• प्रवासामध्ये सुती कपडे वापरणे अनेकदा हितकारक असते, परंतु असे कपडे फार लवकर चुरगळतात. सिथेंटिक कपडय़ांपेक्षा ते कपडे अधिक वजनाचेही असतात.
  • जे कपडे लवकर वाळतात अशा प्रकारचे कपडेच प्रवासामध्ये वापरावेत. प्रवासामध्ये कपडे धुणे ही गोष्ट कधी कधी अपरिहार्य होते आणि अशा वेळी कपडे वाळले नाहीत तर त्यामुळे त्रास होतो.
  • प्रवासासाठी खरेदी करताना रिव्हर्सिबल (दोन्ही बाजूंनी वापरण्यासारख्या) कपडय़ांना प्राधान्य द्यावे. त्यामुळे तुमच्याकडे असलेल्या कपडय़ांची संख्या दुप्पट होते आणि बॅगचे वजन मात्र निम्मेच राहते.
  • तुम्ही जर वारंवार प्रवासाला जात असाल तर काही कपडे केवळ प्रवासासाठी म्हणून बाजूला काढून ठेवावेत. इतर वेळी ते वापरू नयेत.
  • अंतर्वस्त्रे आणि पायमोजे या गोष्टींकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. तुम्हाला जे कपडे सोयीस्कर ठरतात ते सोबत नेणे उत्तम. शक्यतो अंतर्वस्त्रे अधिक न्यावीत.
  • वॉटरपार्कमध्ये किंवा धबधब्यांवर भिजण्यासाठी जाताना एक जास्तीचा ड्रेस आणि टॉवेल न विसरता सोबत न्यावा. अशा वेळी शक्यतो पटकन सुकणारे कपडे न्यावेत.
  • हॉटेल लॉबीमध्ये अस्वच्छ, डागाळलेल्या कपडय़ांमध्ये उतरू नये. नाइट गाउन्स किंवा स्लिपिंग ड्रेसमध्ये लॉबीत जाऊ नये.
  • लष्करी पद्धतीचे कपडे वापरणे प्रवासामध्ये टाळावे. लष्करी पद्धतीच्या बॅग्जही टाळाव्यात. अशा कपडय़ांमुळे चुकीचा संदेश पोहोचण्याची शक्यता अधिक असते. तुमच्याविषयी संशय निर्माण होऊ शकतो.
  • तुम्ही ज्या देशामध्ये जाणार असाल त्या देशामध्ये कशा पद्धतीचे कपडे घालतात हे लक्षात घेणे आवश्यक आहे. काही देशांमध्ये स्त्रियांना बुरखा किंवा हिजाब वापरावाच लागतो. त्यामुळे त्या देशाविषयी माहिती घेताना तिथल्या पोशाखाविषयीच्या शिष्टाचारांची माहिती घ्यायलाच हवी.