|| किन्नरी जाधव

गुजरातमध्ये भटकंती करताना इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक वास्तू पाहायला मिळतात. अहमदाबाद आणि बडोद्यात कलावैभवाने संपन्न अशी अनेक स्थळं आहेत. विशेष म्हणजे वास्तू पुरातन असल्या तरी आजही त्याचे योग्य रीतीने जतन करण्यात आले आहे. कुठेही कोणी नावं खरडलेली दिसत नाहीत, अस्वच्छता नाही. वास्तूच्या आवारात शांतता अनुभवता येते. कुशल कारागिरांनी खूप पूर्वी केव्हा तरी साकारलेल्या या विलक्षण सुंदर कलाकृतींचे वैभव आजही टिकवून ठेवण्यात आले आहे.

गुजरातमधील पर्यटकांसाठी सर्वात सुखावह भाग म्हणजे येथील रस्ते, खड्डे, वाहतूक कोंडीरहित प्रशस्त रस्त्यांवरून होणारा प्रवास पर्यटकांचा आनंद ताजा ठेवतो. अहमदाबादमध्ये एखाद्या गावातून प्रवास करताना काही वस्त्यांजवळ वर्षांनुवर्षांपूर्वीच्या तुटलेल्या भिंती दिसतात. काही भिंतींना भगदाडं पडली आहेत. काही भिंतींना रंग देऊन नवीन भासवण्यात आले आहेत. पण या विटांच्या भिंती पाहताना पर्यटकांच्या मनात त्यांच्याविषयी कुतूहल निर्माण होते. या भिंती नेमक्या कशासाठी बांधल्या असतील, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

रंगांचं, विशेषत गडद रंगाचं गुजराथी समाजाला असलेलं आकर्षण इथल्या प्रवासादरम्यान पदोपदी जाणवत राहतं. गुजराथी पद्धतीची साडी नेसून झोपडीबाहेर भांडी घासणारी एखादी महिला दिसली की काही गावांत आजही दारिद्रय़ असल्याची प्रचीती येते. इथे नवरात्रोत्सवात गेल्यास संस्कृतीचं भव्य दर्शन घडतं. अहमदाबादमध्ये नवरात्रोत्सव पाहणं हा एक आगळावेगळा अनुभव असतो. एकाच वेळी एका मैदानात ७० हजार नागरिक जेव्हा अचूक ठेका धरतात तेव्हा त्यांच्या उत्साहाचं, नृत्यकौशल्याचं कौतुक वाटतं. अहमदाबाद म्हटलं की सर्वात आधी आठवतो तो साबरमती आश्रम. पण याव्यरितिक्तही इथे पाहण्यासारखी काही ठिकाणं आहेत.

साबरमती आश्रम

हिरव्यागार झाडांच्या सान्निध्यात असलेल्या आश्रमाच्या खोल्या, महात्मा गांधींच्या निवासस्थानात एका कोपऱ्यात बसून चरखा चालवत त्यावर संशोधन करणारी हॉलंडची महिला, विनोबा भावेंची खोली, गांधीजींची सभा घेण्याची खोली.. आश्रमाचे हे विविध भाग इतिहासाची साक्ष देतात. तिथे गेल्यावर तो काळ कसा असेल, या वास्तूने, परिसराने काय काय अनुभवलं असेल, याची कल्पना करण्यात कोणताही पर्यटक सहज रममाण होतो. या आश्रमातील ‘हृदयकुंज’मध्ये महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांनी १२ वर्ष वास्तव्य केलं. या घराच्या भिंतीला आणि दरवाजाला स्पर्श केल्यावर ज्यांना आजवर केवळ पुस्तकात वाचले त्यांच्या कार्यकाळाची आठवण होते.

लक्ष्मी विलास महाल

भव्यतेत सौंदर्य काय असतं हे जाणून घ्यायचं असेल, तर लक्ष्मी विलास महाल पाहायलाच हवा. ज्यांना कला, वास्तुशास्त्राची, इतिहासाची आवड आहे, अशा पर्यटकांना हे ठिकाण तासन्तास खिळवून ठेवतं. सर्वसामान्य पर्यटकही या महलची व्याप्ती, भिंतींवरील बारीक नक्षीकाम पाहून थक्क होतात. १८९० मध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांनी हा महाल बांधून घेतला. आज या महलची भव्यता पाहिल्यावर त्या काळातील संस्थानिकांच्या ऐश्वर्याचा अंदाज घेता येऊ शकतो. एवढी वर्षे लोटल्यानंतरही ही भव्य वास्तू जपण्यासाठी, पर्यटकांना त्याचा आनंद देण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न पाहिल्यावर कोणीही थक्क होते. पच्चीकारी टाइल्स, चित्रकला, अनेक रंगांचे संगमरवर यांचा उत्तम मिलाफ पाहणे हा नेत्रसुखद अनुभव ठरतो.

रानी की वाव

रानी की वाव म्हणजे राणीची विहीर ही अशीच डोळ्यांना सुखावणारी वास्तू आहे. ६४ मीटर लांब, २० मीटर रुंद आणि २७ मीटर खोल असलेली ही विहीर पाहिल्यावर पर्यटक आश्चर्यचकित होतात. राम, वामन, महिषासुरमर्दिनी, कल्कि अशी वेगवेगळी शिल्पे या विहिरीच्या भिंतींवर कोरलेली आहेत. विहिरीच्या एका बाजूला पटोला साडीची नक्षी दगडात कोरलेली आढळते. इसवी सन १०६३ मध्ये भीमदेव प्रथम राजाच्या स्मरणार्थ त्याची पत्नी राणी उदयामतीने ही विहीर बनवून घेतली होती. गुजरात पर्यटन मंडळ येथील विविध पर्यटनस्थळांविषयी पर्यटकांना आवश्यक ते सर्व मार्गदर्शन करते.

सूर्य मंदिर

बडोद्यामध्ये पाटणपासून काही अंतरावर असलेल्या मोडेरा या गावात असलेले सूर्य मंदिर हे अद्भुत वास्तुशिल्प आहे. इसवी सन १०२६ मध्ये सोलंकी वंशाचा राजा भीमदेव प्रथम याने या वास्तूची निर्मिती केली. दगडात साकारलेली वेगवेगळी शिल्पं पाहिल्यावर मंदिराचे सौंदर्य मनाला विलक्षण आनंद देते. या मंदिरात आता पूजेला मनाई आहे. कदाचित याचमुळे या मंदिरात भाविकांची गर्दी होत नाही आणि हे मंदिर वास्तुशिल्पाची आवड असणारे पर्यटक निवांतपणे पाहू शकतात. त्या विलक्षण कलाकृतीला अनुभवू शकतात.