गाडी काढून कुटुंबासह रोड ट्रिपला जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

आपल्या गाडीतून कुटुंबासह रोड ट्रिपला जाण्यासारखा दुसरा आनंद नाही. हवं तिथं हवा तेवढा वेळ थांबायचं, नवी ठिकाणं, नवे रस्ते पाहायचे याची मजाच वेगळी आहे. आणि अशा प्रकारचं स्वातंत्र्य हे केवळ आपल्या स्वत:च्या गाडीतच मिळू शकते. परंतु रोड ट्रिपवर जाताना काही गोष्टींची काळजी घेणं आणि नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. आरामदायी आणि सुरक्षित रोड ट्रिपसाठी या गोष्टी अवश्य कराव्यात.

निघण्याआधी सव्‍‌र्हिसिंग!

रोड ट्रिपवर निघण्याआधी आपली गाडी प्रवासासाठी सज्ज असायला हवी. यासाठी गाडीची पूर्ण सव्‍‌र्हिसिंग करून घ्या. प्रवासाआधी महिनाभर आधी गाडीची सव्‍‌र्हिसिंग केली असेल किंवा गाडी कोणतीही कुरकुर न करता व्यवस्थित चालत असेल तरीही अशा प्रकारचा लांबचा प्रवास करताना गाडी गॅरेजमध्ये घेऊन जा. किंवा एखाद्या मेकॅनिककडून गाडी तपासून घ्या. गाडीच्या काही छोटय़ामोठय़ा तक्रारी जरी असल्या तरी त्यांची वेळीच काळजी घ्या. यामुळे तुमची ट्रिप अधिक आरामदायक होऊ  शकते. गाडीच्या बॅटरीची जोडणी व्यवस्थित आहे का हे तपासून घ्या. स्वत:हून काही उपाय करू नका.

हेडलाइट तपासा

लांबच्या प्रवासाला बऱ्याच वेळा पहाटेच सुरुवात होते. त्याचप्रमाणे रात्रीदेखील शहरात गाडी चालवण्याचे प्रसंग येतात. अशा वेळी हेडलाइट्स व्यवस्थित असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे केवळ हेडलाइट्सच्या प्रकाशाची तीव्रताच नाही, तर गाडीच्या हेडलाइटची काचही तपासून पाहा. काचेवर जास्त ओरखडे असतील किंवा काच खराब असेल तर प्रकाशझोतावर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत काच बदलून घ्या.

गाडीचे वायपर

उन्हाळ्यात प्रवास करताना वायपर तपासण्याची काय आवश्यकता? असा प्रश्न डोक्यात येऊ शकतो. परंतु लांबच्या प्रवासासाठी जाताना तेथील हवामानाचा अंदाज सहसा येत नाही. तर कधी वळवाच्या पावसाचादेखील सामना करावा लागतो. गाडीची काच स्वच्छ करण्यासाठी सुस्थितीत नसलेले वायपर वापरल्याने गाडीच्या काचेवर चरे पडण्याची शक्यता असते. अशा वेळी चालकाला समोरचं दिसण्यास अडथळे येऊ शकतात. म्हणूनच प्रवासाला सुरुवात करण्याआधी गाडीचे वायपर तपासणं गरजेचं असतं. नवी गाडी असल्यास वायपर तपासण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरीही काळजी म्हणून मऊ कपडय़ाने किंवा टिश्यू पेपरने वायपरच्या ब्लेड्सवरची धूळ पुसून घ्या. ब्लेडमध्ये काही बिघाड असल्यास किंवा कुठे फाटल्यासारखं दिसल्यास लगेच ब्लेड्स बदलून घ्या.

मॅप अपडेट करा!

पूर्वी प्रवासाला जाताना कागदी नकाशा सोबत बाळगला जायचा, मात्र आता गुगल मॅप्ससारख्या सुविधा उपलब्ध असून त्या ‘रिअल टाइम’ माहिती देतात. हे मॅप्स वापरताना मोबाइलच्या खराब नेटवर्कची समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. म्हणून ऑफलाइन मॅप्स डाऊनलोड करून घ्या. आजकाल खास गाडय़ांसाठी तयार केलेले ‘रोड असिस्टंट डिव्हाइस’ उपलब्ध आहेत. परंतु एखाद्या ठिकाणी फारच गोंधळल्यासारखे होत असेल, तर रस्ता विचारण्यासाठी कुणाकडे चौकशी करण्यास संकोच बाळगू नका.

टायर्स तपासा

गाडीच्या चारही टायर्समध्ये हवा योग्य दाबाने भरली आहे का, हे तपासून पाहा. त्याचप्रमाणे स्टेपनी टायरची स्थितीही तपासून घ्या. बऱ्याच वेळा स्टेपनी टायर लक्षात राहत नाही आणि टायर पंक्चर झाल्यास त्याची आठवण होते. त्याचप्रमाणे टायर बदलण्यासाठी लागणारं सर्व साहित्य जॅक, हँडल वगैरे सगळ्या गोष्टी न विसरता सोबत घ्या. पंक्चर काढण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी बरोबर बाळगल्यात तर मग कोणी पंक्चर काढून देणाऱ्याची शोधाशोध करण्याची गरजही पडणार नाही. टय़ूबलेस टायर असतील तर उत्तमच, मात्र तरीही सर्व काळजी घेणं आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 3:20 am

Web Title: things to keep in mind while going for a road trip
Next Stories
1 नवं काय? : बदलते दिवे
2 व्हिंटेज वॉर : वैर नावीन्याचे
3 मंदिरे, किनाऱ्यांचे महाबलीपूरम
Just Now!
X